कर शुल्काबाबत अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर

Story: विश्वरंग |
12th February, 12:11 am
कर शुल्काबाबत अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी कॅनडातील उत्पादनांवर २५ टक्के कर लादल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कॅनेडियन सरकारने प्रत्युत्तर दिले. अमेरिकेच्‍या कोणत्‍या उत्पादनांवर शुल्क आकारण्‍यात येणार, याची यादीच कॅनडाचे अर्थमंत्री डोमिनिक लेब्लँक यांनी जाहीर केली. कॅनडा अमेरिकेतून येणाऱ्या सुमारे ३० अब्ज डॉलर्स किमतीच्या उत्पादनांवर कर लादणार आहे. या उत्पादनांच्या यादीमध्ये अमेरिकेत बनवलेली दारू, घरगुती वस्तू, अवजारे, शस्त्रे, दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या, कपडे आदींचा समावेश आहे.

ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या उत्पादनांवर २५ टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला. तसेच चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के कर लावण्याचीही घोषणा केली. कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार क्रिस्टिया फ्रीलँड यांनी अमेरिकेच्‍या निर्णयाला विरोध केला आहे. याचा अमेरिकन लोकांना खूप त्रास होईल कारण ते अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी कॅनडावर अवलंबून असल्‍याचे फ्रीलँड यांनी म्‍हटले आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी घोषणा केली की, कॅनडा १५५ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लादून प्रत्युत्तर देईल.

ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्क लादण्याच्या निर्णयावर म्हटले होते की, यामुळे लोकांना निश्चितच काही समस्या निर्माण होतील. परंतु, आपल्याला हा त्रास सहन करावा लागेल. या निर्णयाचा अमेरिकेला फायदा होणार आहे. अमेरिकेने शुल्क लादण्याची घोषणा करताच, कॅनडाच्या सरकारनेही अनेक अमेरिकन उत्पादनांवर शुल्क लादून सडेतोड उत्तर दिले आहे.

चीननेही ट्रम्प सरकारच्या त्यांच्या उत्पादनांवर कर लादण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. अमेरिकन सरकारच्या निर्णयाविरुद्ध जागतिक व्यापार संघटनेत अपील करणार असल्याचे चीनने म्हटले आहे. मेक्सिकन सरकारनेही अमेरिकन उत्पादनांवर प्रत्युत्तरात्मक शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. मेक्सिकन सरकारचे गुन्हेगारी संघटनांशी संबंध आहेत, अशी टीका ट्रम्प यांनी केली होती. या टीकेला मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबाम यांनी सडेतोड उत्तर देत गेल्या चार महिन्यांत त्यांच्या सरकारने ४० टन अमली पदार्थ जप्त केले. तसेच १० हजारांहून अधिक गुन्हेगारांना अटक केल्याचे सांगून ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावले.


- सुदेश दळवी, गोवन वार्ता