२४ मार्च पासून तीन दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. २६ रोजी अर्थसंकल्प होणार सादर
पणजी : अर्थसंकल्पाला आता जेमतेम एक महिना राहिला असल्याने खात्यांकडून अर्थसंकल्पाची तयारी जोरात सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ८० टक्के खात्यांच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत. खात्याच्या मंत्र्यांना आढावा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री अर्थसंकल्पातील तरतूदींचा आढावा घेणार आहे. खातेप्रमुखांकडून ही माहिती मिळाली.
अधिवेशन २४ मार्च ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. तर २६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थसंकल्पाला आता एक महिना असल्याने खात्यांकडून आता अंतिम आढावा घेतला जाणार आहे. अर्थ खात्याकडून विविध खात्यांकडील ८० टक्के बैठका पूर्ण केल्या आहेत. गोवा चेंबर, लघु उद्योग संघटना, टीटीएजी, बार अॅन्ड रेस्टॉरंट या संघटनांच्या प्रतिनिधीबरोबर आता मुख्यमंत्री बैठका घेणार आहेत. बैठकीत या सर्व संघटना आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये सादर केला गेला. केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर फेब्रुवारीमध्येच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. तरी यंदा खात्यांच्या योजना व निधीच्या तरतूदीसाठी वेळ मिळावा, म्हणून अर्थसंकल्पाला उशीर झाला. पर्यटन, मच्छीमार, कृषी यातील केंद्रीय योजनांची राज्याच्या अर्थसंकल्पात पुनरावृत्ती होउ नये, याचीही दक्षता घेण्यात येणार आहे. यंद दहावी व सहावीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही होत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यवाहीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.