नेकी कर, दरियामें डाल – पण मनाला कसं समजवायचं?

चांगल्या कर्माला कोणाच्याही validationची मुळी गरजच नसते! असते गरज ती फक्त स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्याची… Detached Attachment देखील हेच सांगते. जे प्रेम दुसऱ्यांकडून अपेक्षित आहे ते कधीतरी तुम्ही स्वतःच स्वतःला देऊन पा

Story: मनी मानसी |
8 hours ago
नेकी कर,  दरियामें डाल –  पण मनाला कसं समजवायचं?

‘नेकी कर, दरिया में डाल!’
‘कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नकोस!’

आपल्या साऱ्यांनाच हे ठाऊक असेल की भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की कर्म करावं, पण त्याच्या फळाची तमा बाळगू नये. आता हे ऐकायला आणि ग्रंथात वाचायला फार छान वाटतं. परंतु खरी गोम तर अशी आहे की, माणूस हा मुळातच अपेक्षांनी बनलेला आहे!

म्हणजे समजा, तुम्ही तुमच्या एखाद्या मित्र अथवा मैत्रिणीच्या वाढदिवसाला खूप मन लावून भेटवस्तू घेतली, छान सुबक हस्ताक्षरात पत्र लिहिलं, आणि समोरच्याने ‘थँक्स’ म्हणायचीही तसदी घेतली नाही तर? मनातल्या मनात डोकं फिरतं, हो ना?

आता तुम्ही म्हणाल, अगं ‘नेकी कर, दरियामें डाल’ ह्याचा अर्थ, चांगले काम करा, पण त्याचा हिशोब मात्र ठेवू नका असा आहे! आणि मी मान्य देखील करते की अगदी खरं आहे ते. परंतु अहो, आपलं मन आहेच की जणू एक कार्बन पेपर! कुठलंही कर्म केलं, की त्याचा ठसा कुठेतरी उमटतोच! ह्यालाच तर म्हणतात ‘Detached Attachment’ -म्हणजे जोडलेपणाच्या आत काहीसं अलिप्त असणं. 

अरेच्चा! ही काय नवीन भानगड बुवा? हे Detached Attachment म्हणजे नक्की काय गं? 

माझ्या एका ओळखीच्या काकूंना मी ह्या संकल्पनेबद्दल विचारलं, तर त्यांनी फार सुरेख उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “हे बघ, मी दररोज घरच्यांसाठी जेवण बनवते. कुणी कौतुक केलं तर छान वाटतं, पण नाही केलं तरी माझं जेवण बनवणं थांबत नाही. ते माझं कर्म आहे. कौतुकाची अपेक्षा केली तर निराशा ठरलेली, आणि नाही केली तर अपेक्षेविना मन शांत राहतं, कोणाच्या स्तुतीच्या validation ची गरज भासत नाही हो त्यास!”

हा detached attachment चा उत्तम नमुना आहे! आपण कर्म करतो, पण त्याच्या उत्तरादाखल येणाऱ्या कौतुकाला किंवा प्रतिक्रिया न मिळाल्यास होणाऱ्या निराशेला फारसं मनाला लावून घेत नाही.

आता ह्याचा दुसऱ्या टोकाचा परिणाम बघू.

समजा, एखाद्या मुलीने प्रेमाने आईसाठी चहा करून आणला. आईने मोबाईलवर रमून “हं ठेव तिकडे” एवढंच उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा चहा केला, आणि परत तोच प्रतिसाद. हळूहळू, त्या मुलीने ठरवलं, “आईला काही फरक पडतच नाही, मग मी का बरं मन लावून चहा करावा?”

ही आहे detached attachment ची वाईट बाजू!

अनेकदा बरेच लोक अपेक्षाभंग टाळण्यासाठी व स्वतःचं मन वाचवण्यासाठी detached होतात, पण हळूहळू त्यात भावना गोठत जातात. ‘आपल्याला काही फरकच पडत नाही’ ह्या अवस्थेत जाऊन पोहचतात व आपण भावनाशून्य होतो, नात्यात कोरडेपणा येतो. 

अपेक्षाभंग आणि Detached Attachment

खरंतर, detached attachment चं मुख्य कारण म्हणजे अपेक्षाभंगाची भीती!

आपण झोकून देऊन काम करतो, प्रेम करतो, मदत करतो पण त्यावर प्रतिसाद मिळेलच ह्याची खात्री नसते. म्हणूनच लोक सुरक्षित अंतर ठेवतात. परंतु पूर्णपणे अलिप्त होणं हाही काही उपाय नव्हेच!

मला माझ्या एका क्लायंटच्या बाबतीत एक किस्सा आठवतो. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर. एका मोठ्या कंपनीत कामाला होता. ऑफिसात कधीच त्याच्या कामाचं कोणी कौतुक करत नसे. मग त्याने ठरवलं, ‘मी फक्त माझं काम चोख करायचं, पण कोणाकडून 'ग्रेट जॉब' ऐकायची अपेक्षा ठेवायची नाही.’

असेच काही दिवस जातात, त्याने एक मोठा प्रोजेक्ट यशस्वी केला. परंतु बाॅसने कौतुक केलं नाही. आणि विशेष म्हणजे ह्याला काही फरकच पडला नाही. दुसऱ्या दिवशी बाॅसने एका इतर सहकाऱ्याचं कौतुक केलं. तेव्हा मात्र ह्याच्या मनात किंचित चुटपुट उठलीच! शेवटी भावनांनी बनलेला माणूसच तो.

म्हणजे, आपण detached आहोत असं स्वतःला समजावत असलो तरी, आपल्या मनाचा तोल साधायचा प्रयत्न सतत करावा लागतो.

अगं मग, नेकी करायची, पण दरियात कुठे आणि कशी टाकायची?

१. कर्माला मन लावा, पण त्यावरचा हक्क सोडून द्या.

आपण झाड लावतो, पाणी घालतो, खत देतो. पण फुलं उमलतीलच ह्याची शाश्वती नाही. म्हणून आपण ते पाणी घालणं थांबवत नाही!

२. माणसांच्या प्रतिसादावर कमी आणि आपल्या कृतीच्या योग्यतेवर भर द्या.

कौतुकाची भूक नकोच, असं म्हणणं सोपं आहे, पण पूर्णपणे अलिप्त राहणंही अवघड असतं. म्हणूनच, 

जर कुणी कौतुक केलं नाही तरी ‘मी योग्य गोष्ट केलीय’ ह्याचा आनंद घ्या. Self Validation is the key! 

३. अपेक्षा असू द्या, पण त्या कोलमडल्या तरी फार गोंधळ उडू देऊ नका.

प्रेमाचा, मदतीचा, चांगुलपणाचा प्रवाह वाहू द्या. जर कुणी त्याला उत्तर दिलं तर उत्तम, नाही दिलं तरी त्याचं दु:ख करू नका.

म्हणूनच... ‘नेकी कर, दरियामें डाल’ हे सांगणे फार सोपे, अंमलात आणणे तेवढेच कठीण..पाऊस पडतो, कारण त्याने पडायचं असतं, झाड वाढेल की नाही, हे त्याच्या हातात नसतं.

तसंच आपणही आपलं कर्तव्य निष्ठेनं पार पाडायचं व रिटर्न्सची अपेक्षा बाळगू नये. का? कारण आपल्या चांगल्या कर्माला कोणाच्याही validation ची मुळी गरजच नसते! 

असते गरज ती फक्त स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्याची... Detached Attachment देखील हेच सांगते. जे प्रेम दुसऱ्यांकडून अपेक्षित आहे ते कधीतरी तुम्ही स्वतःच स्वतःला देऊन पाहा.

कारण कधी कधी तो दरियाच तुमची नेकी तुमच्यासाठीच अलगद परत वाहून आणतो.. शास्त्र असतं हो ते...


मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक