केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे
पणजी : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १ एप्रिल २०१४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राजकारण्यांविरोधात १९३ खटले दाखल केले आहेत. यामध्ये खासदार, आमदार तसेच स्थानिक पातळीवरील राजकारण्यांचा समावेश आहे. मागील दहा वर्षात १९३ पैकी केवळ २ जण दोषी ठरले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार ए ए रहीम यांनी प्रश्न विचारला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, ईडीने राजकारण्याविरोधात खटले दाखल केले असले तरी त्यांची राज्य आणि पक्षनिहाय माहिती ठेवलेली नाही. मागील दहा वर्षात सर्वाधिक ३२ खटले आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २०२०-२१ आणि २०२३-२४ मध्ये प्रत्येकी २७ खटले, २०१९-२० आणि २०२१-२२ मध्ये प्रत्येकी २६, २०१६-१७ मध्ये १४, चालू आर्थिक वर्षात (२८ फेब्रुवारी पर्यंत) १३ खटले दाखल केले आहेत.
वरील कालावधीत ईडीने २०१७-१८ मध्ये सर्वात कमी ७ खटले दाखल केले होते. एकूण १९३ पैकी २०१६-१७ मध्ये एक तर २०१९-२० मध्ये एक राजकारणी दोषी ठरला होता. उत्तरानुसार ईडी केवळ भक्कम पुराव्याच्या आधारेच एखाद्या प्रकरणाचा तपास करते. असे करताना ती व्यक्ती कोणत्या राजकीय पक्षाची आहे, धर्माची आहे हे पाहिले जात नाही. ईडी असा कोणताही भेदभाव करत नाही.