आपल्या राहणीमानावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांबाबत संवेदनशील असलेला मध्यमवर्ग भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा होता, तर कल्याणकारी आश्वासने आणि सध्याच्या उपाययोजना सुरू ठेवण्याच्या दाव्याने मोठ्या प्रमाणात गरीब मतदारांची मने जिंकली.
मागच्या केवळ आठ जागांवरून तब्बल ४८ मतदारसंघांत विजय प्राप्त केलेल्या भाजपचा दिल्ली संघप्रदेशातील विजय निश्चितपणे ऐतिहासिक स्वरुपाचा मानावा लागेल. सत्तरपैकी केवळ २२ जागांवर विजय मिळवणारा सत्ताधारी आम आदमी पक्ष एवढा रसातळाला का गेला, याचे चिंतन करण्याची वेळ त्या पक्षाच्या नेत्यांवर आली आहे. लोकसभा निवडणूक आणि कोणतीही विधानसभा निवडणूक यात वेगवेगळ्या प्रकारे मतदान होत असते, असा समज दिल्लीतील निकालाने खोटा ठरवला आहे. लोकसभेच्या दिल्लीतील सातही जागा सलगपणे मिळवणारा भाजप यावेळी विधानसभा निवडणुकीतही नेत्रदीपक यश मिळवू शकला. या उलट विधानसभा निवडणुकीत तीन वेळा उल्लेखनीय यश मिळवणारा आप मात्र आपली सत्ता टिकवू शकलेला नाही. यामागची कारणे शोधून काढून, आम्ही हरलो तरी संपलेलो नाही, हे आपच्या नेत्यांना सिद्ध करावे लागेल. आप हा पक्ष म्हणजे दिल्लीवासीयांसाठी आपत्ती असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमध्ये केल्याने मतदारांवर त्याचा परिणाम होणे साहजिक होते, कारण केंद्र सरकारच्या काही योजना दिल्लीत राबविण्यास आप सरकारने नकार दिला होता. यमुना स्वच्छ करण्याची मोहीम असो किंवा आयुषमान आरोग्य योजना असो, माजी मुख्यमंत्री आणि आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी दुर्लक्षच केले. आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांनी असा दावा केला आहे की, यमुना स्वच्छ करून किंवा विकासकामे करून मते मिळत नाहीत, असे केजरीवाल म्हणायचे. निवडणुकीवेळी आकर्षक घोषणा केल्या की, मतदार भुलून मते देतात असे त्यांचे म्हणणे आहे, असे स्वाती मालिवाल यांनी म्हटले आहे. आश्वासनपूर्ती करायची असते असे मानायचे कारण नाही, असे आपच्या नेत्यांना वाटते, असेही त्या म्हणतात. या वृत्तीचा मोठा परिणाम दिल्लीतील मतदानावर झाला, तो एवढा तीव्र होता की खुद्द अरविंद केजरीवाल, त्याचे सहकारी मंत्री मनीष सिसोदिया आदींचा पराभव झाला. हा दणका आम आदमी पक्षासाठी असह्य ठरणार आहे.
तसे पाहता दिल्लीच्या राजकारणात भाजप आणि काँग्रेस असे दोनच पक्ष होते. काँग्रेस सत्तेवर असताना, केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाने दिल्लीच्या निवडणुकीत सहभागी होत, त्या पक्षाची सत्ता संपुष्टात आणली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा राजकीय चेहरा बनलेले केजरीवाल यांची प्रतिमा स्वच्छ व अनोखी असल्याचे वाटल्यामुळे जनतेने त्या पक्षाला दोन वेळा सत्ता बहाल केली. कालांतराने एककल्ली आणि स्वार्थी नेत्यांचा भरणा असलेला पक्ष ही आपची ओळख ठरल्यानंतर अलीकडचे मद्य घोटाळा आणि कोट्यवधींचे शीशमहाल हे निवासस्थान हे दोन प्रमुख मुद्दे एवढे चर्चिले गेले की, त्यांचा प्रभाव जनमानसावर पडला. डोळ्यांदेखत घडत असलेले हे गैरप्रकार मतदार सहन करू शकला नाही, असेच निकालावरून दिसून येते. गेल्या पाच वर्षांत शहराचा पाणीपुरवठा, रस्त्यांचा दर्जा, कचरा संकलन आणि वायू प्रदूषणात एकूणच घसरण झाली आहे. आपल्या राहणीमानावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांबाबत संवेदनशील असलेला मतदारांचा एक मोठा वर्ग, विशेषत: मध्यमवर्ग भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा होता, तर कल्याणकारी आश्वासने आणि सध्याच्या उपाययोजना सुरू ठेवण्याच्या दाव्याने मोठ्या प्रमाणात गरीब मतदारांची मने जिंकली. या उलट, गेल्या दहा वर्षांत सलग तीन वेळा एकही जागा मिळवू न शकलेल्या काँग्रेस पक्षाची स्थिती दयनीय तर झाली आहेच, शिवाय विरोधकांच्या इंडी आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
कल्याणकारी आश्वासनांद्वारे गरिबांमध्ये आम आदमी पक्षाच्या सातत्यपूर्ण जनाधाराला लक्ष्य करणारी भारतीय जनता पक्षाची स्थानिक पातळीवरील मोहीम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक प्रचाराचा शहरातील मतदारांवर प्रभाव पडला आणि राष्ट्रीय राजधानीत पक्षाचा २६ वर्षांहून अधिक काळचा दुष्काळ संपुष्टात आला. भाजपची मतांची टक्केवारी २०१५ मध्ये ३२ टक्क्यांवरून २०२० मध्ये ३८.५ टक्क्यांवर पोहोचली होती, तर 'आप'ला अनुक्रमे ५४ टक्के आणि ५३.५ टक्के मते मिळाली होती. यावेळी भाजपचा वाटा ४६ टक्क्यांवर गेला, तर 'आप'चा वाटा ४३.५ टक्क्यांवर घसरला. केंद्र सरकारने नियुक्त केलेले नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यातील सततच्या संघर्षामुळे दैनंदिन कारभारावर परिणाम होत होता. हा संघर्ष टाळण्यासाठी केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाला पाठिंबा देणे योग्य ठरेल का, असा प्रश्न मतदारांना पडला. मुख्यमंत्रिपदासाठी सुपरिचित चेहरा मतदारांसमोर न ठेवताही भाजपला मिळालेल्या या यशात पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. अर्थात नरेंद्र मोदी आणि मंत्री व खासदारांनी सक्रियपणे प्रचारात भाग घेतल्याचा परिणाम मतदारांवर निश्चितपणे झाला.