सना क्रिकेटर्सला अखिल गोवा क्रिकेटचे जेतेपद

पर्वरीचा खरेम ब्रदर्स ठरला उपविजेता : सिद्धी स्पोर्ट्स अँड कल्चरल असाेसिएशनतर्फे आयोजन

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th February 2025, 10:01 pm
सना क्रिकेटर्सला अखिल गोवा क्रिकेटचे जेतेपद

पणजी : उसगावच्या सना क्रिकेटर्सने द्वितीय अखिल गोवा क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्या वर्षी पटकावले आहे. स्पर्धेचे आयोजन सिद्धी स्पोर्ट्स अँड कल्चरल असाेसिएशनतर्फे किटला मैदान, हळदोणा येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा १५ षटकांच्या सामन्याची होती जी संपूर्ण गोव्यात आयोजित केली जाणारी एकमेव स्पर्धा आहे. तुलनेत इतरत्र फक्त ५ षटकांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात असे आयोजकांचे म्हणणे आहे.

ही स्पर्धा २९ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झाली आणि ९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपली. यामध्ये गोव्यातील २८ संघांनी सहभाग घेतला होता. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी स्पर्धेला ७ रविवार लागले.

हळदोणा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता उसगावचा सना क्रिकेटर्स ठरला. त्यांनी या स्पर्धेत आपले विजेतेपद कायम ठेवले. गेल्या वर्षी हाच संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. उपविजेता म्हणून पर्वरीचा खरेम ब्रदर्सला पुरस्कार देण्यात आला.

१५ षटकांच्या या अनोख्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आणि वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्त पाळल्याबद्दल सर्व संघांनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

अंतिम फेरीसाठी हळदोणार आमदार अॅड. कार्लोस अल्वारेस फरेरा, उद्योगपती आणि सामाजिक कार्यकर्ते महेश साटेलकर आणि पोलीस निरीक्षक एटीएस राया नाईक, सागर गोवेकर आणि इतर पाहुणे उपस्थित होते.