रियुनियन पार्ट २ - खिशातलं फूल

मैत्री जुनी असली तरीही त्या व्यक्ती काही जुन्या असतात असे नाही… म्हणजे ही मैत्री पुनप्रस्थापित वगैरे न होता एका दृष्टीने अगदी नव्यानेच झाल्यासारखी असेल, एखाददुसरे धागेदोरे काय ते जुने!

Story: आवडलेलं |
01st March, 12:11 am
रियुनियन पार्ट २ - खिशातलं फूल

हल्लीच एक मजेशीर घटना घडली. झालं असं, की माझ्या वर्गात एक मुलगा होता. तसे आम्ही फार चांगले मित्र होतो असे नाही पण एकमेकांशी बोलायचोच नाही असेही नाही. शाळेनंतर तसा फार संपर्क नव्हताच आणि गेल्या ६-७ वर्षांत तर अजिबातच नाही. शाळेतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी तसा आयुष्यभर संपर्क राहतोच असे नाही. दहावी होऊन अमुक वर्षे झाली, की मग अचानक कुणाच्यातरी डोक्यात रियुनियन वगैरे करायची कल्पना येते. त्यातून मग पुन्हा संपर्क सुरू होतो, व्हॉट्सअॅप ग्रुप वगैरे केला जातो. आमच्या पालकांची पिढी सध्या या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून आपले जुने मित्रमैत्रिणी शोधून ग्रुप तयार करून नव्याने मैत्री प्रस्थापित करायच्या प्रयत्नात असतात. जबाबदारीतून मोकळी झालेली किंवा होऊ घातलेली ही मंडळी आता आपापल्या जोडीदारांबरोबर नाश्ता, जेवण, सिनेमे, खरेदी अशा वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतात, एकत्र वेळ घालवत असतात. जबाबदारी निभावण्याच्या वयात तुटलेला संपर्क पुनप्रस्थापित होत असतो. ही एकूण संकल्पनाच मला फार आवडते. तर, माझ्या वडिलांचा शाळेचा ग्रुप पुन्हा तयार झाला आणि सुरुवातीला सांगितलेल्या, माझ्या वर्गातल्या मुलाचे वडील त्यांच्या या ग्रुपमध्ये आहेत हा शोध आम्हाला लागला. आम्ही शाळेत असताना मात्र ही गोष्ट आम्हाला कुणालाच माहीत नव्हती. माझ्या बोलण्यात या मुलाचे नाव अनेकदा येत असावे पण तेव्हा हा आपल्या मित्राचा मुलगा आहे याची माझ्या वडिलांना कल्पनाही नव्हती. आता मात्र त्यांच्या बोलण्यात जेव्हा त्यांच्या मित्राचे नाव आले, तेव्हा मी एकदोनदा, “म्हणजे अमुक अमुकचे बाबा ना?” असा प्रश्न विचारला आणि हा योगायोग अधोरेखित केला. 

सहज मनात विचार आला, शाळेत मी जशी होते, त्यापेक्षा आत्ता कितीतरी वेगळी आहे! मग असे अमुक वर्षांनंतर जेव्हा मित्रमैत्रिणी संपर्कात येत असतील तेव्हा ती मैत्री जुनी असली तरीही त्या व्यक्ती काही जुन्या असतात असे नाही.. म्हणजे ही मैत्री पुनप्रस्थापित वगैरे न होता एका दृष्टीने अगदी नव्यानेच झाल्यासारखी असेल, एखाददुसरे धागेदोरे काय ते जुने! 

रावेतकर यांची जाहिरात ‘रियुनियन पार्ट २’ बघितली आणि वरच्या विचाराला धरून अजून काहीतरी हाती आले. जुने सवंगडी समाजमाध्यमांवर तर भेटतातच, त्यातूनच मग प्रत्यक्ष भेटीगाठी ठरतात आणि नंतर नियमित होत राहतात. पण नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींच्या कॉम्प्लेक्समध्ये अशी अवचित जुन्या मैत्रिणीशी गाठ पडलेला मित्र अगदी त्यांच्या कॉलेजच्या दिवसांइतका वेंधळा होतो अशी एकूण संकल्पना. अनेक वर्षे बाहेर राहिल्यानंतर आपल्या शहरात ती परतली आहे आणि ती जिथे राहायला आली आहे त्याच परिसरात पण वेगळ्या इमारतीत तिचा हा कॉलेजमधला मित्र राहतो आहे. नुसता विचार करायलादेखील ही कल्पना किती सुखद वाटते, नाही? ही एक साधीशी घटना पण यातून कितीतरी शक्यतांची इवलीशी रोपे बघणाऱ्यांच्या मनात रुजतात! मित्र आणि मैत्रीण म्हटले, की साहजिकच काही कधीच न बोलून दाखवलेल्या भावना, मनातल्या मनात जपून ठेवलेल्या इच्छा ओघाने आल्याच! या इच्छा जितक्या निरागस तितक्याच निरूपद्रवी पण तरीही याही वयात हुरहुर लावणाऱ्या आणि ती हुरहुर बघणाऱ्यांपर्यंत अगदी हुबेहूब पोहचवणाऱ्या! ती, नेहमीसारखीच सगळे कळूनसुद्धा नामानिराळी आणि तोही तसाच वेंधळा, अनेक वर्षांपूर्वी होता तसाच खिशात गुलाबाचे फूल घेऊन निघालेला आणि ते न देताच परत निघालेला. फरक फक्त एवढाच की; यावेळी परतताना, त्या न दिलेल्या फुलाबरोबरच अनेक शक्यता, आशा त्याच्या खिशात घेऊन चाललेला. खरेतर, ही एक जाहिरात. त्यात काही या इतक्या गोष्टी मांडल्या नाहीत; पण ज्या मांडल्या आहेत त्या अशा पद्धतीने मांडल्या आहेत, की आपले मन आपोआपच पुढचे-मागचे संदर्भ गोळा करते. एका कॉम्प्लेक्सचे काय काय फायदे असू शकतात हे दाखवताना असा एखादा गोड विषय मांडायची कल्पकता वाखाणण्याजोगीच वाटली मला. मोहन जोशी आणि नीना कुलकर्णी यांच्या अभिनयाबद्दल मुद्दाम वेगळे लिहायला नकोच. 

शाळेच्या विषयापासून हे सुरू झाल्यामुळे परत तिथेच येते... आम्ही शाळेत असताना निबंधासाठी एक विषय हमखास दिला जायचा, ‘जाहिराती: शाप का वरदान?’ अशा प्रकारचे निबंध लिहिण्याची एक युक्ती होती, कोणतीही एक बाजू न लिहिता दोन्ही बाजू मांडून शेवटी, ‘आपण कशातून काय घ्यायचे, हे आपले आपण ठरवावे..’ असे एखादे वाक्य लिहून शेवट करायचा. आज मात्र मी म्हणू शकते, इतक्या सुंदर जाहिराती असतील, त्या बघण्यासाठी युट्यूब हाताशी असेल तर ते वरदानच... अगदी नक्की!


मुग्धा मणेरीकर, फोंडा