पेडणे : मोरजी पंचायतीची ग्रामसभा सरपंच पवन मोरजे यांच्या अध्यक्षतेखाली आज २३ रोजी पंचायत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच सुप्रिया पोके, पंच विलास मोरजे, फटू शेटगावकर , स्वप्निल शेटगावकर, मुकेश गडेकर, रजनी शिरोडकर, मंदार पोकें आदी उपस्थित होते.
मोरजी येथील तेमवाडा या भागात पर्यटन खात्याद्वारे प्रशस्त पार्किंग लॉट उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाची किमत अंदाजे ८ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दरम्यान स्थानिकांनी ग्रामसभेत या विरोधात आवाज उठवला आहे. या प्रकारच्या प्रकल्पामुळे गावातील समस्यांत अजून भर पडेल असे त्यांचे ठाम मत आहे. कारण प्रस्तावित प्रकल्पाकडे जाण्यासाठी किमान २५ मीटर रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. या कामात येथील घरावर बुलडोजर चालवला जाईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांचे नुकसान करून बिगर गोमंतकीयांना या जमिनी दणे चुकीचे आहे असे मत गावातील नागरिक कॅप्टन जेरार्ड डिसोजा , अल्बर्ट फर्नांडिस, मयूर शेटगावकर यांनी व्यक्त करत याविरोधात ठराव मांडला. तो मंजूरही झाला.
पार्किंग प्रकल्प कोणाला विश्वासात घेऊन उभारला जात आहे ? तो कुणाच्या हितासाठी आहे? सीआरझेड किंवा पर्यावरण विभाग यांचे परवाने घेतले आहे का? एखादा दगड लावण्यासाठी सीआरझेड विभागाचा परवाना घ्यावा लागतो. याची माहिती पर्यटन खात्याला नाही का? पंचायत याकडे दुर्लक्ष करून अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहे का? : कॅप्टन जेरार्ड डिसोजा
ग्रामसभेत एकमेव लेखी अर्ज
या ग्रामसभेला ग्रामस्थांचा अल्प प्रतिसाद मिळाला शिवाय तुकाराम शेटगावकर यांचा एकमेव लेखी स्वरूपाचा अर्ज ग्रामसभेसमोर आला. या ग्रामसभेत जे कोणी बनावट पद्धतीने तक्रारी करतात. त्यांच्याकडून पंचायत आधार कार्ड त्यांची फोटो कॉपी घेते की नाही? असा सवाल तुकाराम शेटगावकर यांनी केला. त्यावेळी यापुढे जो कोणी बांधकामाविषयी किंवा इतर तक्रारी देणार त्यांचे आधार कार्ड ओळखपत्र स्वीकारणार असल्याचे सरपंच पवन मोरजे यांनी सांगितले.
तुकाराम शेटगावकर यांनी मोरजी पंचायत क्षेत्रात किती दुकाने हॉटेल आहेत? त्यामाध्यमातून सरकारला व पर्यायाने पंचायतीला किती महसूल मिळतो. किती जणांकडे सर्व प्रकारचे आवश्यक परवाने आहेत? असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर पार्किंगची समस्या कथन केली. गार्बेज समितीची किती महिन्यांनी बैठक होते. जमा खर्च हिशोब केव्हा सादर केला जातो? असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी ग्रामसभेसमोर उपस्थित केले.
मोरजी पंचायत व्यवसायिकांकडून वेगवेगळे प्रकारे महसूल गोळा करते. या महसूलाचा रेकॉर्ड ऑनलाइन पद्धतीने कधी उपलब्ध होणार? असा प्रश्न उपस्थित अन्य एकाने उपस्थित केला. सरपंच पवन मोरजे यांनी तांत्रिक बाजू ऐकून सर्व प्रकारचा हिशोब लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अपडेट करण्याचा प्रयत्न असेल असे सांगितले.
कलाकारांसाठी कला भवन कधी?
दरम्यान, कलाकार सोनू शेटगावकर यांनी या ग्रामसभेमध्ये मोरजी पंचायत क्षेत्र पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असले तरीही या गावचा इतिहास या गावची संस्कृती पारंपारिक व व्यवसाय याचे दर्शन जे देश विदेशातील पर्यटक मोरजीत येतात ,त्यांना व्हायला हवे. देव देवस्थानांची माहिती, साहित्यिक-लेखक-कलाकारांचे कार्य यांची माहिती व त्यांनी तयार केलेल्या वस्तु आणि शिल्पे पर्यटकांसाठी प्रदर्शन आणि विक्रीसाठी कलादालनात उपलब्ध असायला हवी. त्यासाठी आजपर्यंत मोरजी पंचायतीने कला भवनची निर्मिती का केली नाही? असा सवाल सोनू शेटगावकर यांनी उपस्थित केला.
दीपक शेटगावकर यांनी मोरजी किनारी भागात कचऱ्याची समस्या गंभीर स्वरूप धरण करत असून वेळेवर त्यावर काम केले जात नाही. ती पंचायतीने उभारावी त्यासाठी ग्रामस्थांची मदत घ्यावी अशी सूचना केली. न्हानु शेटगावकर, गोविंद पोके. गजा शेटगावकर, केरकर आदींनी वेगवेगळे विषय ग्रामसभेत मांडले. शेवटी पंच मुकेश गडेकर यांनी आभार मानले.