अभिषेक

अखेर तो सुवर्ण दिवस उजाडला. उमाने पहाटेच अभ्यंगस्नान केले, नवीन साडी नेसली आणि घरच्या देवाला नमस्कार केला. देवासमोर तिने दीप प्रज्वलित केला आणि आपल्या संकल्पाचे मनोमन स्मरण केले.

Story: कथा |
23rd March, 03:41 am
अभिषेक

प्रात:काळचा गार वारा घराच्या झरोक्यातून आत येत होता. सूर्याच्या कोवळ्या किरणांनी अंधुक प्रकाश फाकला होता. उमा अंथरुणातून उठली. आजचा दिवस तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. तिच्या मनात हलकासा आनंद तरळत असला, तरी आत कुठेतरी काळजीही होती.

एका स्त्रीच्या आयुष्यात सर्व काही असले तरी जर तिची कूस रिकामी असेल, तर ते तिच्यासाठी न संपणारे दुःख असते. उमालाही हेच भोगावे लागत होते. अनेक वर्षे झाली तरी तिला मातृत्वाचा आनंद घेता आला नव्हता. समाजाच्या टोमण्यांनी तिच्या हृदयात खोलवर जखमा झाल्या होत्या. दिवसागणिक तिची आशा क्षीण होत चालली होती.  "रिकामी कूस असलेल्या बाईने शुभकार्यात येऊ नये," लोकांचे हे शब्द तिला असह्य होत होते.

एक दिवस संध्याकाळच्या वेळी, घरासमोर एक जोगतीण आली. चेहऱ्यावर तेज, कपाळावर भस्म, आणि हातात रुद्राक्षाची माळ घेऊन ती उभी होती. उमाने तिच्यासाठी पाणी आणले. ते घेतानाच जोगतीणीच्या ओठांवर एक मंद स्मित उमटले. ती हळूच म्हणाली "शंभू महादेवाला अभिषेक घाल गं माई, तेव्हाच मिळेल आई होण्याची पुण्याई!"

उमा थबकली. हे शब्द तिच्या मनात गुंजत राहिले. तिला आठवले लवकरच महाशिवरात्र येत आहे! तिने त्या पवित्र दिवशी कठोर व्रत करण्याचा दृढ निश्चय केला. त्या दिवसापासून ती अधिकच भक्तीरसात बुडाली. महादेवाच्या भक्तीत रात्रंदिवस डुंबलेली उमा आता अधिक शांत वाटत होती. पण तिच्या मनात एक अनामिक भीतीही होती‌ देव तिला आई होण्याचा आशीर्वाद देईल का?

अखेर तो सुवर्ण दिवस उजाडला. उमाने पहाटेच अभ्यंगस्नान केले, नवीन साडी नेसली आणि घरच्या देवाला नमस्कार केला. देवासमोर तिने दीप प्रज्वलित केला आणि आपल्या संकल्पाचे मनोमन स्मरण केले. दुधाने भरलेला पितळेचा हंडा आणि त्यावरील लहानसा तांब्या तिने अलगद उचलला. नवऱ्याने तिला आश्वासक नजरेने पाहिले. तोही या व्रतामध्ये तिला पूर्ण साथ देत होता.

उमाने हंडा आपल्या डोक्यावर ठेवला आणि अनवाणी पायांनी शिवशंभुला अभिषेक घालण्यासाठी मार्गस्थ झाली. गावाच्या बाहेर असलेल्या स्वयंभू शिवलिंगाकडे जाणारी ही वाट तिला नवीन होती. रस्त्यात येणारे काटे, पायाला छेदणारे दगड आणि उंचसखल जमिनीतून तिला वाट काढावी लागत होती.

ती डोंगरउतारावर पोहोचली. सकाळच्या धुक्याने वाट अस्पष्ट दिसत होती. हलकासा गार वारा अंगावर रोमांच उमटवत होता. वातावरणात महाशिवरात्रीचा भक्ती रस पसरला होता. तिच्या शरीरातील शक्ती कमी होत चालली होती. उपवासामुळे पोट रिकामे होते, थकवा जाणवत होता. तरीही, तिने धीर सोडला नाही. पण अचानक, तिचा पाय एका ओलसर दगडावरून घसरला. ती खाली कोसळली आणि तिच्या डोक्यावरचा हंडा हातातून सुटून लांब गेला. धुक्यामुळे तो कुठे पडला आहे, हे तिला दिसत नव्हते. उमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आशेचा शेवटचा किरणही आता धूसर होत चालला होता. पण तिचे लक्ष अचानक हंड्यावरील तांब्याकडे गेले. त्यात अर्धे दूध शिल्लक राहिले होते.

तेवढ्यात समोरून एक क्षीण आवाज आला "माई, थोडं प्यायला देतेस का?" उमाने आवाजाच्या दिशेने पाहिले. समोर एक वृद्ध स्त्री होती, ती खूप अशक्त वाटत होती. उमाने तिला विचारले, "काय हवं तुला, माई?" ती वृद्ध स्त्री कळकळीने म्हणाली, "मला तहान लागली आहे, काही प्यायला आहे का?"उमा काही क्षण तांब्याकडे बघत राहिली. तिच्या मनात विचार सुरू झाला "देवा, माझी अजून किती परीक्षा पाहणार?"‌ ती वृद्ध पुन्हा विनवू लागली "देतेस ना?" क्षणभर मनात द्वंद्व झाले, पण मागचा पुढचा विचार न करता उमाने हातातला तांब्या वृद्ध स्त्रीला देऊन टाकला आणि रिकाम्या हाताने ती पुढे निघाली.

हळूहळू आकाश तांबड्या छटांनी रंगू लागले. उमाच्या डोळ्यांत आई होण्याची आशा अजूनही तेवत होती. गावाच्या खाली असलेल्या शिवलिंगाजवळ ती पोहोचली. अनेक भक्त पहिला अभिषेक घालण्यासाठी आतुरतेने उभे होते. पण आश्चर्य! सगळ्यांचे डोळे वर खिळले होते. उमाला हे दृश्य विचित्र वाटले. लोक वर का पाहत आहेत, हे तिला कळेना. शेवटी ती घोळक्यातून वाट काढत पुढे गेली. आणि जे पाहिले, ते बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

गुहेच्या कुशीत वसलेल्या स्वयंभू शिवलिंगावर, एका झऱ्यातून अखंड दुग्धाभिषेक सुरू होता!‌ उमाने वर पाहिले. सूर्याच्या कोवळ्या किरणांत एक वस्तू चमकत होती. तो हंडाच होता! झऱ्याच्या जवळ अडकलेल्या त्या हंड्यातून दूध झऱ्यात मिसळत होते आणि थेट शिवलिंगावर पडत होते. उमाने दोन्ही हात जोडले, डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने नमस्कार करत म्हटले "देवा महादेवा, तूच माझे आई होण्याचे व्रत स्वतःच पूर्ण केलेस!"त्याच क्षणी तिच्या अंतःकरणात एक शांती आणि समाधान दाटून आले. तिला जाणवले महादेवाने तिची परीक्षा घेतली होती आणि भक्ती, त्याग आणि श्रद्धेच्या जोरावर ती परीक्षेत उत्तीर्ण झाली होती.

ती पायऱ्या चढत असताना, आकाशात सूर्य तेज पसरवत होता. तिने मागे वळून महादेवाला एकदा पाहिले आणि मंद स्मित करत घरी जाण्यास निघाली. तिच्या मनात आता एकच विचार होता—"महादेव माझ्या घरातही प्रकाश आणेल!" 


महादेव  गावस
दोडामार्ग, डिचोली