कर्नाटकातील दारू तस्करी प्रकरणी गोव्याच्या अबकारी खात्याचा निरीक्षक प्रमोद जुवेकरला अटक

कागोडू येथे गोवा बनावटीची १३८ लीटर दारू जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th March, 04:21 pm
कर्नाटकातील दारू तस्करी प्रकरणी गोव्याच्या अबकारी खात्याचा निरीक्षक प्रमोद जुवेकरला अटक

कारवार : शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर शहरातील कागोडू येथे गुरुवारी कर्नाटक अबकारी विभागाने गोवा नोंदणी असलेल्या एका कारमधून गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी गोवा बेतुल येथील प्रमोद विश्वनाथ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

सागर उपविभागीय अबकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई गुरुवारी केली आहे. प्रमोद जुवेकर हा आपल्या जीए ०८ एफ ३३१२ या कारमधून सागर अबकारी विभागातील काडोगू येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या शेतात आपल्या कारमध्ये दारू घेऊन थांबला होता. या प्रकाराची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती.

त्यानुसार अबकारी विभागाने केलेल्या कारवाईत त्याच्या गाडीतून १३८.०६ लीटर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. 

त्याच्याविरुद्ध कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा, १९६५ च्या कलम ८,११,१५ नुसार आणि त्याच कायद्याच्या कलम ३२(ए ), ३८(ए ) आणि ४३(ए ) कलमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजार करून न्यायालयीन कोठाडीत ठेवण्यात आले आहे.

या कारवाईत उत्पादन शुल्क उपअधीक्षक शीला दर्जकर, निरीक्षक भाग्यलक्ष्मी, कर्मचारी संदीप एल.सी.,  गुरुमूर्ती, दीपक, मल्लिकार्जुन आणि सचिन यांचा सहभाग होता.

तस्करीत अधिकारीच सक्रिय 
गोव्यात मिळणारी स्वस्त दारू कर्नाटकात तस्करी करण्याचा विषय नवीन नाही, पण गोव्यातील अधिकारीच जास्त पैसे मिळविण्यासाठी आपल्या राज्यातील स्वस्त दारूची कर्नाटकात तस्करी करत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा