प्रस्तावित मेगा प्रोजेक्ट्स, बेकायदा डोंगर कापणी आणि इतर महत्त्वाच्या मुद्यांवर झाला ऊहापोह
पेडणे : आज कोरगाव, पेडणे येथे पंचायतीत ग्रामसभा पार पडली. यात कचऱ्याचा मुद्दा चर्चेस आला. गावात ठिकठिकाणी कचरा टाकून विद्रूपीकरण करणाऱ्यांवर पंचायतीने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली. तसेच गावात असलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी देखील पंचायतीने योग्य पावले उचलावीत अशीही मागणी लोकांनी केली.
गावात अनेक मेगा प्रोजेक्ट्स येत आहेत. त्यांना वाट करून देण्यासाठी डोंगर कापणी सुरू आहे. यामुळे येथील नैसर्गिक झरे लोप पावले आहेत. यावरही ग्रामस्थांनी पंचायतीचे लक्ष वेधले. मोठ्या इमारती, प्रोजेक्ट्स यांना गावात स्थान नकोच. नगर नियोजन खाते त्यांना परवानगी देत असेल तर याचा निषेध आहे. यावर कारवाई न केल्यास उपोषणाचा मार्ग चोखाळला जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. यावेळी सरपंच अब्दुल नाईक यांनी बेकायदेशीर गोष्टींना रद्द करत फक्त ग्रामस्थांच्या हिताचे आणि कायदेशीर असलेलेच प्रकल्प आणू अशी ग्वाही दिली.
कोरगाव पंचायतीच्या सचिवांची बदली करण्याची मागणी
पंचायतीचे सचिव योग्य प्रकारे सहकार्य करत नसल्याचे ग्रामस्थांनी पंचायत मंडळाच्या नजरेस आणून दिले. गेल्या काही काळात दोन हजारपेक्षा अधिक झाडांची कत्तल झाली आहे, डोंगर कापणीलाही परवानगी देण्यात आली आहे. या प्रकल्पांना पंचायतीच्या सचिवाचे सहकार्य असल्याचा आरोप यावेळी स्थानिक नरेश कोरगावकर व स्थानिकांची कोरगाव ग्रामसभेत केला, तसेच त्याच्या बदलीची मागणी केली.
दरम्यान गावात सध्या सुरू असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या अनेक विकास कामांवर चर्चा झाली. कोरगाव ते पेडणे रस्ता खड्डमेय असून संबंधीत अधिकारी तसेच आमदारांचे देखील दुर्लक्ष होत आहे. स्थानिकांना याचा मोठा फटका बसतो. यावर तोडगा काढणे गरजेचे आहे असाही एक मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला. दरम्यान, लवकरच यावर तोडगा काढला जाईल अशी हमी सरपंच अब्दुल नाईक यांनी दिली.