तिसरा जिल्हा; केपे, सांगे, धारबांदोडा, काणकोणचा समावेश

समितीचा प्रस्ताव; लवकरच येणार मंत्रिमंडळ बैठकीत


18th January, 12:07 am
तिसरा जिल्हा; केपे, सांगे, धारबांदोडा, काणकोणचा समावेश

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केपे, सांगे, धारबांदोडा आणि काणकोण या चार मागास तालुक्यांचा समावेश असलेला तिसरा जिल्हा स्थापन करण्यात यावा. या जिल्ह्याचे मुख्यालय केपेमध्ये स्थापन करून सांगे आणि धारबांदोडा येथे उपविभागीय कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव याबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने सरकारला सादर केला आहे. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
राज्यात सध्या उत्तर आणि दक्षिण असे दोन जिल्हे आहेत. केपे, सांगे, धारबांदोडा आणि काणकोण या चार तालुक्यांचा समावेश दक्षिण गोव्यात होतो. दक्षिण गोव्याचे मुख्यालय मडगावमध्ये आहे. त्यामुळे केपे, सांगे, धारबांदोडा आणि काणकोण या तालुक्यांतील जनतेला प्रशासकीय कामांनिमित्त वारंवार मडगावला फेऱ्या माराव्या लागतात. त्याचा जनतेला अनेक गोष्टींनी फटका बसत आहे. त्यात हे चारही तालुके मागास म्हणून ओळखले जातात. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि स्थानिकांचे प्रशासकीय प्रश्न सोडवण्यासाठी या चार तालुक्यांचा समावेश असलेला तिसरा जिल्हा स्थापन करण्याची मागणी सभापती रमेश तवडकर यांच्यासह मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, धारबांदोड्याचे आमदार गणेश गावकर, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारने या प्रक्रियेला गती दिली होती.
समितीने नुकताच सादर केला अहवाल
तिसरा जिल्हा स्थापन करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी सरकारने गतवर्षी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वित्त सचिव, निवासी आयुक्त, महसूल सचिव, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार चारुदत्त पाणीग्रही आणि नियोजन आणि सांख्यिकी खात्याचे संचालक यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती.
तिसरा जिल्हा स्थापन केल्यास किती खर्च येईल, किती लोकांना आणि किती प्रमाणात याचा फायदा होईल, तिसऱ्या जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्यांचा समावेश करण्यात यावा, याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले होते. त्यानुसार या समितीने काही दिवसांपूर्वी सरकारला अहवाल सादर केला आहे.