मोगरा फुलला...

मनात जेव्हा विचारांचे वादळ उठते, तेव्हा या विचारांच्या गुंत्यात मन भरकटत जाते. आणि या विचारांच्या गुंत्यातून बाहेर येण्यासाठी देवाप्रती असलेल्या भक्तीचा मार्ग आपल्याला पैलतीराला नेतो.

Story: शब्दगीते |
08th March, 12:11 am
मोगरा फुलला...

मराठी भाषेला संतांची संपन्न परंपरा आहे. या संतांनी आपल्या साहित्यातून, अभंगातून समस्त मानवजातीला आपल्या अमृतमय वाणीतून चांगला संदेश देत सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग सांगितला. निसर्ग आणि देवाप्रती भक्ती त्यांच्या अभंगातून ओसंडून वाहताना आपल्याला दिसून येते. त्यांच्या साहित्यात निसर्ग, झाडे, पाने, फुले, पक्षी यांचा संदर्भ नेहमीच प्रतीत होत असतो. आपल्या साध्या सोप्या वाणीतून जनजागृती करताना त्यांनी साध्या सोप्या उदाहरणातून समाजाला मोठा अर्थ समजावून सांगितला आहे. त्यामुळे मराठी भाषेतील संतांचे साहित्य हे आजही तितकेच मनाला आनंद देणारे आणि विचार करायला लावणारे आहे. 

मोगरा फुलला... मोगरा फुलला 

फुले वेचिता बहरू, कळीयांसी आला 

संत ज्ञानेश्वर यांची ही सुंदर रचना संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दिदींच्या दैवी आवाजात स्वरबद्ध करताना ही रचना साहित्यात अजरामर केली. संत ज्ञानेश्वर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या लता मंगेशकर यांचा त्रिवेणी संगम जेव्हा होतो, तेव्हा निर्माण झालेली कलाकृती ही किती दैदिप्यमान असेल, याची कल्पना आपल्याला ही रचना ऐकताना आल्याशिवाय रहात नाही. आणि मनातल्या मनात आपण नकळत या त्रिमूर्तींना साष्टांग दंडवत घालतो !.. 

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अभंगात अगदी थोडक्या शब्दांत गहन अर्थ सांगितला आहे. हा अर्थ समजून घ्यायला त्यांच्या रचनेतील शब्दांशी एकरूप व्हावे लागते, तेव्हाच या शब्दांच्या मागे असलेला भावार्थ आपल्याला उमगून येतो. मराठी भाषेतील संत साहित्याची हीच तर खासियत आहे!

मोगरा फुलला... या रचनेमध्ये मोगरा हा प्रतिकात्मक आहे. 

शुभ्र रंग हा जसा स्वच्छतेचे प्रतीक आहे, तसाच शुद्ध, निर्मळ आहे.  मोगरा हे परमेश्वराप्रती भक्ती, प्रेम यांचे प्रतीक आहे. परमेश्वराप्रती भक्ती, प्रेम याला मोगऱ्याच्या शुभ्र फुलाची उपमा संत ज्ञानेश्वर देतात. मोगऱ्याचे फूल हे जसे शुभ्र धवल रंगाचे आहे, तशीच परमेश्वराप्रती आपली श्रद्धा निर्मळ असावी असे सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, की फुले वेचिता बहरू काळियांसी आला... इथे मोगऱ्याचे फूल हे ईश्वराप्रती भक्तीचे प्रतीक असून ईश्वराप्रती भक्तीत समरसून जाताना, आपल्या मनातील भक्तीलाही बहर आला आहे.

आपल्या मनातील भक्तीभाव हा देवासमोर प्रगट करताना आपल्या मनातील सुप्त अवस्थेत असलेल्या भक्तीभावाला कळ्यांची उपमा या रचनेमध्ये दिलेली आहे. आणि एकदा का आपण परमेश्वराप्रती लीन झालो, की मग त्याच्या भक्तीमध्ये आपण इतके गुंतून जातो,  (संत ज्ञानेश्वर यांच्या रचनेत ‘फुले वेचताना’ ही उपमा दिली आहे) की त्यामुळे परमेश्वराप्रती असलेले आपले हे प्रेम अधिक बहराला येते.

कोणत्याही गोष्टीची सुरुवात किंवा आरंभ हा लहान बिंदूतून होत असतो. बीज अगदी लहान असते परंतु जेव्हा अंकुरते तेव्हा त्या लहानशा बीजामध्ये ऊर्जेचा जो प्रचंड स्तोत्र असतो त्या प्रचंड ऊर्जेच्या सहाय्याने त्या इवल्याशा बीजाचा कालांतराने मोठा वटवृक्ष बनतो. 

ही शक्ती त्या इवल्याशा बीजात आधीपासूनच सामावलेली असते. परंतु ही शक्ती जेव्हा ते बीज अंकुरते तेव्हाच प्रदर्शित होते. एखादी संस्था जेव्हा नावारूपाला पावते, किंवा एखादी व्यक्ती तिच्या कार्याने नावारूपाला येते, तेव्हा आरंभीच्या काळात तिचे विश्व हे शून्यातूनच निर्माण होते. तसेच भक्तीरूपी ज्ञानाची सुरुवात जरी इवल्याशा प्रयत्नाने किंवा छोट्याशा आरंभाने झाली तरी, पुढे हीच भक्ती विशाल रूप धारण करते. आणि आपल्या मनात या भक्तीरूपी ज्ञानाचा अथांग सागर भरून राहतो. याचे उदाहरण संत ज्ञानेश्वर अगदी सोप्या भाषेत सांगताना म्हणतात...

इवलेसे रोप लावयिले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी...

माणसाच्या मनाची शक्ती ही अशीच अनाकलनीय आहे. प्रचंड गूढता या मनामध्ये सामावून राहिलेली आहे. मन कधी पिसाप्रमाणे हलके होऊन तरंगत राहते, तर कधी लोखंडी साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत राहते. कधी वज्राप्रमाणे कठीण होते तर काही लोण्यासारखे मऊ होते. कधी ते अथांग होऊन आकाशात विहरत राहते तर कधी खोल खोल दरीत भरकटत राहते. मनाच्या या कित्येक अवस्थेतून आपली मार्गक्रमणा होत असते. मन हा दोन अक्षरी शब्द असला तरी त्याची व्याप्ती ही फार मोठी आहे. 

या मनात जेव्हा विचारांचे वादळ उठते, तेव्हा या विचारांच्या गुंत्यात मन भरकटत जाते. आणि या विचारांच्या गुंत्यातून बाहेर येण्यासाठी देवाप्रती असलेल्या भक्तीचा मार्ग आपल्याला पैलतीराला नेतो. मनाच्या गाभाऱ्यात जेव्हा आपण भक्तीची ज्योत प्रकाशमान करतो, तेव्हा  त्या भक्तीभावात आपण भक्तीची आराधना करत मनाच्या गाभाऱ्यात असलेल्या देवाशी एकरूप होऊन जातो आणि आपली भक्ती ही विठ्ठलाच्या पायाशी अर्पण करतो. 

मनाचिये गुंती गुंफियला शेला 

बाप रखुमादेविवरी विठ्ठले अर्पिला 

संत ज्ञानेश्वर यांनी हा भावार्थ आपल्या रचनेत अगदी तंतोतंत शब्दबद्ध केला आहे. कुठेही शब्दांचा फापटपसारा नाही की वेल्हाळपणा नाही. अगदी मोजक्या आणि माफक शब्दांत सांगण्याची ताकद संत ज्ञानेश्वर यांच्या या रचनेमध्ये आपणास पहावायला मिळते.


कविता आमोणकर