चपखल अचूक शब्दरचना

अनुवाद करतेवेळी नवीन शब्द सापडल्यावर तो संपादकांना विचारून त्वरित त्या डायरीत आणि मेंदूत साठवला पाहिजे. काही उच्चार करताना एक प्रकारची सर्कस करावी लागते. मी न्यूज रिडरना याविषयी कायम सतर्क राहण्याचा व सराव करण्याचा सल्ला देत असे.

Story: ये आकाशवाणी है |
16th February, 12:20 am
चपखल अचूक शब्दरचना

कोंकणी बातम्या लिहिताना आणि नंतर वाचताना भाषेचे व्याकरण, नादशास्त्र, उच्चारशास्त्र लक्षात घेणं गरजेचं असतं. मराठीत एक शब्द येतो त्याचा कोंकणीत उच्चार व अर्थ दुसराच होतो. उदा. कवी असूनही त्याचा वावर रंगभूमीवरही असतो. म्हणजे भूमिका करणे वा लेखन करणे या गोष्टीत रत. आता कोंकणीत हा शब्द जरी वावर असा लिहिला तरी त्याचा उच्चार वाव्र असा होतो. त्याचा अर्थ काम, कार्य असा होतो. 

‘पावस आयलो’ म्हणजे पाऊस आला. उच्चार ‘पाव्स’. ‘पा-व-स’ नव्हे. पावस म्हणजे रत्नागिरी जवळचा गांव. कधी कधी गरज नसताना कोंकणी शब्द असताना इतर शब्दांचा प्रयोग केला जातो. ‘आम्हाला जनादेश मिळाला असे मंत्र्यांनी सांगितले.’ ‘जनादेश’ शब्दाच्या जागी ‘कौल’ हा साधा सोपा शब्द आहे. आम्ही ही कसर भरून काढली. या वाक्यात ‘कसर’ या शब्दाच्या जागेवर ‘उणाव भरून काडलो’ हे ऐकायला बरं वाटतं. ‘ताकतिकेची बसका आपयल्या’ असं वाक्य घेतलं तर कोंकणीचं एक वजन या वाक्याला येतं. तातडीची या शब्दाला ताकतिकेची हा शब्द योजला आहे. घाई या शब्दाला ताकतीक हा शब्द कधीकधी चपखलपणे फिट बसतो.  

काही उच्चार करताना एक प्रकारची सर्कस करावी लागते. संचालनालयाच्या. हा शब्द कोंकणीत वा मराठीत उच्चार करताना वृत्तवाचनाचा जो फ्लो असतो त्यात जर निवेदक अडखळला तर गडबड होऊन जाते. हेडगेवार हायस्कूल याचा उच्चार गडबडीत हेगडेवार असा काही जण करतात. मी न्यूज रिडरना या विषयी कायम सतर्क राहण्याचा व सराव करण्याचा सल्ला देत असे.

गोंय, गोंयबाब यातील गों हा उच्चार गॉं असा होतो. कोंकणीची ही खासियत आहे. काही गफलती वेगळ्याच असतात. कोयर हाडलो. कोयराचे पेटयेंत घालो. यात दुसरा को आहे त्याचा उच्चार कॉ असा होतो. पहिला सामान्य उच्चारासारखाच होतो. या बारीकसारीक चुका नव्हे. घोडचुका होत. परिस्थिती या शब्दाचा उच्चार जर परीस्ती झाला तर तो अनर्थच. विध्यापीठ, विध्यालय असे उच्चार हे परत परत होणारी चूक. विद्यापीठ, विद्यालय हे उच्चार अचूक होत. कोंकणीत अनुनासिक उच्चार आहेत. तिथं व्यवस्थित न्याय द्यायला हवा. ‘खोशयेंत वांटेकार जावपाक तुमी मुजरत येवचें असो उलो मुख्यमंत्र्यांनी मारलो’ या वाक्यातील काही उच्चार फार काळजीपूर्वक निगुतीने घेतले जावेत. हे सगळं वाटतं तितकं सोपं नसतं.

आपणाला सर्व कळलं या थाटात न्यूज- रीडरने कधीही मिरवू नये. वाढ होणार नाही. कारण हे क्षेत्र अमर्याद आहे. Toss कुरूबावलो, countdown of a satellite उपगिऱ्याची उरफाटी मेजणी, orbit कक्षा, side effects अडे परिणाम असे अनेक शब्द आहेत. ते शब्द सुरुवातीला छोट्याशा डायरीत लिहून ठेवायला पाहिजे. दर दिवशी ते वाचले पाहिजेत. अनुवाद करतेवेळी नवीन शब्द सापडल्यावर तो संपादकांना विचारून त्वरित त्या डायरीत आणि मेंदूत साठवला पाहिजे. विधानसभेच्या बातम्या अनुवादीत करताना अनेक प्रशासकीय शब्द येतात. कायद्याची शब्दावली वेगळी असते. कोर्टाच्या निवाड्याची बातमी देताना हे शब्द येतात. आत्यंतिक काळजीपूर्वक ते अनुवादीत करावे लागतात. Prima facie,  null and void,  in toto, sub judice, suo motto असे अनेक वाक्प्रचार वारंवार येतात. यातील बहुतेक ग्रीक लॅटीन फ्रेजीस आहेत, ज्या इंग्रजीने आपल्या पोटात समाविष्ट केल्या आहेत. त्यांचा प्राथमिक अभ्यास हवा. तेव्हा त्यांचा अऩुवाद सुव्यवस्थित होईल व वाचनही आत्मविश्वासपूर्वक योग्य उच्चारांनिशी होईल.


मुकेश थळी 
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)