गोव्याचे शैक्षणिक क्षेत्र होणार अधिक मजबूत : प्रसाद लोलयेकर

माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क व डीएचई यांच्यात सामंजस्य करार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
22nd February, 11:33 pm
गोव्याचे शैक्षणिक क्षेत्र होणार अधिक मजबूत : प्रसाद लोलयेकर

माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर. सोबत प्रो. देविका मदाल्ली, डॉ. केशव धुरी व इतर.

पर्वरी : माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात झालेला सामंजस्य करार हा गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरणार आहे. या करारामुळे गोव्याचे शैक्षणिक क्षेत्र अधिक मजबूत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी केले. माहिती ग्रंथालय नेटवर्क आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्यावेळी ते बोलत होते.
शिक्षण सचिवालय, पर्वरी येथे नुकत्याच झालेल्या या कराराच्यावेळी माहिती व ग्रंथालय नेटवर्कच्या संचालिका प्रो. देविका मदाल्ली, उच्च शिक्षण संचालनालयाचे सहायक संचालक डॉ. केशव धुरी, ज्ञानप्रसारक मंडळ कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे प्राचार्य प्रो.डी. बी. आरोलकर, ग्रंथपाल डॉ. जयप्रकाश, झांट्ये, महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. बाळा मांद्रेकर आदी उपस्थित होते.
गोवा सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांसाठी माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क एक राष्ट्र एक सदस्यता (ओएनओएस) प्रदान करत असून राज्यात ओएनओएस सॉफफ्टवेअरसाठी नोडल अधिकारी म्हणून उच्च शिक्षण संचालनालयाचे सहायक संचालक डॉ. केशव धुरी यांची निवड करण्यात आली.
संशोधनास मिळणार अधिक चालना
शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या माहिती आणि ग्रंथालय नेटवर्कशी झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील महाविद्यालयीन ग्रंथालये अधिक सुसज्ज होऊन संशोधनास चालना मिळेल, असे देखील शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यावेळी म्हणाले.
सामंजस्य करारामुळे मिळणार सुविधा
माहिती आणि ग्रंथालय नेटवर्क यांच्याशी झालेल्या सामंजस्य करारामुळे इंडीकॅट, लायब्ररी ऑटोमेशन इनफिड, शोधचक्र, आयएलएमएस, आयआरआयएनएस या सुविधा राज्यातील सर्व ग्रंथालयांना मिळणार आहेत.

हेही वाचा