हौसेला मोल नसतं

लग्न सोहळा म्हणजे तरुण मुलामुलींना सामाजिक धार्मिक बंधनात एकत्र बांधून ठेवणारा एक संस्कार आहे, ती एक प्रथा आहे पण त्यामधे जर लग्नाचं पॅकेज कितीचं घ्यायचं, दागदागिने यावर किती खर्च करायचा याची ठरवाठरवी करावी लागत असेल तर तो संस्कार न राहता एक व्यावहारिक सोपस्कार होतो.

Story: मनातलं |
9 hours ago
हौसेला मोल नसतं

सणवार, उत्सव, समारंभ साजरे करणे आणि ते अनुभवणे हे सारे आपल्या संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे. आपल्या संस्काराचे प्रतीक आहेत. आणि पिढ्यानपिढ्या आपण ते पुढच्या पिढीकडे संपूर्द करत त्याची जपणूक करत असतो. सणवाराशिवाय आपले जीवन नीरस, कंटाळवाणे, एकसूरी होऊन जाईल. नेहमीच्या दैनंदिन व्यवहारात काहीतरी असे आनंदी वातावरण निर्माण करणारे, उत्साहवर्धक असे टॉनिक आपल्या मनाला आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक जण हे सण समारंभ साजरे करतात. 

आजकाल तर लोकांमध्ये प्रत्येक गोष्टीचा एखादा इव्हेंटमध्ये रूपांतर करण्याचा कल दिसतो. कपडेलत्ते, दागदागिने, नवीन घर, नवीन गाडी या सर्वाचे लोकांसमोर प्रदर्शन करून त्यातून आपले स्टेटस निर्माण करायची जणू चढाओढ लागलेली दिसते. एखाद्याने आपल्या मुलीच्या लग्नात दहा लाख खर्च केला तर दुसराही तसाच विचार करतो आपली ऐपत आहे नाही याचा त्या वेळी त्याला जणू विसर पडतो इरिशिरीने तोही आपली हौसमौज भागवून घेत नको तितका खर्च करताना दिसतो. आपण कुठे कमी पडायला नको आपल्या मुलांची बायकोची सगळी हौसमौज पुरवली पाहिजेत यासाठी पाहिजे तितके मोल चुकवले जाते त्यातून मिळणारा आनंद हा जास्त मोलाचा असतो. त्यातल्या भावना खूप महत्त्वाच्या असतात त्या जपण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला म्हणजे खूप मोठे समाधान मिळते असे नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतून पण आनंद मिळवता येतो तो शोधता आला पाहिजे. एखादी गोष्ट आपण करतो त्यामागे आपल्या मनाचे समाधान होईल ही अपेक्षा असते ती गोष्ट हौसमौज करताना अभिप्रेत असते. आपली हौसमौज भागवून घेणे ही त्यामागची इच्छा असते. 

स्वतःचे लग्न अगदी साध्या पद्धतीने झाले असेल किंवा रजिस्टर झाले असेल तर साहजिकच आपल्या मुलांची लग्ने मात्र आपण थाटामाटात साजरी करूया अशी अपेक्षा तिथे ठेवली जाते आणि भरपूर खर्च करण्यासाठी पैसाही हातात खेळत असेल, तर अशा हौशेसाठी खर्च करायला काही हरकत नाही पण बळेबळे उधार उसनवारी करून जर ती हौसमौज पुरवली जात असेल, तर त्याचे परिणाम नंतर भोगावे लागू शकतात. मैत्रिणीच्या लग्नात किंवा बहिणीला चाळीस पन्नास तोळे सोने घालून लग्न करून दिलेले पाहून नक्कीच एखाद्या मुलीला तशी मनात इच्छा निर्माण होणे साहजिकच आहे. पण त्यापुढे मग तिने आपल्या आईवडिलांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे. हौसमौज पुढे आयुष्यात करता येईलच पण त्यासाठी आईवडिलांना वेठीस धरणं चुकीचं आहे. 

जी गोष्ट साध्या पद्धतीनेही करता येते ती फक्त शोसाठी, लोकांना दाखवण्याची हौस असेल तर तिथे पैशाचा चुराडा होत असतो. लहानपणी मी वाड्यात राहायची तेव्हा तिथे कुणाच्या घरी लग्न कार्य साखरपुडा काहीही असलं की आमच्या वाड्यातच मांडव घातला जायचा. थोडेफार लायटिंग, बसायला खुर्च्या किंवा जाजम अंथरली जायची. आलेले वऱ्हाडी मंडळी तिथेच उतरायची. जेवणं, खाणं, पिणे सारे त्या मांडवातच मदतीला शेजारचे लोक असायचे. आपल्या घराचे कार्य समजून सगळे सामील व्हायचे. खर्च करायला जास्त पैसे हातात नसतील पण प्रत्येक गोष्ट मात्र हौसेने केली जायची. आता लग्न ठरलं की आधी हॉल बुक केला जातो. लग्नाआधी प्रीवेडिंग शूटिंगसाठी ठिकाण ठरवलं जातं. हॉल एकच नसतो, तर हळदीचा हॉल वेगळा, मेहंदीला वेगळा, साखरपुडयाचा वेगळा, संगीत म्हणून नव्याने एक प्रोग्राम सुरू झालाय, तिथे मग गाणारे वादक यांस आमंत्रण, जेवणाच्या सोईसाठी मोठमोठे केटरर बोलावले जातात. खण्यापिण्याचे अनेकविध प्रकार ठेवले जातात. लग्न सोहळा झाल्यावर रिसेप्शनही असते. त्यासाठी फार्म हाउस किंवा ओपन गार्डन घेतले जाते. फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग, मोठमोठे सेट उभारले जातात. 

हे सारे एखाद्या मोठ्या इव्हेंटला लाजविल असे बघायला मिळते. हे सर्व करायची पालकांची, नातेवाईक लोकांची हौस असते. ती पूर्ण करताना मूळ लग्नाचा हेतु काय? त्याचा विचार बाजूलाच राहतो. अंबानीसारख्यांनी असे समारंभ करणं त्यांच्या प्रतिष्ठेला शोभा देते. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी केलं तर ठीक आहे पण ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी आपली हौसमौज कशी भागवून घ्यायची? कारण त्याच्या मर्यादा वाढतच चालल्या आहेत. दोन्ही पक्षांनी अर्धा अर्धा खर्च केला तर ठीक आहे पण मग कधी कधी त्यासाठी मुलीच्या घरच्यांकडून अपेक्षा ठेवल्या जातात. लग्न सोहळा म्हणजे तरुण मुलामुलींना सामाजिक धार्मिक बंधनात एकत्र बांधून ठेवणारा एक संस्कार आहे, ती एक प्रथा आहे पण त्यामध्ये जर लग्नाचं पॅकेज कितीचं घ्यायचं, दागदागिने यावर किती खर्च करायचा याची ठरवाठरवी करावी लागत असेल तर तो संस्कार न राहता एक व्यावहारिक सोपस्कार होतो. त्यात तुमची हौसमौज तुम्ही भागवून घेत असता. पालकांनाही मिरवायची हौस असते. हे एक निमित्त मिळते पण यातून तुम्हाला जे हवे ते साध्य होते का? याचा विचार कुणीच करत नाही. कारण शेवटी हौसेला मोल नसतं. हेच खरं.


प्रतिभा कारंजकर, 
फोंडा