कांदोळीत फ्लॅटला आग लागून दीड लाखाचे नुकसान

अरुंद रस्त्यावरच्या पार्किंगमुळे 'अग्निशमन' ला व्यत्यय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd February, 12:24 am
कांदोळीत फ्लॅटला आग लागून दीड लाखाचे नुकसान

म्हापसा : वोर्डा- कांदोळी येथील एका इमारती मधील फ्लॅटला आग लागल्याने दीड लाखाचे नुकसान झाले. अरुंद रस्ता त्यातच रस्त्यावर पार्क केलेल्या चार चाकी वाहनांमुळे अग्निशमन दलाच्या वाहनाला घटनास्थळी जाण्यास अडथळा निर्माण झाला. 

ही दुर्घटना शनिवारी सकाळी ९.२५ च्या सुमारास घडली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहणारी साहीलटो तोनशालकी नामक भाडेकरू कुटुंब घर बंद करून कामावर गेले होते. त्यानंतर अचानक फ्लॅटला आग लागली. 

हा प्रकार समजल्यावर फ्लॅटच्या मालकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाला पाचारण केले. माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र वाटेत अरुंद रस्त्यावर चार चाकी गाड्या पार्क केल्या होत्या. ही वाहने बाजूला करत घटनास्थळी पोहोचण्यास अग्निशमन दलाला बराच उशीर झाला. 

तोपर्यंत फ्लॅट मालकाने शेजाऱ्यांच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा फोडला व प्रसंगावधान राखत प्रथम गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यानंतर प्रदीप नाईक, दिनेश गावडे, राजेश पिरणकर, दत्तप्रसाद सिनारी व श्रीकांत सावंत या पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. 

या आगीत दोन फ्रीज, कपाटे, कॉट, ५ हजार रुपये रोख रक्कम व इतर घरगुती वस्तू जळून खाक झाल्या. कळंगुट पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.       

हेही वाचा