संवादच न घडणे किंवा तसे प्रयत्नच न करणे हा एक भाग आहे. पण त्याहीपेक्षा भयंकर आहे ते संवाद चुकीच्या दिशेने जाणे.
संवाद... किती महत्त्व आहे संवादाला हे आपल्याला सांगण्यासाठी वेगळे काहीच लिहायला नको. ‘वाद नको, संवाद हवा.’ किंवा ‘येथे वाद नाही, संवाद घडतात...’ अशाप्रकारची ब्रीदवाक्ये आपण वाचत असतोच. आजकाल तर या संवादाचे महत्त्व वेगवेगळ्या संदर्भात, वेळोवेळी अधोरेखित केले जाते. मग ते लहान मुलांशी संवाद साधण्याच्या संदर्भात असो किंवा वैवाहिक आयुष्य सुलभ होण्यासाठी जोडीदाराशी आवश्यक असणाऱ्या संवादाच्या संदर्भात असो. मला खात्री आहे की, संवाद न होण्याचा दुष्परिणाम आणि व्यवस्थित संवाद झाल्यानंतर झालेला फायदा या दोनही गोष्टींचा अनुभव आपल्यापैकी सगळ्यांनीच घेतला असेल.
एखाद्या सुंदर नात्यावर न घडलेल्या संवादामुळे किंवा विसंवादामुळे कायमचे ओरखडे उठू शकतात, तर कधी वारंवार होणाऱ्या विसंवादामुळे नात्यात कायमच एकप्रकारचा ताण निर्माण होऊ शकतो. अशावेळी त्या नात्यात असणारे इतरही अनेक पैलू या विसंवादाच्या सावटामुळे उगीचच बाधित होऊ शकतात. अर्थातच, याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात आणि त्यामुळे आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वात पडतोच. विसंवादाचे उत्तम उदाहरण बघायचे असल्यास कोणत्याही दो, सतत एकत्र असणाऱ्या व्यक्तींबरोबर राहून त्यांचे निरीक्षण करावे. साध्या, सरळ, सोप्या गोष्टी कशा गुंतागुंतीच्या होतात हे लक्षात येते. यामागचे कारण म्हणजे व्यवस्थित संवाद नसणे हेच कसे आहे हेही आपल्याला या निरिक्षणातून समजते. यामध्ये आपली भूमिका बघ्याची असल्यामुळे आपल्याला दोनही बाजू पटकन समजतात.
संवादाचा ताल नेमका कुठे चुकला हे आपण अचूक हेरतो. म्हणूनच समोरच्या त्या दोन व्यक्तींना वाटणारा तो मोठा वाद आपल्याला किरकोळ वाटतो. खरा तो किरकोळच असतो पण विसंवाद आणि अहंकार म्हणजेच इगो हातात हात घालून येत असल्याने मग पुढे गुंता होतो. पण आपला आजचा विषय हा केवळ विसंवाद असल्याने तिथेच आपण लक्ष केंद्रित करू. मग जे निरीक्षण आपण इतरांच्या बाबतीत करतो ते स्वतःच्याही बाबतीत करून बघितल्यावर आपलीही परिस्थिती काही वेगळी नाही हे पटकन लक्षात येते. तरीही असे होते की, इतरांचे निरीक्षण करून अनेक गोष्टी हातात येतात पण आपल्यावर, स्वतःवर जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र आपण परत या विसंवदाच्या कचाट्यात सापडतोच!
हे निरीक्षण करण्याचा लागलेला नाद आणि हल्लीच ‘मुसाफिर’ हा एक अतिशय वेगळ्या धाटणीचा लघुपट बघितल्यामुळे मला नात्यांच्या पाया असणाऱ्या प्रेम, विश्वास, आदर यामध्ये संवाद हा घटक जास्त महत्त्वाचा वाटायला लागला आहे. संवादच न घडणे किंवा तसे प्रयत्नच न करणे हा एक भाग आहे. पण त्याहीपेक्षा भयंकर आहे ते संवाद चुकीच्या दिशेने जाणे. संवाद म्हणजे तरी नक्की काय? बोलणे, योग्य ते बोलणे आणि मुख्य म्हणजे समजून घेणे आणि समजून घेऊन उत्तर देणे! बऱ्याचदा समोरच्याला केवळ उत्तर देण्यासाठी (त्याचे बोलणे खोडून काढण्यासाठी) आपण त्याचे बोलणे ऐकत असतो आणि याचाच परिणाम म्हणजे विसंवाद! अर्थात, या सगळ्या गोष्टी काही लघुपटात सांगितल्या नाहीत. वर लिहिल्याप्रमाणे हा लघुपट अतिशय वेगळ्या धाटणीचा आहे. साधारणत: एखाद्या लघुपटात मांडतात तसा विषय यात आहे, त्या विषयाला अनुसरून रचलेली एक गोष्ट आहे पण तरीही हा केवळ चारेक मिनिटांचा लघुपट तेवढेच सांगून जात नाही. जे दाखवले आहे त्यापेक्षा अजून काहीतरी यात आपल्याला दिसते.
संवाद साधण्यासाठी मुळात बोलणे गरजेचे आहे. पण नुसते बोलून भागत नाही. आपण जे बोललो आहोत ते, तसेच समोरच्यापर्यंत पोहचले आहे का? पोहचते आहे का याची खात्री करणे हीदेखील संवाद साधण्याऱ्याची जबाबदारी असते हे या लघुपटातून लक्षात येते. केवळ बोलून मोकळे होणे म्हणजे सर्वकाही नाही. एखादी गोष्ट गृहीत धरणे किंवा समोरच्याबद्दल चुकीचा समज करून घेणे या गोष्टींमुळे होणारा परिणाम काय भयंकर असतो हे या लघुपटातल्या या लहानशा प्रसंगातून समजते. हा प्रसंग काहीसा विनोदीही वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला ते बघताना एका विशिष्ट वेळी एक धक्का बसतो. तो ओसरल्यानंतर मात्र एका वेगळ्याच प्रकारची अनुभूती आपल्याला होते. लघुपटातली ही गोष्ट जरी एका विशिष्ट्य संदर्भातली असली तरीही, त्यामुळे आपल्या डोक्यातली चक्र अतिशय वेगाने फिरायला लागतात. म्हणूनच, सांगितले जरी एकच असेल तरी, त्यातून अनेक अर्थ, अनेक पैलू आपल्या हातात येतात. वाटते, ‘अच्छा... असे सांगायचे होते लेखकाला!’ एखादा कसलेला लेखक त्याची खरी गोष्ट थेट न सांगता दोन ओळींच्यामधून अधिक प्रभावीपणे सांगतो. त्याचप्रमाणे या लघुपटाचा दिग्दर्शकही चार मिनिटांत, या एकाच प्रसंगातून आपल्याला त्या प्रसंगापेक्षाही अजून खूप काही सांगून जातो. म्हणजे असे म्हणायला हरकत नाही की, लेखकाला जे सांगायचे होते ते नीट सांगता येणे हे लेखक आणि दिग्दर्शक यांच्यातील संवादामुळेच.. बरोबर ना?
मुग्धा मणेरीकर, फोंडा