इंटिरिअर कॅफे नाइट

प्रेम म्हणजे काय? असा अत्यंत क्लिष्ट प्रश्न मी अजिबात विचारणार नाही. प्रेमाचा परीघ एवढा मोठा आहे की त्याची एक अशी व्याख्या कशी असेल? नजर, आवाज, स्पर्श या सगळ्यातून आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जे मौनातून व्यक्त होऊ शकते, ते प्रेम! अशी माझी व्याख्या आहे.

Story: आवडलेलं |
15th February, 05:18 am
इंटिरिअर कॅफे नाइट

फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना... हल्ली फक्त कॉलेजकुमार/कुमारींसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठीच! थंडीची तीव्र लाट ओसरून गेलेली असते तरी, हवेत सुखद गारवा असतो, हवी तेवढीच उब असते, नवीन वर्षाच्या सुरुवातीचा उत्साह अजूनही टिकून असतो आणि या ऋतूचीच अशी कमाल असते की, मोगरा, कुंदा, मदनबाण, निशिगंध अशी सुंदर, सुवासिक फुलं फुललेली असतात! मुळातच छान, सुखद असणारा हा काळ हल्ली प्रसारमाध्यमांमुळे अजूनच सुखद वाटू लागतो. आजच्याच भाषेत सांगायचे तर, प्रेमाचा माहोल असतो नुसता. याची नुकतीच जाणीव झाली ती इंस्टाग्राममुळे. मैत्रिणीने पाठवलेल्या एका फोटोला मी हृदयाचा इमोजी पाठवला आणि चॅट बॉक्समध्ये एकदम तीन-चार गुलाबी हृदये तरंगली! काय छान वाटले! मग हे काय होत आहे ते बघण्यासाठी मी अजून चार-पाच हृदय इमोजी पाठवले. तिने जेव्हा ते मेसेज बघितले, तेव्हा तिच्याही चॅट बॉक्समध्ये भरपूर हृदय तरंगले असतील कारण नंतर तिच्याकडूनही मला असेच हृदयाचे इमोजी आणि वर, ‘काय भारी आहे ना हे?’ असा मेसेज आला. झाला ना प्रेमाचा माहोल?

प्रेम म्हणजे काय? असा अत्यंत क्लिष्ट प्रश्न मी अजिबात विचारणार नाही. प्रेमाचा परीघ एवढा मोठा आहे की त्याची एक अशी व्याख्या कशी असेल? नजर, आवाज, स्पर्श या सगळ्यातून आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जे मौनातून व्यक्त होऊ शकते, ते प्रेम! अशी माझी व्याख्या आहे. प्रेमाची ही व्याख्या कोणत्याही नात्यासंदर्भात असतेच नाही का? कारण सगळ्या नात्यांत प्रेम असतेच, या प्रेमाची जाणीवही असतेच फक्त त्या जाणिवेची जाणीव व्हायला हे दिवस.. सॉरी, हा माहोल कारणीभूत ठरला, इतकेच. 

आता इतके प्रेम, प्रेम सुरू आहे म्हणजे प्रेमासंबंधीचाच कोणतातरी लघुपट असणार हे उघडच आहे. एरवी आधी लघुपट बघून त्यावर लेख लिहिणे किंवा लघुपट बघता-बघता एखादी घटना आठवणे, एखादा विषय सुचणे असे होते. कधीकधी लघुपट बघून झाल्यावर, काही काळाने काही घटना घडतात ज्यामुळे त्या लघुपटाची आठवण येते आणि खोटे का बोलू? काही लघुपट तर केवळ लेख लिहिण्यासाठीच बघितले जातात. पण यावेळी वेगळेच घडले. यावेळी कशावर लिहायचे आहे हे आधीच ठरवले होते, त्यामुळे त्यानुसार मी लघुपट आठवू लागले. मी नेहमी म्हणते की, अनेक लघुपट स्त्रियांच्या प्रश्नांवर बेतलेले असतात, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारासंबंधी असतात. तसेच अनेक लघुपट प्रेम या विषयावर असतात. पण मी जो लघुपट निवडला आहे तो माझ्यामते फार वेगळा आहे. 

‘इंटिरिअस कॅफे नाइट’ हा लघुपट मी फार पूर्वीच बघितला होता पण त्यावर लिहायची अशी कोणतीच संधी मिळाली नाही. यावेळी विचार करताना एकदम तोच आठवला. खरेतर, मला या लघुपटाचे नाव आठवत नव्हते. म्हणजे गोष्ट नीटच आठवत होती पण काही केल्या नाव आठवत नव्हते. सर्च हिस्ट्रीमध्ये शोधणे अशक्यच. पण त्यात नसिरुद्दीन शहा आहेत हे मला आठवत होते. इतर काही लिहिण्याअगोदर हे मुद्दाम सांगितले कारण वेगळे सांगायची गरज नाही. 

एक तरुण जोडपे असते, काही अपरिहार्य कारणाने एकमेकांपासून लांब जातात आणि अनेक वर्षांनंतर एकमेकांना योगायोगाने भेटतात अशी गोष्ट. म्हटली तर अगदी साधा आणि ज्यावरून गोष्टीचा सहज अंदाज बांधू शकतो हा असाच विषय. एव्हाना सगळ्यांना शेवट कळलाच असेल. तसा तो लघुपट बघताना मलाही कळलाच होता. मग मी सुरुवातीला लिहिले ते काय? माझ्यामते हा लघुपट वेगळा आहे, तो का? आपल्याला अपेक्षित असणाऱ्या शेवटाकडे घेऊन जाणारा १३ मिनिटांचा या लघुपटाचा प्रवास हा नितांत सुंदर आहे. भूतकाळातील घटना आणि वर्तमान एकमेकांत अलगद मिसळून गेले आहेत. 

प्रेमाची व्याख्या आणि प्रेमाची गरज या दोन्ही गोष्टी आपल्या वयानुसार, अनुभवानुसार अखंड बदलत असतात. तरुण वयात एकमेकांपासून दुरावलेले दोघेजण आयुष्यात परत कधीच संपर्कात येत नाहीत. आपापल्या मार्गाने जाताना ते आयुष्य जगत जातात. उमेदीची वर्षे निघून जातात. उतार वय येते तरीही भेट नसतेच, तसा प्रयत्नही नसतो. तरीही इतके वर्ष मनात शेवटच्या भेटीच्या आठवणी कैद करून ठेवलेल्या असतात दोघांनीही. आपले आयुष्य जगताना, त्यातल्या जबाबदाऱ्या निभावतानाही या आठवणी पुसल्या गेलेल्या नसतात. दोघांच्याही मनातून. जेव्हा त्यांची योगायोगाने भेट होते, तेव्हा त्यांच्या हे लक्षात येते. म्हणजे ही भेट झाली नसती तरीही त्यांच्या आठवणींना धक्का लागला नसता. त्या होत्याच. प्रेम होतेच. ते दाखवता आले नाही, त्याची आश्वासने देता आली नाहीत इतकेच. ते वेगळे झाले ते परिस्थितीमुळे पण त्यामुळे त्यांच्यातले नाते कसे संपेल? मग प्रेम म्हणजे विश्वास असणे (स्वतःवर) आणि विश्वास ठेवणे (दुसऱ्यावर) हेच का? मी फार पूर्वी एक वाक्य वाचले होते, मला ते फार आवडते... “Never dig up in doubt what you planted with faith.” 

हेवा वाटावा असे हे प्रेम आणि त्याची ही गोष्ट! शेवटी काय होते हे लपवून ठेवण्यात अर्थ नाही. मी आधीच लिहिले आहे, की शेवटापेक्षा तो प्रवासच जास्त सुंदर आहे. तरीही, लघुपटाच्या शेवटच्या काही क्षणांचा आग्रह आणि लुटुपुटाचा नकार बघून वैभव जोशींचा एक शेर आठवला. लघुपटातल्या प्रसंगाला, या लेखाला आणि या एकूणच माहोलाला तो साजेसा आहे... 

एक होकार दे फार काही नको

फार काही नको फक्त नाही नको


मुग्धा मणेरीकर, फोंडा