पैसे दुप्पट करण्याच्या नादात वृद्धेने गमावले २.६३ कोटी रुपये

बनावट वेबसाईटवरून अज्ञातांचा गंडा : सायबर विभागाकडून गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st March, 12:09 am
पैसे दुप्पट करण्याच्या नादात वृद्धेने गमावले २.६३ कोटी रुपये

पणजी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या नावे बनावट जाहिरात देऊन बार्देश तालुक्यातील एका वृद्ध महिलेला क्रिफ्टो आणि इतर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा नावाखाली २.६३ कोटी रुपयाच्या गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर विभागाने www.maunto.com या संकेतस्थळ चालक आणि अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सायबर गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बार्देश तालुक्यातील एका ६७ वर्षीय वृद्ध महिलेने १८ मार्च रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदार महिलेने १३ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची जाहिरात पाहिली होती. त्यात अंबानी यांनी maunto या कंपनीत गुंतवणूक केल्याचे म्हटले होते. त्यानुसार तक्रारदार महिलेने www.maunto.com या संकेतस्थळावर भेट देत आपली माहिती दाखल करून लाॅग इन केले. त्यावेळी कमीतकमी २५० डॉलर गुंतवणूकची अट टाकण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराला अलिझा या महिलेने झूम काॅल करून संपर्क केले. तसेच टेलिग्राम व इतर सोशल मीडिया मार्फत तक्रारदाराला गुंतवणूक करण्यासाठी प्रशिक्षण दिले. त्यानुसार, तक्रारदाराने ठरल्या प्रमाणे वरील संकेतस्थळावर भेट देऊन गुंतवणूक केली. 

त्यासाठी तिने तिच्या आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेतून संशयितांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँकेत २ कोटी ६३ लाख ३० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासाठी वरील अलिझा यांनी तिला दरवेळी मार्गदर्शन केले होते.

 त्यानंतर १० मार्च रोजी तिने १०० डॉलर काढण्यासाठी विनंती केली. त्यानंतर संबंधित महिला तिला दर वेळी वेगवेगळे कारण देत होती. त्यानंतर १४ मार्च रोजी तिच्या एका मैत्रिणीने तिला संबंधित संकेतस्थळ बनावट असल्याचे सांगितले. 

त्यानंतर तिला क्रिफ्टो आणि इतर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा नावाखाली २.६३ कोटी रुपयाच्या गंडा घालण्यात आल्याचे समजले. या प्रकारानंतर तिने सायबर विभागात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३१९(२) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६डी अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.             

हेही वाचा