विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सोहळ्याचे आयोजन, सत्कार
पत्रकार परिषदेत माहिती देताना नरेश सावळ, डॉ. रामा गावकर, गोपाळ मोरजकर, किरण गोवेकर, प्रसाद नाईक, मिलिंद तेली व इतर.
डिचोली : डिचोलीच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडणारा डिचोलीचा भतग्राम महोत्सव यावर्षी १ व २ मार्च असे दोन दिवस डिचोलीतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार सोहळा तसेच भतग्राम भूषण पुरस्कार आदी कार्यक्रम होतील, अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आमदार नरेश सावळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. रामा गावकर, गोपाळ मोरजकर, किरण गोवेकर, प्रसाद नाईक, मिलिंद तेली, महेश्वर परब, पापु मयेकर, दिलीप वरक, निशांत चणेकर आदी उपस्थित होते. डिचोली बचाव अभियान डिचोली सुंदर व स्वच्छ व्हावा यासाठी काम करत आहे. तसेच डिचोलीत घडणाऱ्या वाईट व अन्यायकारक घडामोडींवरही काम करते. डिचोलीची संस्कृती कलेचे जतन व येथील कलाकारांना व्यासपीठ देण्याचे काम आतापर्यंत भतग्राम महोत्सवाने केले आहे. याच अनुषंगाने महोत्सवाचे यावर्षी आयोजन करण्यात आले आहे.
दि. १ मार्च रोजी रोजी ढोलताशा पथकाच्या साथीने व दिंडीने छत्रपती शिवाजी मैदानावर सर्व मान्यवरांचे पदार्पण होणार. त्यानंतर मैदानावर भव्य असा या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार. या सोहळ्यास कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आमदार जीत आरोलकर, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, सरपंच, नगरसेवक, पंचसदस्य व इतरांची उपस्थिती लाभणार. या सोहळ्यानंतर डिचोली मतदारसंघातील हायस्कुलांच्या विद्यार्थ्यांकडून विविध कला सादरीकरणाचे कार्यक्रम होणार आहेत.
दि. २ मार्च रोजी संध्या. ६.३० वा. समारोप कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यास पर्यटनमंत्री रोहन खंवटे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सभापती राजेश पाटणेकर आदी उपस्थिती राहणार आहेत. या सोहळ्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध कलाकारांचा बॉम्बे म्युझिकल नाईटस् हा संगीताचा कार्यक्रम होणार असून त्यात सुर नवा ध्यास नवा फेम रवींद्र खोमणे, पार्श्वगायिका अक्षता सावंत, सूत्रनिवेदक व मिमिक्री कलाकार राहुल कदम सहभाग घेणार आहेत. संकल्प डान्स क्रिएशन्स अकादमी मुंबई यांच्यातर्फे नृत्याचा आविष्कार सादर केला जाणार आहे.
‘भतग्राम भूषण’, ४० जणांचा सत्कार
या भतग्राम महोत्सवात भतग्राम डिचोलीत उत्कृष्ट कामगिरी बजावत योगदान दिलेल्या एका नामवंत व्यक्तिमत्त्वाला ‘भतग्राम भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उद्घाटन व समारोप सोहळ्यात प्रत्येकी २० असे ४० गौरवास्पद कामगिरी बजावलेल्या ज्येष्ठ व युवांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे नरेश सावळ यांनी सांगितले.