सॅनिटरी नॅपकिन वापरताना...

नॅपकिन्स काही तासांनंतर बदलले जातात. पण वापरताना चूक झाली, बदलण्यास उशीर झाला तर दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.

Story: आरोग्य |
9 hours ago
सॅनिटरी नॅपकिन वापरताना...

महिलांना दर महिन्याला मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी साहित्यांवर अवलंबून रहावे लागते. आजकाल बाजारात सॅनिटरी नॅपकिन्स सोबत टॅम्पॉन्स, मासिक पाळीचा कप, पीरियड पँटी यासारखे अनेक पर्याय सोपेपणी उपलब्ध झाले असले तरी महिला वर्ग मात्र मोठ्या संख्येने मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यालाच पसंती देतात. हे नॅपकिन्स काही तासांनंतर बदलले जातात. पण वापरताना चूक झाली, बदलण्यास उशीर झाला किंवा योग्य पॅड न वापरल्यास योनीच्या आजूबाजूला पुरळ येणे, खाज सुटणे, सूज येणे, लालसरपणा जाणवणे व यासारखे इतर दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. अशा वेळी महिलांनी काय करावे आणि मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरताना कोणती काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेऊयात. 

पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिनचा वापर अनेक महिलांमध्ये सामान्य आहे, पण याच्या वापरादरम्यान काही प्रतिकूल परिणाम देखील दिसून येऊ शकतात.

त्वचेला रॅशेस आणि अॅलर्जी : काही सॅनिटरी नॅपकिन्समध्ये केल्या जाणाऱ्या डायक्लोरोफेन, ब्लीच, प्लास्टिक आणि इतर रसायनांच्या वापरामुळे त्वचेला अॅलर्जी किंवा रॅशेस झाल्याने पुरळ, लालसरपणा, खाज किंवा इरिटेशन होऊ शकते व शरीरावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. 

अतिस्राव होणे : सतत सॅनिटरी नॅपकिन वापरल्यामुळे काही महिलांना अधिक रक्तस्त्राव होण्याची समस्या येऊ शकते.

संसर्गाचा धोका : सॅनिटरी नॅपकिन योग्य वेळेत बदलले नाही किंवा दीर्घकाळ वापरण्यात आले, तर योनीभागात बॅक्टेरियाची वाढ होऊन संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

नॅपकिन्समध्ये असलेल्या प्लास्टिकमुळे योनीजवळील त्वचेच्या भागाला हवा पोहोचत नाही, ह्युमिड वातावरण तयार होते. यामुळे योनीतील भागात सूज आणि जास्त घाम येऊ शकतो, बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते व संसर्ग होण्याची शक्यता असते.

टॉक्सिक शॉक सिंड्रोम : पॅडच्या सतत वापरामुळे स्टायफिलोकोकस ऑरियस किंवा स्टाफ बॅक्टेरियाची वाढ होऊन हा संसर्ग रोग होऊ शकतो. शरीराच्या विविध भागांमध्ये पोहचून जीवास धोका उद्भवू शकतो. 

पाळीदरम्यान वास : सॅनिटरी नॅपकिन दीर्घकाळ वापरल्यामुळे वास येण्याची समस्या उद्भवू शकते. पॅड्समध्ये स्राव किंवा रक्त जमा होत असल्याने बॅक्टेरिया वाढू शकतात, जे वास निर्माण करू शकतात.

मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता : जास्त वेळेपर्यंत वापरलेले किंवा अव्यवस्थित नॅपकिन आरामदायक नसतात. व काही महिलांना पाळीदरम्यान शारीरिक अस्वस्थता आणि मानसिक ताण वाटतो, जो सॅनिटरी नॅपकिनच्या वापरामुळे आणखी वाढू शकतो.

नॅपकिनचा अयोग्य आकार आणि फिट: चुकीच्या आकाराचे पॅड वापरल्याने ते शरीरावर घासले जाऊ शकते, त्वचेवर घर्षणामुळे जखम व इन्फेक्शन होऊ शकते.

अतिरिक्त रसायनांचा वापर : काही सॅनिटरी नॅपकिन्समध्ये सुगंध, रंग किंवा ब्लीचिंग एजंट्स असतात. हे पदार्थ त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात, तीव्र अॅलर्जी किंवा इरीटेशन निर्माण करू शकतात. 

विघटन न होणारे प्लास्टिक : सॅनिटरी नॅपकिन्स मध्ये प्लास्टिक किंवा सिंथेटिक साहित्य असल्यास ते निसर्गात विघटित होण्यास खूप वेळ घेतात. हे पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते.

मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरासंबंधी दुष्परिणाम टाळण्यासाठी पुढील काही गोष्टी ध्यानात ठेवा

नॅपकिन नियमितपणे बदलणे : साधारणत: ४ ते ६ तासांच्या अंतराने नियमितपणे नॅपकिन बदलणे आवश्यक आहे. जास्त स्राव असल्यास, दर ३ ते ४ तासांनी सॅनिटरी नॅपकिन बदलावा.

वैकल्पिक उत्पादने वापरणे : बाजारात उपलब्ध असलेले जैविक आणि पर्यावरणास अनुकूल असे सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे काही दुष्परिणामांपासून बचाव होण्यास मदत मिळू शकते.

स्वच्छता राखणे : सॅनिटरी नॅपकिन वापरताना स्वच्छतेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पुनर्वापर करण्यायोग्य सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्यास, ते पूर्णपणे स्वच्छ करून आणि नंतर वापरावे. यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.

योग्य सॅनिटरी नॅपकिनची निवड व त्याचा योग्य वापर शिकणे : नॅपकिनचा आकार आणि शोषक क्षमतेवर नॅपकिनची निवड करावी. हलकी पाळी असल्यास छोटा पॅड, आणि जास्त प्रमाणात पाळी असल्यास मोठा पॅड वापरण्यास घ्यावे. 

सुरक्षित पर्यायांची निवड करणे : सॅनिटरी नॅपकिनच्या वापराने त्रास उद्भवत असल्यास त्याऐवजी पर्यावरणास कमी हानी करणारे पर्याय, जसे की बायोडिग्रेडेबल, केमिकल फ्री सॅनिटरी नॅपकिन्स, मेन्स्ट्रुअल कप यासारख्या इतर सुरक्षित व आरामदायक पर्यायांची निवड करणे आवश्यक आहे.

नॅपकिन्सची योग्य विल्हेवाट लावणे : सॅनिटरी नॅपकिन्सची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास पर्यावरणाला हानी पोहोचू शकते. पॅड्स योग्य प्रकारे पॅक करून कचरा डब्यात टाकावे.

आर्थिकदृष्ट्या विचार : सॅनिटरी नॅपकिनचा नियमित वापर आर्थिकदृष्ट्या महागडा होऊ शकतो. नॅपकिन्स सोयीस्कर आणि स्वस्त नसलेल्या ठिकाणी काही महिलांना हा खर्च कठीण होऊ शकतो. यासाठी पर्यावरणास अनुकूल आणि दीर्घकाळ टिकणारे उत्पादने, जसे की मेन्स्ट्रुअल कप किंवा रीयुसेबल पॅड्स यांचा विचार केला जाऊ शकतो.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर