हिंसाचारादरम्यान एका ठिकाणी अंधाराचा गैरफायदा घेत दंगलखोरांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत तिच्या कपड्यांना हात घातल्याचे पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये स्पष्ट
नागपूर : १७ मार्च रोजी महाराष्ट्रातील नागपूरमध्ये औरंगजेबाच्या पुतळ्याचे जाळण्यावरून उसळलेल्या जातीय हिंसाचाराच्या आरोपाखाली पोलिसांनी बुधवारी मास्टरमाइंड फहीम शमीम खानला अटक केली. त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फहीम खाननेच ५०० हून अधिक दंगलखोरांना व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे एकत्र केले होते आणि हिंसाचार भडकवला होता. या संघर्षादरम्यान दंगलखोरांनी महिला पोलीस अधिकाऱ्याचे कपडे काढण्याचा आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. गणेशपेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये ही माहिती समोर आली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, दंगलखोरांनी भालदारपुरा चौकात महिला अधिकाऱ्यासोबत हे अश्लील कृत्य केले. यात फहीमचा समावेश होता असेही त्यात म्हटले आहे.
फहीम खान हा माइनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाचे शहर अध्यक्ष आहे. मागील लोकसभा निवडणुकीत तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात उभा राहिला होता. त्याचा तब्बल ६.७० लाख मतांनी पराभव झाला.
आतापर्यंत ६५ पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे
१७ मार्च रोजी झालेल्या हिंसक संघर्षानंतर नागपूरच्या १० पोलीस जिल्हा क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही संचारबंदी लागू होती आणि ६५ पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. १९ आरोपींना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नेमके काय प्रकरण ?
विश्व हिंदू परिषदेने १७ मार्च रोजी नागपुरात निदर्शने केली होती. निदर्शनादरम्यान, शेणाच्या गोवऱ्यांनी भरलेले हिरवे कापड जाळण्यात आले. विहिंपच्या मते, ही औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूरच्या महाल परिसरात सायंकाळी ७:३० वाजता हिंसाचार उसळला. दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली. दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या डझनभर वाहनांची तोडफोड केली आणि आग लावली.
पोलिसांवरही हल्ला झाला. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात डीसीपी निकेतन कदम जखमी झाले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. रात्री १०.३० ते ११.३० च्या दरम्यान जुना भंडारा रोडजवळील हंसपुरी भागात आणखी एक संघर्ष झाला. १८ मार्च रोजी हिंसाचारानंतर नागपूरमधील ११ भागात कर्फ्यू लागू करण्यात आला. या हिंसाचारात ३३ पोलीस जखमी झाले. यात ३ डीसीपींचा समावेश आहे. पाच नागरिकही जखमी झाले आहेत, त्यापैकी एक आयसीयूमध्ये दाखल आहे.
दंगलखोरांनी १२ दुचाकी, अनेक कार आणि १ जेसीबी जाळून टाकला. दंगलीच्या आरोपाखाली पोलिसांनी सुरवातीला ५५ जणांना अटक केली यापुढेही दोषी आढळणाऱ्या अनेकांना अटक केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे. त्याचबरोबर संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या थडग्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कबरीकडे जाणारे रस्ते बॅरिकेड्सने बंद करण्यात आले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे.