केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांची राज्यसभेत माहिती
पणजी : राज्यातील अटल पेन्शन योजनेअंतर्गतची (एपीवाय) १,९५,७३८ पैकी १२.९३ टक्के म्हणजेच २५,३०९ खाती आतापर्यंत बंद पडलेली आहेत, अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत यासंदर्भात विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
अटल पेन्शन योजना ही भारताच्या असंघटित क्षेत्रासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना असून, ती १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. जे नागरिक आयकर भरणारे नाहीत, त्यांच्यासाठी ही योजना असून, वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक ते पाच हजार रुपयांपर्यंत निश्चित मासिक पेन्शन देण्यात येते. योजनेअंतर्गत आयकर न भरणाऱ्या १८ ते ४० वयोगटातील नागरिकांना देशातील कोणत्याही बँकेत अटल पेन्शन खाते उघडावे लागते. त्यात ठराविक काळात निर्धारित रक्कम जमा करावी लागते. त्यानुसार, वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक पेन्शन मिळते. असंघटित क्षेत्रातील कामगारांना आजारपण, अपघात आणि इतर जोखमींपासून आर्थिक सुरक्षा मिळते. याशिवाय लाभार्थीच्या मृत्यूनंतरही पती/पत्नीला मासिक पेन्शन मिळते. तसेच लाभार्थी आणि पती/पत्नी दोघांचेही निधन झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला एकरकमी रक्कम दिली जाते.
दरम्यान, गोव्यात आतापर्यंत १,९५,७३८ जणांनी अटल पेन्शन खाती उघडली आहेत. परंतु, निर्धारित केलेली रक्कम खात्यात जमा न केल्यामुळे २५,३०९ जणांची खाती बंद पडलेली आहेत, असे मंत्री चौधरी यांनी उत्तरातून स्पष्ट केले आहे.