आपले आयुष्य, त्यात घडणाऱ्या घडामोडी, आपण मिळवलेले यश हे सगळे जगाला कळावे; आपले कौतुक व्हावे असे वाटून समाज माध्यमांवर आपण आपल्या आयुष्यातील घडामोडींबद्दल लिहित असतो.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. हे विधान आपण लहानपणापासून अनेक वेळा, अनेक संदर्भात ऐकत आलो आहोत. खरेतर, या विधानात तथ्य आहेच. समाज, त्यातले घटक हा आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे; आपले जगणे, वागणे यावर अवलंबून असते. पण याचीच एक खूप मोठी किंमत आपण अगदी लहानपणापासून, आपल्या नकळत्या वयापासून चुकती करत असतो. अगदी बाळ असतानासुद्धा, “ते बघ ते दुसरे बाळ.. किती शहाणे आहे, रात्री झोपते...”
ॉअसे विधान आपण आपल्या बाळाशी किंवा त्याच्या संदर्भात बोलताबोलता अगदी सहज करून जातो. म्हणजेच आपण त्याच्यावर नकळतपणे एकप्रकारचा ताण घालत असतो. पुढेपुढे हा ताण वाढत जातो. मित्रमंडळी, चुलत भावंडे यांच्याशी होणारी तुलना, स्पर्धा ही जशी आपल्यावर लादली गेली तशी ती आपणही लादत असतो. नंतरच्या आयुष्यातही मग ही स्पर्धा असतेच! आपले समाजातले ‘स्टेटस’ जपण्यासाठी आपण आपल्या घरातले सामान बदलत राहतो, नवीन गाड्या, वस्तू घेत राहतो. निव्वळ आवड आणि हौस म्हणून या गोष्टी केल्याच जात नाहीत आणि फक्त दाखवण्यापुरत्या केल्या जातात असे टोकाचे माझे म्हणणे नाहीच. पण या गोष्टी करण्यामागे फक्त हौसच असते आणि समाजाचा ताण नसतो ते पूर्णपणे नाकारण्याचा भाबडेपणाही माझ्यात नाही. हा ताण, ही स्पर्धा आपल्याला आयुष्यात अभ्यास करण्यासाठी, काम करण्यासाठी, कष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देत असते हेही खरे असले तरी त्याचे प्रमाण नियंत्रणात असेल पाहिजे. ते नसले तर या स्पर्धेमुळे निर्माण होणारा ताण त्रासदायक ठरू शकतो. हाच ताण गेल्या दहा-पंधरा वर्षात एक वेगळे रूप धारण करून आला आहे, तो म्हणजे सोशल मिडिया अर्थात समाज माध्यम! आपले आयुष्य, त्यात घडणाऱ्या घडामोडी, आपण मिळवलेले यश हे सगळे जगाला कळावे; आपले कौतुक व्हावे असे वाटून समाज माध्यमांवर आपण आपल्या आयुष्यातील घडामोडींबद्दल लिहित असतो. मग या स्पर्धेचा, चढाओढीचा तिथेही कधीतरी शिरकाव झाला. लोकांच्या आयुष्याचा एक भागच आपल्याला तिथे दिसतो, संपूर्ण आयुष्य नव्हे या गोष्टीचा विसर पडून आपण त्यांच्या आयुष्याचा तो तुकडाच खरा मानायला लागलो. त्यावरून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षापेक्षा कधी वाढवून चढवूनही सांगितल्या असतील. कदाचित ही गोष्ट एकवेळ चालून जाण्यासारखी असेलही पण याच गोष्टीचे रूपांतर पुढे अजून घातक गोष्टींमध्ये होऊ शकते. या स्पर्धेत, ताणात टिकून राहण्यासाठी लोक काही गोष्टी मुद्दाम करत असतील का? किंवा काहीवेळा प्रत्यक्षात नसलेल्या गोष्टीही लोक इथे आव आणून दाखवत असतील का? याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. खरेतर, ‘अ सोशल लाईफ‘ हा ८ वर्षांपूर्वीचा लघुपट. कदाचित त्यावेळी त्याचे गांभीर्य इतके लक्षात आले नसेल किंवा आपल्याबाबतीत इतके टोकाचे काही घडणार नाही असे आपल्याला तेव्हा वाटले असल्याची शक्यता नाकारता येणार नाही पण आज मात्र या लघुपटाचे महत्त्व पटते. ८ मिनिटांचा, कोणतेही संवाद किंवा निवेदन नसणारा हा लघुपट आहे. प्रत्यक्षात एकटी पडलेली व्यक्ती समाज माध्यमांवर इतरांचे आयुष्य बघून, आपले आयुष्य कसे चांगले चालू आहे हे दाखवण्यासाठी अक्षरशः झटत असते. समाज माध्यमांवर पोस्ट करण्यासाठी काही गोष्टी मुद्दाम करणे ते काही गोष्टी केवळ तिथे पोस्ट करण्यापुरत्या करणे हा प्रवास या ८ मिनिटात दाखवला आहे. आयुष्यातली अशी कोणती पोकळी असते जी ‘लाइक्स’ आणि ‘कॉमेंट्स’ने भरून निघत असेल हा प्रश्न आपल्याला पडतो. आपण नकळत आपल्याला पडताळून बघायला लागतो. आपले आयुष्य छान चालू आहे हे दाखवण्याचा अट्टाहास करताना आपण जगाशी खोटे बोलत असतोच पण या दरम्यान आपण स्वतःशीही खोटे बोलत असतो. पण ही गोष्ट तिला उमजलेलीच नसते. हे खोटे बोलणे आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? काही लाइक्स आणि कॉमेंट्स आपल्याला यातून बाहेर काढणार असतात का? हे प्रश्न तिला पडतच नाहीत. हे जगाच्या चौकटीत बसण्यासाठी आपण करतोय असे वाटून ती व्यक्ती फक्त स्वतःची फसवणूक करत नसते तर स्वतःला नैराश्याच्या गर्तेत ढकलत असते. कारण एकदा आपण स्वतःची प्रतिमा निर्माण केली की ती टिकवून ठेवण्यासाठी वारंवार तसे फोटो पोस्ट करावे लागतात. ही जणू कधीही न संपणारी अंधारी साखळीच आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? तो प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. लघुपटाच्या शेवटी तिला तो सापडतो, निदान तिच्या अंधाऱ्या आयुष्यात उजेडाचा एक किरण येतो आणि आपण आपल्या नकळत सुटकेचा निःश्वास सोडतो. केवळ आठ मिनिटात, कोणताही संवाद किंवा निवेदन नसताना आपण एखाद्या व्यक्तिरेखेशी इतके जोडले जाऊ शकतो या गोष्टीचे मला नवल वाटले. कदाचित ही समस्या जितकी त्या व्यक्तिरेखेची आहे त्या प्रमाणात नसली तरी काही प्रमाणात आपली आहे, आपल्या आजूबाजूच्या माणसांची आहे म्हणूनही असे वाटू शकते? माहीत नाही.
परवा मी एकेठिकाणी वाचले की, आपल्याला समाज माध्यमावर २० लाइक्स मिळाल्या तर आपल्याला त्या कमी वाटतात पण प्रत्यक्ष आयुष्यात २० माणसे आपल्याला येऊन आपली एखादी गोष्ट आवडल्याची तरी सांगतील का? म्हणूनच, समाज माध्यम या आयुष्याच्या एका भागाला किती महत्त्व द्यायचे हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच मुळात समाज माध्यम हे आपले आणि इतरांचेही संपूर्ण आयुष्य नाही हे मान्य करणे गरजेचे आहे.
मुग्धा मणेरीकर, फोंडा