कोलेस्टेरॉलचे प्रकार व त्याचा हृदयावर परिणाम

हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांमुळे दरवर्षी सुमारे १७.९ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू होतो आणि यातील पाचपैकी चार मृत्यू हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे होतात.

Story: आरोग्य |
01st February, 04:19 am
कोलेस्टेरॉलचे प्रकार व त्याचा हृदयावर परिणाम

हृदयविकाराच्या झटक्यामागचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे वाढलेले कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल जोपर्यंत धोकादायक मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला कोलेस्टेरॉलचा त्रास शोधून काढणे कठीण जाते.

आपण कोलेस्टेरॉलबद्दल नेहमीच ऐकत असतो की कोलेस्टेरॉल शरीरासाठी वाईट आहे पण योग्य मात्रेमध्ये आपल्या शरीराच्या नियमित कार्यासाठी ते अगदी आवश्यक आहे. कोलेस्टेरॉल हे एका विशिष्ट प्रकारच्या चरबीसारखे असते. आपले शरीर याच्या मदतीने हार्मोन्स, निरोगी पेशी आणि जीवनसत्त्वे तयार करते, जे आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी आवश्यक असते. तर आजच्या भागात आपण कोलेस्टेरॉलचे प्रकार व ते आपल्या हृदयावर कसे परिणाम करू शकतात याबद्दल बोलू. 

कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होत जातो आणि त्याचे प्रमाण वाढत राहिल्यास हृदयाचे रोग, नसांचे रोग, हृदय विकाराचा झटका, स्ट्रोक यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉल हे एखाद्या प्रवाशासारखे असते तर लिपोप्रोटीन हे ते वाहून नेणाऱ्या वाहनांसारखे असतात. कोलेस्ट्रॉलच्या लिपोप्रोटीनचे दोन प्रकार असतात, गुड (चांगले) कोलेस्टेरॉल म्हणजे हाय डेंसिटी लिपोप्रोटीन आणि बॅड (वाईट) कोलेस्टेरॉल म्हणजे लो डेंसिटी लिपोप्रोटीन.

लो डेंसिटी लिपोप्रोटीन, ज्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात, ते जर वाढले तर ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात व ‘प्लेक’ तयार होतो. रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार झाल्यामुळे रक्ताच्या हालचालीमध्ये अडचण येते. शरीरात लो डेंसिटी लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉलची सामान्य मात्रा १०० एमजी/डीएलपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. 

एचडीएल म्हणजेच हाय डेंसिटी लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल आहे. हे आपल्या रक्तवाहिन्यांमधील एलडीएल कोलेस्टेरॉल साफ करण्यास मदत करते. निरोगी राहण्यासाठी, एचडीएलची सामान्य मात्रा ६०एमजी/डीएल किंवा त्याहून अधिक राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारतातील ३१ ते ४० वर्षे वयोगटातील प्रत्येक १० पैकी ६ लोकांना बॅड कोलेस्टेरॉल आहे, म्हणजेच त्यांच्या शरीरात गुड कोलेस्ट्रॉल कमी आणि बॅड कोलेस्ट्रॉल जास्त आहे.

कोलेस्टेरॉल कसे कमी करावे?

शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपली जीवनशैली बदलणे. यासाठी सर्वप्रथम एलडीएल वाढवणारे सर्व घटक ओळखावे लागतील जसे,

- आहारात जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट असलेल्या गोष्टींचा समावेश असणे.

- लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाली आणि धूम्रपान करणे

- अनुवांशिकता

- मधुमेह आणि हायपरथायरॉईडीझम सारख्या आरोग्याच्या परिस्थिती

कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी

पारंपरिक पदार्थ आहारात समाविष्ट करा.

पारंपरिक पद्धतीने खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होण्याची शक्यता कमी होते आणि आपण निरोगी राहू शकतो.

कोलेस्टेरॉल वाढल्याने काय होते?

कोलेस्टेरॉल वाढल्याने रक्त वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्त प्रवाह मंदावतो पण याचे काहीच लक्षण बाहेर दिसून येत नाही. यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले तोवर दिसून येत नाहीत जोवर ते कोणत्या गंभीर समस्येचे कारण बनत नाही. कोलेस्टेरॉलची पातळी जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ब्लड टेस्ट. अधे मधे कोलेस्टेरॉल न तपासता दुर्लक्ष केल्यास काही काळाने त्याचा थर हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतो. यामुळे हृदयाला नुकसान पोहोचते आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो.

तरी कोलेस्टेरॉलच्या बाबतीत अशी काही लक्षणे आहेत जी आपण अजिबात दुर्लक्षित केली नाही पाहिजेत. जसे की मळमळणे, शरीर सुन्न पडणे, खूप थकवा जाणवणे, अचानक छातीत दुखायला लागणे, श्वास घेण्यास समस्या निर्माण होणे, हात पाय थंड पडणे, उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होणे. यांसारखी लक्षणे ही सहसा कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत देतात.

प्रक्रिया केलेले अन्न टाळा.

आहारात प्रक्रिया केलेले आणि परिष्कृत खाद्यपदार्थ कमी करण्यावर भर द्या. कुकीज, बिस्किट, चिप्स, या पदार्थांऐवजी तूप -रोटी खाण्यावर भर द्या.

शारीरिक हालचाली वाढवा.

आपल्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी शारीरिक हालचाली आवश्यक आहेतच. याशिवाय, हे एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवण्यास देखील मदत करते. दररोज ४५ मिनिटे व्यायाम करा. पण वेळ कमी असल्यास, वर्कआउट दोन ते तीन भागात विभागून पूर्ण करा.

वजन कमी करा.

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यामागे लठ्ठपणा हेही एक प्रमुख कारण आहे. फास्ट फूड आणि पॅकेज्ड फूडपासून दूर राहिल्यास आणि नियमित व्यायाम केल्यास वजन सहज कमी होऊ शकते.

धुम्रपानापासून दूर राहा.

सिगारेटच्या धुरामध्ये असलेल्या रसायनामुळे रक्तवाहिन्या खराब होतात. धुम्रपानामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील अस्तरांवर कोलेस्टेरॉल जमा होऊन प्लेक तयार होऊ शकतो. हा प्लेक हार्ट अटॅकसाठी जबाबदार ठरू शकतो.

ताण घेऊ नका.

ताण हा हृदयरोगासाठी धोकादायक घटक आहे. निरोगी हृदयासाठी, योग, ध्यान आणि व्यायाम यासारख्या तणाव कमी करणाऱ्या तंत्राचा सराव करा.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर