आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिब्रुगडला पूर्ण विकसित शहर आणि आसामची दुसरी राजधानी म्हणून दर्जा देण्याची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळातील चर्चेनंतर हा निर्णय घेतला असून लोकांच्या सोयीसाठी तसेच कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिब्रुगडला पुढील तीन वर्षांत राजधानीच्या रुपात विकसित केले जाणार आहे.
देशात आसामच नाही तर अनेक राज्यांमध्ये दोन राजधान्या आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, तर नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी आहे. हिमाचल प्रदेशच्याही दोन राजधानी आहेत. गर्मीमध्ये शिमला तर थंडीमध्ये धर्मशाळा आहे. उत्तराखंडची पहिली राजधानी डेहराडून तर दुसरी राजधानी गैरसैण आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्यात आल्यानंतर लडाखची राजधानी लेह तर दुसरी कारगिलमध्ये स्थित आहे. आसामची राजधानी दिसपूर आहे. तर, दिब्रुगड हा गुवाहाटीच्या पूर्वेस ४७८ किमी अंतरावर असलेला जिल्हा आहे. पुढील तीन वर्षांत दिब्रुगडला राज्याची दुसरी राजधानी म्हणून विकसित केले जाईल. हे पाऊल प्रशासकीय कार्ये अधिक समतोलपणे वितरित करण्याच्या, राज्यातील विकासाला चालना देण्याच्या आणि लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहे.
ब्रिटिश वसाहत काळात शिलाँग ही आसामची राजधानी होती. १९७२ मध्ये मेघालयाची स्थापना होईपर्यंत ती तशीच राहिली. १९७३ मध्ये, राजधानी अधिकृतपणे गुवाहाटीतील दिसपूर येथे हलवण्यात आली. दिब्रुगडमध्ये कायमस्वरुपी विधानसभेची इमारत बांधली जाणार आहे. इमारतीची पायाभरणी पुढील वर्षी २५ जानेवारी रोजी केली जाईल. २०२७ पासून, शहराला राजकीय केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी वार्षिक विधानसभा अधिवेशन आयोजित केले जाणार आहे.
- प्रसन्ना कोचरेकर