नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे ५+३+३+४ या मॉडेलवर आधारित आहे. ज्यामध्ये प्राथमिक स्तर पाच वर्षांचा आहे. यात ३ वर्षांची बालवाडी आणि २ वर्षांचे पहिले ते दुसरी इयत्ता यांचा समावेश आहे.
त्यानंतर ३ वर्षे इयत्ता ३ री ते ५ वी तयारीचा टप्पा, त्यानंतर ३ वर्षे शिक्षणाच्या मधल्या टप्प्यात इयत्ता ६ वी ते ८ वी आणि त्यानंतर ४ वर्षे दुसरा टप्पा इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत आहे.
शैक्षणिक धोरण ५ स्तरावर आधारित आहे. प्रवेश, समानता, गुणवत्ता, परवडणे आणि जबाबदारी. प्रवेश म्हणजे शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असावेत. कोणत्याही मुलाने शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. शिक्षणामध्ये समानता असावी. कोणत्याही मुलासोबत कोणताही भेदभाव होऊ नये. शिक्षण उच्च प्रतीचे असावे, जेणेकरून मुलांना योग्य ज्ञान आणि कौशल्ये मिळतील. शिक्षण सर्वांसाठी परवडणारे असावे. गरीब मुलांनाही चांगले शिक्षण घेता यावे. आणि व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी निश्चित असावी, जेणेकरून शिक्षण धोरण व्यवस्थितपणे राबविले जाईल.
१९८४ च्या धोरणानंतर ३४ वर्षांनी नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे. १०+२ हा जुना आकृतीबंध बदलून ५+३+३+४ हा नवीन शैक्षणिक आकृतीबंध ठरविण्यात आला आहे. या नवीन आकृतीबंधातील पहिल्या ५ वर्षातील ३ वर्षे ही पूर्व प्राथमिक शिक्षणाची आहेत. पूर्व प्राथमिक वर्ग म्हणजे अंगणवाडी. अंगणवाडीच्या वर्गासाठी नवीन सामायिक अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा लागणार. पेन-वही किंवा खडू-फळा पद्धती नसून कृतीयुक्त शिक्षणावर भर देताना खेळता खेळता शिकूया ही पद्धती अवंलबायची आहे. पालकांनी या बदलाला साथ दिली पाहिजे. आपल्या वयोगटातील मित्रांसोबत मुले खेळातून जास्त शिकतात. किचकट प्रसंग ते मित्रांसोबत राहून सोडवू शकतात. जिथे पाहिजे तिथेच शिक्षकांनी सहकार्य केले पाहिजे. शिक्षकांनी मी शिकवतो, तुम्ही ऐका म्हणण्यापेक्षा मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन मुले जिथे कमी पडतात तिथेच फक्त शिक्षकांनी फेलिसिटेटर म्हणून काम करायचे आहे. म्हणून सर्व शिक्षा अभियानमार्फत दिली जाणारी प्रशिक्षणेही दर्जेदार असावीत, कृतीयुक्त असावीत. ती तशी होत नाहीत.
प्राचीन भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धती म्हणजे जिथे विद्यार्थी गुरूच्या घरी राहून त्यांच्याकडून ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करत तसेच नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांवर भर देत शिक्षण घेत. या पद्धतीत विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान तसेच नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यावर भर दिला जात असे. गुरुकूल शिक्षण पद्धतीत नैसर्गिक वातावरणात गुरूंच्या घरी शिक्षण होत असे. तेथे शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन मिळत होते. गुरू आणि शिष्य यांचे नाते अत्यंत पवित्र मानले जात होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य गुरूंना गुरुदक्षिणा अर्पण करीत होते.
आजच्या एनईपी २०२० पद्धतीत गुरुकुल पद्धतीचे काही गुणधर्म पाळले जातात. जसे की नैतिक शिक्षण आणि वैयक्तिक मार्गदर्शन.
अध्यापन करताना शिक्षकांनी पंचकोषांचा अभ्यास केल्यास किंवा सर्व शिक्षा अभियान अंतर्गत दिली जाणारी प्रशिक्षणे ही या पंचकोषांवर आधारित कृती दाखवून शिक्षकांना कृतीतून कोणता कोष कोणत्या कृतीतून साध्य झाला याची दर्जेदार कृतिसत्रे घेऊन शिक्षकांना पारंगत केल्यास शिक्षकांचे अध्यापन कौशल्य सुधारण्याबरोबर आनंदी वातावरणात मुले आणखी चांगली शिकतील.
अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष असे कोष आहेत. या कोषांच्या सिद्धांतावर आधारित आम्ही तिसवाडी तालुक्यातील बालवाडी ते चौथी इयत्तेला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी डॉ. हेडगेवार हायस्कूल कुडका आणि बालभवन पणजी येथे दर्जेदार प्रशिक्षण देऊन वरील कोषांवर आधारित विविध अॅक्टिव्हिटीज दाखवताना प्रत्येक दिवसाला कमीत कमी २० कृती शिक्षकांकडून करून घेतलेल्या आहेत. असे पाच दिवसांच्या कृतीसत्रांत १०० पेक्षा जास्त कृती शिक्षकांनी केल्या, तशा अॅक्टिव्हिटीज ते आपल्या शाळेत घेतात. प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांनी ५ ते ६ पानांचा अभिप्राय लिहून देताना, अशी कृतिशील दर्जेदार प्रशिक्षणे शिक्षण खात्याने उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती सुद्धा केलेली आहे.
गोव्यातील शिक्षक चांगले शिक्षण देण्यासाठी आतुर आहेत, पण सुस्तावलेले अधिकारी आणि तेच तेच जुने घेऊन फक्त कागदांवर प्रशिक्षणे घेणारे सर्वशिक्षा अभियान खाते शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षण देत नाहीत, असा माझा आरोप आहे.
- व्यंकटेश नाईक
(लेखक बालोद्धार, प्रारंभिक शिक्षणाचे ट्रेनर आहेत.) मो. ७७४५०३७११८