दरवेळी भिडस्तपणाची भावना वाईट असते असे नाही पण अशा स्वभावाच्या माणसाची फसवणूक होऊ शकते. त्याचा वापर करून घेतला जाऊ शकतो.
“अगं मी तिला नाही कसं म्हणू फार उपकार आहेत तिचे माझ्यावर, तिने मला वेळेवर पैशांची मदत केली.” हे वाक्य हेमा मला बोलून दाखवत होती. खरं तर हेमाचा भिडस्त स्वभाव तिला नडला होता. तिची मैत्रीण तिच्या स्वभावाचा गैरफायदा घेत होती. तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून हवं ते काम करवून घेत होती.
भिडस्त स्वभाव असणारी माणसे दयाळू. दुसऱ्याला मदतीला सदैव तत्पर असलेली जरा जास्तच संवेदनशील असलेली असतात. दुसऱ्यांची कामे करणे, त्यांना होईल तितकी मदत करणे यातच गुंतून राहतात. काही वेळेला त्यांना हे पटत नसलं तरी भिडस्त स्वभावामुळे ती काहीच बोलत नाहीत आणि त्याचा गैरफायदा समोरची व्यक्ती घेत राहते. अशी व्यक्ती स्वत:चे निर्णय स्वत: घेत नाही, ते दुसऱ्यावर सोपवून मोकळी होतात आणि त्याचे श्रेय मग दुसऱ्या व्यक्तीलाच मिळून जाते. हा स्वभाव स्वार्थासाठी, ताकदीच्या प्रदर्शनासाठी वापरात येत असेल तर चांगले नाही. प्रेमात पडल्यावर किंवा लग्नानंतर एकमेकांच्या ताब्यात रहायचा प्रयत्न करणारी माणसे अशा स्वभावाची असतात. उगाच घरात भांडणे नको, वादावादी नको म्हणत त्याला घाबरून नेहमीच समोरच्या व्यक्तीच्या मताला मान देऊन होकार भरत जाणं म्हणजे स्वभावातला भिडस्तपणा होय!
सतत त्याग करणं, सोसत राहणं म्हणजे लोक आपल्याला चांगलं समजतील हा त्यांचा गैरसमज असतो. लोक तोंडावर जरी चांगलं बोलत असले, तरी पाठीमागे चेष्टा करतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. अशा वेळी शोषण केलं जातं. त्या व्यक्तीच्या मनात एखादा न्यूनगंड असू शकतो. त्यामुळे स्वभाव भिडस्त बनू लागतो. दुसऱ्यांकडून प्रेम, कौतुक मिळवण्यासाठी स्वत: कुठलाही त्रास सहन करत राहतात. त्रास सोसणं हे प्रेमाचे प्रतीक आहे असं त्यांना वाटतं. सदगुणी माणसातले सर्व गुण त्या व्यक्तीत असतात. नसते ती स्वअस्तित्वाची जाणीव.
ऑफिसमध्येही अशा भिडस्त माणसावर कामे ढकलली जातात कारण ती व्यक्ती स्पष्टपणे नकार देत नाही. ढोंगी माणसे त्यांच्यासमोर नाटके करून सहानुभूती मिळवून आपलं कार्य साधून घेतात. अशा व्यक्तींना नेहमीच टार्गेट बनवलं जातं. कॉलेज, ऑफिस, घरात अशा व्यक्तींना त्रास देण्याचा बाकीच्यांचा कल असतो. अशा व्यक्तींचा आत्मविश्वास जागा करून त्यांना नव्या जीवनशैलीने जगण्यासाठी तयार करायला हवं. स्वत:साठी जगायला त्यांना शिकवलं पाहिजे. भिडस्तपणा सोडून खंबीरपणे स्वत:ची मते मांडता आली पाहिजेत. स्वत:ची प्रतिष्ठा, मानसन्मान जपला पाहिजे. भिडस्तपणाकडून खंबीरपणाकडे वाटचाल केली पाहिजे. स्वत:चं मन मारून जगण्यापेक्षा आपल्या जाणिवांवर लक्ष ठेवून त्यातून निर्माण होणारे विचार, भावना यांना प्राधान्य दिले पाहिजे.
स्वत:ची प्रतिमा आणि स्वत्वाची जाणीव उंचावली की माणसाची उन्नती होऊ शकते. त्यासाठी ठामपणाचे धोरण आचरणात आणले पाहिजे, अशा व्यक्तीला सामाजिक परस्पर संवादाची भीती असते जे लोक भिडस्त असतात त्यांना परस्पर संवाद आवडत नाही. हा एक मनाचा अंगभूत गुण असू शकतो किंवा एखादा मानसिक विकारही असू शकतो. निसर्गातील वैविध्य पाहून मन अचंबित होतं. कुत्रे, मांजरी, प्राणी, झाडे, वेली यातही लाजाळूपणा दिसतो. कासव हात लवताच अंग आत ओढून घेतो किंवा लाजाळू पाने मिटून घेते. भीतीची भावना प्रत्येकात असते. अशीच भिडस्तपणाची भावना पण प्रत्येकात असते, ती कमी-जास्त असते इतकंच.
दरवेळी भिडस्तपणाची भावना वाईट असते असे नाही पण अशा स्वभावाच्या माणसाची फसवणूक होऊ शकते. त्याचा वापर करून घेतला जाऊ शकतो. समाजात दुसऱ्याचे पाय ओढणारे बरेच भेटतात म्हणून आपले कोण आणि परके कोण हे बारकाईने पहिले पाहिजे. तिथे भिडस्तपणा हा कमकुवत ठरू शकतो. योग्य ठिकाणी योग्य शब्दात नकार देता आला पाहिजे. आपलं म्हणणं मुद्देसूदरित्या मांडता आलं पाहिजे. त्यासाठी स्वभावात बदल घडवणं शक्य असेल तर तो घडवून आणला पाहिजे. अशा स्वभावाच्या व्यक्तीला ‘सबमिसीव्ह पर्सनलिटी’ म्हणतात. त्यांचा लबाड लोक गैरफायदा घेतात. मान खाली घालून मुकाट्याने, संकोचाने, सोशिकतेने कामे करणाऱ्या लोकांना त्यांच्या भिडस्तपणाचा त्रास सहन करावा लागतो.
माझ्या नात्यात अशी माझी जवळची व्यक्ती मी पाहिली आहे. तिच्या भिडस्त स्वभावामुळे तिला आजूबाजूचे लोक, तिचे नातेवाईक तिला राबवून घेत असत. तिचे शिक्षण अगदीच कमी होते त्यामुळे तिच्या मनात आपल्याला काही कळत नाही ही भावना असायची. आपले अज्ञान झाकण्यासाठी ती पडेल ती कामे करून घरच्यांना सुखात ठेवायचा प्रयत्न करायची. पुढे पुढे तर तिची मुलेही तिला काडीचीही किंमत देत नसत. घरातली हक्काची कामवाली एवढीच तिची किंमत उरली होती. तिने जर भिडस्तपणा सोडून सर्वांना ठणकावून सांगितले असते, की मी घरातली गृहिणी आणि महत्त्वाची सदस्य आहे; कामवाली नाही तर तिचा आत्मविश्वास जागा झाला असता. तिच्या कष्टाची कदर झाली असती.
भिडस्त स्वभावामुळे एखादी व्यक्ती आपले गुण इतरांसामोर मांडू शकत नाही. ती व्यक्ती प्रतिभावान असली तरी तिला व्यासपीठावर जायला संकोच वाटणे, कुणासमोर बोलताना थरथर होणे अशा गोष्टींनी त्या व्यक्तीचा विकास होत नाही. नकारात्मक विचार दूर ठेवणे आणि स्वत:च्या आत्मविश्वासाला चालना देणे यामुळे भिडस्त स्वभावावर मात करता येते. तुमच्या आजूबाजूला किंवा नात्यात असं कुणी असेल तर तिला यातून बाहेर पडण्याला मदत करून पहा ती व्यक्ती आत्मविश्वासाने जगू शकेल.
प्रतिभा कारंजकर, फोंडा