कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कन्नड समर्थक संघटना उग्र
बेळगाव : केएसआरटीसी बस चालक आणि वाहकांवर अलिकडेच झालेले हल्ले आणि मराठी समर्थक कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ कार्यकर्ते वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखालील कन्नड समर्थक संघटनांनी येत्या शनिवार दि. २२ मार्च रोजी राज्यव्यापी कर्नाटक बंदची हाक दिली आहे.
बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली असून येत्या शनिवारी २२ मार्च रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत राज्यव्यापी बंदची घोषणा करण्यात आली आहे. मागेच केएसआरटीसी वाहतूक कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला तसेच त्यांच्या चेहऱ्यावर शाई लावण्यात आली होती. प्रकरण शमले तरीही कन्नड संघटनांनी बंदची हाक दिली आहे.
दरम्यान वाटाळ नागराज आणि इतर कन्नड समर्थक नेत्यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. बंदच्या दिवशी सकाळी १०.३० वाजता बंगळुरूमध्ये टाउन हॉल ते फ्रीडम पार्क असा निषेध मोर्चा निघणार आहे.