तिरुपती येथे आयटीसीएक्सचा समारोप : १५०० हून अधिक मंदिरे, राजकीय नेते आणि धर्मगुरू एकत्र
पणजी : आध्यात्मिक नगरी तिरुपती येथे आयोजित आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद व प्रदर्शन आयटीसीएक्स २०२५ चा भव्य समारोप सोहळा नुकताच पार पडला असून हे संमेलन भारतातील सर्वात मोठे आणि प्रभावशाली मंदिर व्यवस्थापन परिषद ठरले. या ऐतिहासिक संमेलनात १,५०० हून अधिक मंदिरे, मान्यवर राजकीय नेते आणि हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्मांच्या पूजनीय धर्मगुरूंचा सहभाग होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ संकल्पनेला अधिक बळकटी देत, हे संमेलन सनातन धर्माच्या शाश्वत मूल्यांना बळकट करत मंदिर प्रशासनाच्या भविष्याला, शाश्वतता आणि तंत्रज्ञान समावेशाला नवा आकार देणारे व्यासपीठ ठरले. मंदिर स्वायत्तता, स्मार्ट मंदिर मिशन आणि जागतिक सर्वोत्तम पद्धतींवर झालेल्या वैचारिक चर्चांमुळे आयटीसीएक्स २०२५ ने धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीचे केंद्रे म्हणून मंदिरांची पुनर्कल्पना करण्यास नवा मापदंड स्थापित केला.
आयटीसीएक्स आणि टेंपल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी आणि आयटीसीएक्सचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे मुख्य प्रतोद प्रसाद लाड यांच्या संकल्पनेतून साकारल्या गेलेल्या या महोत्सवाने मंदिर प्रतिनिधींना मंदिरे हिंदू समाजाची शक्ती केंद्रे म्हणून पुन्हा स्थापित होऊ शकतात यावर विचार करण्यास भाग पाडले.
आयटीसीएक्स २०२५ ला भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘अतुल्य भारत’ उपक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण पाठिंबा मिळाला. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) प्रस्तुत भागीदार म्हणून सहभागी झाले. या संमेलनाला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि इतर राज्यांच्या पर्यटन व धर्मादाय मंडळांच्या पाठिंब्यांनी अधिक बळकटी मिळाली.
पंतप्रधानांकडून आयटीसीएक्सचे कौतुक
आपल्या दुसऱ्या संमेलनात आयटीसीएक्सने मंदिर व्यवस्थापनाच्या पुनर्रचनेतील एक महत्त्वाचा प्रेरणास्रोत म्हणून आपली भूमिका मजबूत केली आहे. आयटीसीएक्स हे जागतिक स्तरावरील मंदिरांमधील मूलभूत विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे आणि हे ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचा एकप्रकारे उत्सवच आहे. २१वे शतक हे ज्ञानाधारित समाजाचे युग आहे. या दृष्टीने समृद्ध वारसास्थळांचे दस्तऐवजीकरण करणे, डिजिटल स्वरूपात संरक्षित करणे आणि तो जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या टेम्पल कनेक्टच्या प्रयत्नांना अधिक महत्त्व प्राप्त होते, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयटीसीएक्सचे पत्राद्वारे कौतुक केले.