लाजून हासणे अन हासून ते पहाणे...

आपल्या प्रिय व्यक्तीला समोर पाहताना झालेला आनंद हा आपण चेहर्‍यावर लपवू शकत नाही आणि या अतीव आनंदाने जेव्हा लाजून चूर व्हायला होते, तेव्हा नजर तर झुकतेच, परंतु नजर झुकलेली असतानाही काहीतरी बहाणा करून समोरच्या व्यक्तीला पाहण्याचा आनंद हा मनाला उल्हासित करणारा असतो.

Story: शब्दगीते |
25th January, 06:23 am
लाजून हासणे अन हासून ते पहाणे...

स्त्री जेव्हा लाजून चूर होते, तेव्हा तिचे हे लाजणे तिच्या हसऱ्या डोळ्यांतून, गोबर्‍या गुलाबी गालावर फुललेल्या लालीवर, थरथरणार्‍या आणि किंचित दबलेल्या ओठांतून व्यक्त होत राहते. हे सर्व व्यक्त होताना तिच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हा मनाला

सुखावणारा असतो आणि हाच आनंद कवीवर्य मंगेश पाडगावकर हे आपल्या कवितेत आपल्याला देताना म्हणतात,

लाजून हासणे अन हासून ते पहाणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे!

लाजताना समोरच्या प्रिय व्यक्तीकडे पाहण्याचे धैर्य होत नाही आणि लाजेने चूर होऊन नजर खाली वळते. तेव्हा कवी मंगेश पाडगावकर यांच्या कवितेतील शब्द हे प्रेमाचे सूर घेऊनच जन्माला येतात आणि त्या कवितेचे सुंदर गाणे बनून जाते. या मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या शब्दांना जेव्हा श्रीनिवास खळे यांच्या संगीताद्वारे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा अलौकिक असा गर्भरेशमी स्वरांचा लेप चढतो, तेव्हा हे गाणे आहे की शब्द, सुर, ताल यांचा काही अद्भूत असा त्रिवेणी संगम आहे? असा संभ्रम मनात निर्माण होतो. लाजून जेव्हा नजर खाली वळते, तेव्हा डोळ्यांच्या पापण्याही अलगद मिटल्या जातात. हे सांगताना कवी मंगेश पाडगावकर किती सुंदर शब्दात व्यक्त होतात! ते म्हणतात,

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?

मिटताच पापण्या अन का चंद्रही दिसावा?

हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे...

लाजून नजर झुकली गेली, तेव्हा पापण्यांचाही भार सहन न होऊन डोळे मिटले गेले आणि या नाजूक पापण्यांचाही या डोळ्यांना भार का झाला? हा प्रश्न मंगेश पाडगांवकरांना पडला. या पापण्यांचा भार सहन न झाल्याने डोळे मिटले गेले तेव्हा समोर आलेला चेहरा पाहताना कवीला सुंदर असा चंद्र पाहिल्याचा भास होतो आणि पापण्या मिटताना चंद्र कसा दिसला? हाही प्रश्न कवीच्या मनात उपस्थित होतो आणि ते म्हणतात, हे प्रश्न जीवघेणे, हरती जिथे शहाणे! या सर्व प्रश्नांची उत्तरे समजण्याच्या पलिकडची असून याची उत्तरे शहाणे बनून मिळणार नाहीत तर त्यासाठी प्रेमात वेडे होऊनच मिळवावी लागतील असे ते सूचित करतात.

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे?

हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे!

तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे!

निस्सीम प्रेम ही हृदयातून फुलणारी भावना आहे आणि हृदयातून हे  प्रेम फुलवण्यासाठी, प्रेम जपण्यासाठी फक्त दोन नाजूक हृदयांची आवश्यकता असते. प्रेम म्हणजे एका हृदयाचा दुसर्‍या हृदयाशी झालेला संवाद! जिथे एका हृदयाचा संवाद हा दुसर्‍या हृदयाशी आपसूक होत जातो, तिथेच प्रेम बहरास येते.

लाजून नजर खाली झुकलेली असताना समोरच्या आवडत्या व्यक्तीकडे हळूच मारलेला निरागस असा भोळा तिरपा कटाक्ष हा एखाद्या बाणासारखा तीक्ष्ण आहे. हा तिरपा बाणरूपी कटाक्ष समोरच्या व्यक्तीच्या काळजात खोलवर रूतत जातो आणि त्या तिरप्या कटाक्षाने ती व्यक्ती घायाळ होऊन जाते. हा प्रेमाचा तिरपा कटाक्ष मारणार्‍याला वेदना होत नाही. मात्र ज्याच्यावर हा तिरपा नजरेचा कटाक्ष टाकला जातो, त्याच्या हृदयात हा नजरेचा बाणरूपी तिरपा कटाक्ष खोलवर रुतत गेल्याने होणार्‍या वेदना या शहाण्या माणसाला कधीच समजणार नाही. त्यासाठी प्रेमात वेडे व्हावे लागते. तेव्हाच या प्रेमाची अनुभूती घ्यावयास मिळते हे कवी मंगेश पाडगावकर आपल्या या कवितेत अगदी नकळत सांगून जातात... 

रात्रीच्या वेळी आपली सखी जेव्हा आपल्या समोर येते, तेव्हा तिचे सौन्दर्य पाहून ती एखाद्या उगवणार्‍या टपोर्‍या तार्‍याप्रमाणे कवीला भासते. तिच्या शरीराच्या सुगंधाने फुलांच्या राशी फुलून गेल्याने वाराही सुगंधित होतो आणि अशा सुगंधित मोहक रात्रीच्या वातावरणात चांदण्याचा वर्षाव होतो. या रंगीत, गंधीत रात्रीच्या प्रहरी चांदण्याच्या वर्षावात कवीमनाच्या हृदयातून हे सुरेल गाणे स्फुरले गेले आणि मंगेश पाडगावकरांच्या लेखणीतून,

जाता समोरूनी तू उगवे टपोर तारा

देशातुनी फुलांच्या आणि सुगंध वारा

रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे !..

या कवितेच्या शेवटच्या ओळी लिहिल्या गेल्या... व्वा!! अशा कविता मंगेश पाडगावकरांनीच लिहाव्यात आणि त्या श्रीनिवास खळे यांच्या संगीतात न्हाऊन पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीच गाव्यात!


कविता आमोणकर