गोव्याचे लोकायुक्त पद एका महिन्यापासून रिक्तच

अंबादास जोशी यांचा कार्यकाळ संपुष्टात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th January, 12:12 am
गोव्याचे लोकायुक्त पद एका महिन्यापासून रिक्तच

पणजी : लोकायुक्त अंबादास जोशी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गोव्याचे लोकायुक्त पद पुन्हा रिक्त झाले आहे. अंबादास जोशी यांचा कार्यकाळ १५ डिसेंबर २०२४ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी संपला. नवीन लोकायुक्तांची नियुक्ती न झाल्याने लोकायुक्त पद गेल्या एक महिन्यापासून रिक्त आहे.

निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी यांनी ७ मे २०२१ रोजी लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला. ते ४ वर्षे ७ महिने लोकायुक्त होते. वयाच्या अटीमुळे ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. निवृत्त न्यायमूर्ती पी.के. मिश्रा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अंबादास जोशी यांनी लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.

अंबादास हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होते. जुलै २०१४ ते जुलै २०१९ पर्यंत ते महाराष्ट्र प्रशासकीय लवादाचे अध्यक्ष होते. पी. के. मिश्रा यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०२०मध्ये संपला. यानंतर ७ महिने लोकायुक्त पद रिक्त होते. तो काळ कोविड-१९ महामारीचा प्रसाराचा काळ होता. आताही एक महिना उलटून गेला तरी लोकायुक्त पदावर नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेली नाही.

२०१२मध्ये विधेयक मंजूर

२०१२ मध्ये दिवंगत मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना गोवा लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर २०१३ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर २०११ मध्ये लोकायुक्त कायद्यात सुधारणा करण्यात आल्या.