कॅनडा : मोठी दुर्घटना! टोरंटो विमानतळावर लॅँडिंग दरम्यान विमान उलटले

अपघात १८ प्रवासी गंभीर जखमी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
18th February, 11:13 am
कॅनडा : मोठी दुर्घटना! टोरंटो विमानतळावर लॅँडिंग दरम्यान विमान उलटले

ओटावा : अलीकडे विमान अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अमेरिकेतील विमान अपघातानंतर आता कॅनडात एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. टोरंटोच्या पिअर्सन विमानतळावर डेल्टा एअरलाइन्सचे विमान लँडिंग करताना कोसळले. या घटनेत १८ जण जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे. 

विमानतळ प्रशासनाने या घटनेबाबत 'एक्स' या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनियापोलिसहून येणाऱ्या डेल्टा विमानाला अपघात झाला असून या अपघातात ७६ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. स्थानिक वेळेनुसार दुपारी २.१५ वाजता हा अपघात झाला.

अपघातात कोणतीही जीवित हानी नाही
अधिकाऱ्यांनी सांगितले की विमान धावपट्टीवर उलटले परंतु या अपघातात कोणीही मृत्युमुखी पडले नाही. दरम्यान या अपघातामागचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु हवामान बिघडल्यामुळे अशाप्रकारचा अपघात होऊ शकतो असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

विमानतळावर जोरदार बर्फवृष्टी

कॅनडाच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या घटनेच्या वेळी टोरोंटो पियर्सन विमानतळावर जोरदार बर्फवृष्टी होत होती. वाऱ्याचा वेग ५१ ते ६५किमी प्रति तास होता आणि तापमान उणे ८.६ अंश सेल्सिअस होते. या खराब हवामानामुळे विमान क्रॅश झाल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा