एखाद्या व्यक्तीबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता वाटणं आणि ती दर्शवण्यासाठी त्याला धन्यवाद म्हणणं ही मनापासून वाटलेली भावना आणि चांगला शिष्टाचार मानला जातो.
पूर्वी एक गोष्ट वाचली होती. त्यात एकदा स्वर्गातला देव आणि पृथ्वीतलावरचा माणूस एकमेकांना भेटतात आणि दोघेही सुरुवातीला पहिलेच वाक्य बोलतात, “माझी निर्मिती केल्याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार.” खरोखरच कुणी कुणाची निर्मिती केली देवाने माणसाची की माणसाने देवाची पण आभार मानायची भावना मात्र आपली आपली मानसिकता दर्शवते. सार्वजनिक सभा भाषणात जरी आभार प्रदर्शन ही एक कृत्रिम क्रिया असली, तरी तिचे स्वरूप वेगवेगळ्या संदर्भात बदलत असते. तो वक्ता तिथे आला त्याने आपला बहुमोल वेळ दिला मार्गदर्शन केले म्हणून आभार मानणे गरजेचेच असते. आभार मानणं हा अनौपचारिक प्रकार नाही तर ती एक भावना आहे. मनामध्ये कृतज्ञता असणे हा त्या मागचा विचार आहे. तो तुम्हाला मनापासून आनंद प्राप्त करून देतो. माझी अमेरिकेतली नात मी तिला पाण्याचा ग्लास दिला तरी “थँक यू आज्जी” म्हणते. म्हटलं असं सारखं सारखं थँक यू नको म्हणूस. आपल्या माणसाला असं कुणी म्हणत नाही. पण कधी कधी अगदी जवळच्या आपल्या माणसांना आपण कधी मनात असूनही ‘थँक यू’ म्हणत नाही. ते राहून जातं आणि मनात ते शल्य उरतं.
बसमध्ये आपल्याला आपली बसायची जागा देणाऱ्या व्यक्तीला तेव्हाच ‘थँक्स’ नाही म्हटलं, कदाचित ती व्यक्ती पटकन उतरूनही गेलेली असते आणि आपल्याला जाणवतं आपण त्याला ‘थँक्स’ नाही म्हटलं. तसंच कधी कधी आपल्या जीवनात काही बहुमोल योगदान देणाऱ्या व्यक्तीला आपण धन्यवाद देत नाही, त्याच्या कष्टाची कदर करत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला आपल्याविषयी काय वाटत असेल याचा विचार करायला पाहिजे. जेव्हा आपण त्याला म्हणतो, “आज मी तुझ्यामुळे स्वत:च्या पायावर उभा आहे. तुझ्या मदतीमुळे आज मी इथपर्यंत पोहचलो.” तेव्हा समोरच्या माणसाला तर बरं वाटतंच, पण आपल्याही मनाला खूप छान वाटतं. आईवडील, मुले, पती-पत्नी यांचे अगदी जवळचे नाते असते, तिथे अशा फॉर्मलिटीजची गरज नाही असं आपल्याला वाटत असतं पण ती गोष्ट केल्याने जर आनंद होत असेल तर करण्यात कंजूसी कशाला करायची? ‘दिल खोल के’ समोरच्याचे आभार मानावेत, स्तुती करावी, धन्यवाद द्यावेत. त्यामुळे आपल्याला फार मोठे कष्ट पडत नाहीत, पण नात्यात एक सहजता आपुलकी वाढते.
कुटुंबासमवेत घालवलेला प्रत्येक क्षण हा एक आशीर्वाद असतो. कुणाच्याही प्रेम, साथ-सोबत, कष्ट यासाठी सदैव आभारी असावं. संकटकाळी कुणी केलेली मदत, मग ती व्यक्ती अनोळखी असली तरी तिचे मनापासून थँक्स मानले पाहिजेत कारण तिच्यामुळे आज आपण जिवंत आहोत ही भावना त्यात असते. परमेश्वरी कृपादृष्टीबद्दल त्या जगत नियंत्याचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. योगाच्या क्लासमध्ये रोज डोळे बंद करून मनात रोज तीन माणसांना धन्यवाद द्यायला सांगितले जाते. अशा तीन माणसांची आपल्या मनाने दखल घेतली, त्यांना मनापासून धन्यवाद दिल्याने आपल्याच मनाला एक प्रकारची शांती, सुख, समाधान मिळतं. निसर्गाबद्दल, निर्मात्याबद्दल आपल्या मनात कायम अशी आदर भावना आणि आभार मानण्याची कृती घडली पाहिजे. कृतज्ञता ही अशी एक भावना जी व्यक्त केल्याने तुमच्या मनाला आनंद, सुख, समाधान मिळते. जे काही परमेश्वराने आपल्याला बहाल केले आहे त्याबद्दल त्याला थँक्स म्हणणं गरजेचं असतं.
अमेरिकेत ‘थँक्स गिव्हींग डे’ हा दिवस खास त्यासाठीच साजरा केला जातो. नोव्हेंबरच्या अखेरच्या गुरुवारी याचे आयोजन केले जाते त्यावेळी कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र येऊन खाणे-पिणे, मौज-मजा करतात. एक पूर्ण दिवस कुटुंबासाठी बाजूला काढून ठेवतात. अर्थात, त्या दिवशी सर्वांना सुट्टी दिली जाते. एकमेकांना भेटी देणे, भेटवस्तू देणे, सर्वांनी एकत्र येऊन गप्पागोष्टींमध्ये वेळ घालवणे त्यासाठी हा सण साजरा केला जातो, एरव्ही प्रत्येक जण आपल्या कामात, व्यापात व्यस्त असतो पण या दिवशी मात्र कुटुंबासाठी, नातेसंबंध टिकून राहण्यासाठी ते एकत्र येतात. एकमेकांच्या घरी जाऊन ख्याली-खुशाली जाणून घेतात, घरी पार्टीचे आयोजन करतात. त्यासाठी घराची रंगरंगोटी करून घर सजवले जाते. नवनवीन वस्तूंची खरेदी होते. अशा वेळी मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या प्रत्यक्ष भेटीने जवळीक वाढते. विविध स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. शेजाऱ्यांना जेवायला बोलावतात. या दरम्यान लोक देवाचे आणि एकमेकांचे आभार मानतात. आपणही सणवाराचे औचित्य साधून असे कुटुंबासोबत एकत्र येऊन सण साजरा करतो तेव्हा एकमेकांविषयी मनात असलेली प्रेमभावना, कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते. कुणी कुणाला काय भेटवस्तू दिली याचे मूल्यमापन करत बसण्यापेक्षा, आठवणीने तुमच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे.
लहानपणापासून आपल्याला कुणी काही गिफ्ट दिलं की त्याला ‘थँक्स’ म्हणायचं शिकवलेलं असतं. तेव्हापासून तो एक सामाजिक नियम म्हणून आपण त्याचे पालन करत असतो. पण एखाद्या व्यक्तीबद्दल जाणीवपूर्वक कृतज्ञता वाटणं आणि ती दर्शवण्यासाठी त्याला धन्यवाद म्हणणं ही मनापासून वाटलेली भावना आणि चांगला शिष्टाचार मानला जातो. कृतज्ञता आपल्या मेंदूत बदल घडवून आणते. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. नकारात्मकतेवर मात करते. नैराश्याचा सामना करायला शिकवते. जेव्हा आपण कुणाची स्तुती किंवा कौतुक करतो, तेव्हा आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्या आनंदात भर पडते. त्याची कार्यशक्ती प्रेरित होते, शारीरिक आरोग्य चांगले राहते. त्यासाठी दिवसभरात एकदा तरी कुणाला तरी ‘थँक्स’ म्हणून बघा. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?
प्रतिभा कारंजकर, फोंडा