सुरेश भट यांच्या लेखणीतून स्फुरलेली गाणी, गझल हे सर्व काही अजब गजब रसायन आहे. त्यांच्या गीतातले शब्दच असे काही असतात, की ते मनाला धुंद, बेहोष तर करतातच… पण ही त्यांची गाणी ऐकल्यावरही मनाला आलेल्या धुंदीत मन आठवणींच्या गर्तेत राहू इच्छिते.
केव्हा तरी पहाटे... उलटून रात्र गेली
मिटले चुकून डोळे... हरवून रात्र गेली!
प्रियकराच्या मिठीत असताना रात्र कशी सरली, याचे भान त्या प्रेयसीला कसे राहील? प्रणयाच्या अविष्कारात प्रेमाची धुंदी चढलेली असताना चुकून एखाद्या क्षणी डोळे मिटले जातात आणि पहाट कधीतरी होऊन जाते, याची जाणीव होत नाही. आणि प्रियकराच्या मिठीत स्वत:ला हरवून जाताना रात्र हरवून कशी गेली, याची कल्पनाही येत नाही. याचे तंतोतंत वर्णन सुरेश भट आपल्या या अप्रतिम गझलेत करतात. चारुकेशी रागात गुंफलेली ही गझल आशाताई तसेच पद्मजा फेणाणी यांच्या सुमधुर आवाजात ऐकताना मनाच्या एका हळव्या कोपर्यात जपलेल्या आठवणी पुन्हा ताज्या होऊन जातात. आणि ज्यांनी आपल्या आयुष्यात खरं प्रेम केले आहे, त्यांना आपल्या प्रेमाची आठवण अधिकच गहिरी होत जाते.
कवी सुरेश भट यांच्या गझलेला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताचा परिसस्पर्श झाला की त्याचे सोने होणार, ही काळ्या दगडावरची रेघच जणू! आणि हे या गझलेमध्येही सिद्ध झालंय. आशा भोसले यांच्या मखमली आवाजात ही गझल ‘निवडुंग’ सिनेमासाठी निवडली गेली आणि कलाकार अर्चना जोगळेकर यांच्यावर चित्रित झाली. पडद्यावर किंवा ध्वनिफितीवर ही गझल ऐकताना आपण स्वत:लाच हरवून बसतो...
सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा फसवून रात गेली!
पहाटेचे कोवळे ऊन ... त्या कोवळ्या उन्हाला ही वय असते, हे सुरेश भट यांनाच समजले.. हे कोवळे ऊन म्हणजेच या गझलेमध्ये प्रतीत होणारी कोवळी, नुकतीच तारुण्यात आलेली प्रेमिका तर नसावी ? ... सुरेश भटांना कदाचित हेच तर सुचवायचे नसेल ना ? ... कोवळ्या उन्हाचे वय जसे सांगता येणार नाही, तसेच या गझल मधील प्रेमिकाचेही वय सांगता येणार नाही. कारण तिने नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले आहे. या कोवळ्या उन्हाप्रमाणेच ही प्रेमिका आपल्या प्रियकराच्या मिठीत आहे आणि त्याच्या श्वासात आपला श्वास मिसळताना तिचा श्वासही उसवून ती फुलून गेली आणि रात्रीला प्रणयाच्या धुंदीत रात्र फसवून गेली.
प्रियकराच्या मिठीत असताना भान कोणाला उरेल ? प्रियकराच्या मिठीत सुखावताना या प्रेयसीची मिठी नकळत सुटली... तशीच ती रात्र ही निसटून गेली.. आणि प्रणयाचा बहर हा मात्र कायम राहिला. तेव्हा सुरेश भट पुढे लिहितात,
कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली ...
विरहानंतर भेटलेल्या प्रेयसीला आपल्या घट्ट मिठीतून जराही दूर करायचे नाहीये .. पण रात्रभर प्रणयाच्या बहरात आलेल्या या प्रियकराची मिठी ही पहाटे जराशी सैल झाली... पहाटे प्रियकराच्या मिठीची मिठास अशी की, ती तेव्हा सुटली, तेव्हाच ती भानावर आली आणि आता रात्र उलटून गेली आहे, याची तिला पुसटशी जाणीव झाली... याचे मिठ्ठास शब्दांत वर्णन करावे ते सुरेश भट यांनीच !..
प्रेमगीत किंवा प्रेमावर गझला लिहिताना सुरेश भट यांच्या शब्दांची नजाकत काही औरच !... त्यातील प्रत्येक शब्दाला एक प्रकारचा गोडवा ऐकणार्याला नक्कीच जाणवतो, जेव्हा त्यांच्या गझलेला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताची साथ लाभते... म्हणूनच आमच्या लहानपणी ऐकलेली ही गाणी आजही मनावर अधिराज्य करून आहेत. अर्थात या शब्दांतील अर्थ जरी समजत नसला तरी आशा भोसले, पद्मजा फेणाणी यांच्या मखमली आवाजातील ओथंबलेले स्वर मनाला पार भिजवून टाकतात.
जेव्हा निरोप घ्यायचा क्षण येतो, तेव्हा हे सर्व काही अनुभवलेले आपल्या सोबत मनात ठेवायचे आहे, ही जाणीव मनाला तेव्हा होते तेव्हा काहीसे उदास व्हायला होते. सोबतीला रात्र होती, चांदण्यांचे स्वर होते. त्यांच्यासोबत प्रियकराच्या मिठीत रात्र सरली तरी आता निरोपाच्या क्षणी हे सर्व सोडून जाताना आपल्या उरात, मनात साठवून घेताना चांदण्यांच्या संगतीत घालवेले हे क्षण आता मनातच उरतील ही जाणीव होऊन ती प्रेयसी म्हणते की,
उरले उरात काही आवाज चांदण्यांचे...
आकाश तारकांचे उचलून रात्र गेली...
प्रियकराची मिठी, प्रणयाचा बहर हा पहाटेच्या वेळी संपल्यावर काहीच सुचेनासे होते तेव्हा रात्रीच्या धुंदीत प्रेमाचे फुललेले गीत तिलाच आठवेनासे होते. कारण आता निरोपाचा क्षण जवळ आलेला आहे. आणि हा निरोप घेण्याचा क्षण फार विदारक करून सोडणारा असतो. मिलन आणि त्यानंतरचा विरह सोसताना झालेल्या वेदना आपल्या शब्दांत मांडताना सुरेश भट आपल्या गझलेमधील शेवटच्या ओळीत लिहितात,
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली !....
या गझलेच्या शेवटच्या या ओळी ऐकताना मन परत आपल्या मनातील हळवा कोपरा शोधत राहते !...
कविता आमोणकर