महिला दिनानिमित्त महिलांच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या या आरोग्यविषयक त्रासांवर जागृती करून, त्यांना पुढे आणण्याचा, सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करूयात.
महिला सशक्तीकरणासाठी दरवर्षी होत असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिवसाची यंदाची थीम ‘Accelerate Action’ अशी ठेवण्यात आल्याचे समजले. तेव्हापासून मनात विचार येत होते की याचा नेमका अर्थ काय? तर याचा मुख्य उद्देश महिलांना समानता देण्याची प्रक्रिया वेगाने करणे असा असला तरी, फक्त सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्येच नाही तर आरोग्य क्षेत्रातही महिलांना येणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करणे असाही आहे.
जन्मापासूनच महिलांमध्ये विविध शारीरिक बदल घडत असतात. आयुष्यात मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती या त्रिकोणी घटनांना महिलांना तोंड द्यावे लागते. बहुतेक वेळा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे महिला वर्ग आपल्या आरोग्याच्या समस्या सहजपणे व्यक्त करणे टाळतात.
पाळीचा आज पहिलाच दिवस. पोटातल्या कळा अगदी डोक्यापर्यत पोहचलेल्या. नेमकी आजच इंटरव्यू. मग काय, तशीच कळा सोसत गेले कशीतरी तिथे. अशा असंख्य वेळा महिला वर्ग आरोग्य समस्यांना काखेत घेऊनच अन् जीवनातल्या कठीण प्रसंगांना सामोऱ्या जातात. हाच मुद्दा लक्षात घेऊन महिला दिनानिमित्त महिलांच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या या आरोग्यविषयक त्रासांवर जागृती करून, त्यांना पुढे आणण्याचा, सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करूयात.
महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख आरोग्य समस्या
कर्करोग : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, महिलांना स्तन, गर्भाशय, कोलोरेक्टल, फुफ्फुस आणि त्वचा कर्करोग होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. या कर्करोगांबद्दल आधीच माहिती असल्यास, त्यांची लक्षणे समजल्यास, जाणून घेतल्यास त्यांना रोखण्यास किंवा लवकर शोधण्यास मदत होते. यामुळे उपचार करणे सोपे जाऊ शकते.
गर्भधारणेदरम्यानच्या समस्या : आपल्या देशात प्रसूती वेळेस होणाऱ्या महिलांचा मृत्युदर अजूनही जास्त आहे. युनिसेफच्या घटना अहवालात असे म्हटले आहे की गर्भधारणेशी संबंधित समस्या ह्या महिलांमध्ये मृत्युच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यासोबत या दरम्यान झालेले शारीरिक त्रास तसेच ताणतणावही पुढे जास्त काळापर्यंत सतावू शकतात.
पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम: या हार्मोनल विकारात अंडाशयांवर परिणाम होतो. महिलांमध्ये होर्मोनल पातळीत बदल झाल्यामुळे पॉलीसिस्टिक अंडाशय असू शकते. यामुळे मासिक पाळी नियमित होत नाही किंवा नेहमीपेक्षा जास्त काळ चालू राहू शकते. यासोबत शरीरावर जास्त केस येणे, पुरळ येणे, केस गळणे दिसून येते आणि प्रामुख्याने गर्भधारणा होण्यास अडचण येते.
अकाली रजोनिवृत्ती : ही स्थिती ४० वर्षांच्या आधी येऊ शकते ज्यात स्त्री रजोनिवृत्तीच्या वास्तविक वयाच्या खूप आधी अंडाशयांचे सामान्य कार्य गमावते. अकाली रजोनिवृत्तीमध्ये, अंडाशय सामान्य प्रमाणात इस्ट्रोजेन तयार करणे थांबवते किंवा नियमितपणे अंडे सोडले जाते.
लठ्ठपणा : लठ्ठपणा ही केवळ एक सौंदर्यप्रसाधनाची चिंता नसून एक वैद्यकीय समस्या देखील आहे जी महिलांना हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि विविध प्रकारचे कर्करोग यासारख्या इतर आजारांचा आणि आरोग्य समस्यांचा धोका निर्माण करते.
मूत्रमार्गाचा संसर्ग : मूत्राशय आणि मूत्रमार्ग हे मूत्रमार्गातील सर्वात जास्त संक्रमित भाग आहेत. पुरुषांपेक्षा महिलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. मूत्राशयाचा संसर्ग अत्यंत वेदनादायक आणि त्रासदायक असू शकतो. तसेच, जर मूत्रपिंडात पसरला तर त्याचे अजून परिणाम होऊ शकतात.
ऑस्टियोपोरोसिस : हा महिलांमध्ये जास्त आढळणारा आजार आहे ज्यामध्ये हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात. यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. शरीरातील कॅल्शियम व प्रोटीन म्हणजे ‘बोन मिनरल डेन्सिटीची’ झालेली कमतरता याचे मुख्य कारण असते. याचा सर्वात जास्त परिणाम पाठीचा कणा, खुबा व मनगटाची हाडे यांवर होतो.
लैंगिक संक्रमित आजार : सुरक्षित लैंगिक पद्धती व स्वच्छतेबद्दल जास्त जागरूक नसल्याने योनीच्या अस्तराची नाजूकता वाढू शकते. यामुळे महिलांना सिफिलीस, गोनोरिया, एचआयव्ही आणि क्लॅमिडीया सारख्या लैंगिक संक्रमित आजारांचा धोका जास्त असतो.
अशक्तपणा : आहारातून व्हिटॅमिन बी १२, झिंक, फॉलिक अॅसिड आणि लोहाच्या कमतरतेमुळे १५-४९ वयोगटातील ५७% महिलांना अशक्तपणाचा त्रास होऊ शकतो.
वरील शारीरिक आरोग्य समस्यांसोबत महिलांमधील मानसिक आरोग्य समस्यांवरही लक्ष देणे गरजेचे आहे.
चिंता आणि नैराश्य : हार्मोनल चढउतार, सामाजिक दबाव आणि जीवनातील बदलांमुळे महिलांना चिंता आणि नैराश्याचा अनुभव येण्याची शक्यता दुप्पट असते.
प्रसूतिनंतर येणारे नैराश्य : बाळंतपणानंतर अनेक नवीन मातांना मानसिक आरोग्याच्या आव्हानांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचे आरोग्य तसेच बाळाची काळजी घेण्याची क्षमता दोन्ही प्रभावित होते.
ताण-संबंधित विकार : काम आणि जीवनातील संतुलन, जबाबदाऱ्या आणि सामाजिक अपेक्षा यामुळे महिलांमध्ये ताणतणावाची पातळी वाढते व त्यांच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो.
जागरूकतेचा अभाव, लक्षणांचा चुकीचा अर्थ, उशिरा निदान यामुळे अनेक महिलांच्या आरोग्य स्थितीचे निदान होत नाही. तसेच अनेक ठिकाणी महिलांना आर्थिक अडचणी, सामाजिक निर्बंध आणि अपुऱ्या आरोग्यसेवा सुविधा यासारख्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी व महिलांना त्यांच्या गरजेनुसार वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अधिक जागरूकता, सक्रिय आरोग्यसेवा उपाययोजना आणि धोरणात्मक बदल प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहेत. कारण एकच.. महिलांचे आरोग्य महत्त्वाचे आहे!!
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर