बॉक्स ऑफिस हे चित्रपटांच्या यशाचे एकमेव प्रतीक आहे काय?

Story: भाष्य । हर्षदा वेदपाठक |
16th January, 11:54 pm
बॉक्स ऑफिस हे चित्रपटांच्या यशाचे एकमेव प्रतीक आहे काय?


चांगला चित्रपट हा तुम्हाला धक्का देऊन संपतो, जो चित्रपट हा शेवटची नामावली संपल्यानंतरही तुमच्या मनात बराच काळ रुंजी घालत राहतो. तो उत्तम चित्रपट आणि हीच उत्कृष्ट सिनेमाची ताकद आहे. तो केवळ तुमचे मनोरंजनच करत नाही, तर तुम्हाला पूर्णपणे दुसऱ्या विश्वात घेऊन जातो. सिनेमा हा आठवड्याच्या शेवटी त्याने किती गल्ला जमा केला, हे मोजण्यासाठी किंवा मसालेदार बातम्या मिळवण्यासाठी नाही, तर तो त्याही पलीकडचा आहे. आपल्यापैकी अनेकांसाठी सिनेमा हा खूप महत्त्वाचा घटक असतो..


बऱ्याचदा बॉक्स ऑफिसवरची कमाई, ही चित्रपटाच्या यशाचे मोजमाप करण्याचे अंतिम साधन मानले जाते. ही संख्या जितकी जास्त तितका तो चित्रपट यशस्वी म्हणून गणला जातो. खेदाने म्हणावे लागते की, आज तेच संपूर्ण सत्य आहे. पण दिग्दर्शकाच्या उत्कृष्ट कामगिरीचा हाच एकमेव मापदंड असतो का? जे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाई करू शकत नाहीत ते अपयशी चित्रपट मानले जातात का? ते केवळ मास्टरपीस म्हणून मानले जाऊ शकतात का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये पडद्यावर आलेले काही उत्कृष्ट चित्रपट कधीही बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले नाहीत.
बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसच्या आकड्यांमुळे नव्हे तर कथानक आणि सादरीकरणातून प्रेक्षकांशी नाळ जोडले जाण्याच्या क्षमतेमुळे, राष्ट्राचा गौरव अधोरेखित केल्याने किंवा सामाजिक बदलाची भावना निर्माण केल्याने यश मिळवले आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि आमिर खान अभिनित लगान (२००१), राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंती (२००६) आणि श्री नारायण सिंग दिग्दर्शित टॉयलेट: एक प्रेम कथा (२०१७) यासारख्या चित्रपटांनी बाहुबली किंवा दंगलचे बॉक्स ऑफिसवरचे विक्रम मोडीत काढले नाहीत. परंतु त्यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक विषयावर चर्चा घडवून आणल्या, गंभीर समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्याने प्रेक्षकांवर कायमची छाप सोडली.
उदाहरणार्थ, लगानने भारताच्या दीर्घकालीन वसाहतविरोधी विद्रोहाचे चित्र उभे केले. तर रंग दे बसंतीने तरुणांच्या राजकीय सक्रियतेची ठिणगी चेतावली. टॉयलेट एक प्रेम कथा हा सत्यकथेवर आधारित असलेल्या चित्रपटाने देशात उघड्यावर शौचास जाण्याविषयीच्या मुद्द्यावर भाष्य केले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात चित्रपट अनेक स्तरावरील संस्कृती, परंपरा आणि समाजाला परिभाषित करणाऱ्या आव्हानांचा आरसा म्हणून काम करतात. प्रेक्षकांचे आयुष्य पडद्यावर प्रतिबिंबित करण्यात आणि त्यांना कथानकात गुंतवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी झाला की, त्याचा प्रभाव बॉक्स ऑफिसवर गल्ले जमवणाऱ्या चित्रपटांपेक्षा दीर्घकाळ टिकणारा असतो.


आधुनिक काळातील प्रेम – विनोदी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, इम्तियाज अली दिग्दर्शित जब वी मेट (२००७) हा बॉक्स ऑफिसवर माफक प्रमाणात यशस्वी ठरला, ज्याने भारतात सुमारे ६५ कोटींची कमाई केली, जी रोमँटिक कॉमेडीसाठी चांगली होती. परंतु बॉलीवूडच्या हिट चित्रपटांच्या मानकांमध्ये ती बसणारी नव्हती. बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या मानकांनुसार जब वी मेट ब्लॉकबस्टर नसला तरी, त्याने त्यापेक्षा अधिक मौल्यवान गोष्टी कमावल्या. त्यात एक समर्पित, निष्ठावान चाहता वर्ग आहे, ज्यांनी हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला आणि हा प्रेक्षकवर्ग वाढतच गेला. या चित्रपटातील करीना कपूरने सादर केलेली गीत हि व्यक्तिरेखा कोणत्याही वयात येणाऱ्या मुलीचे प्रतिनिधित्व करणारी होती. या चित्रपटाचा प्रभाव इतका जास्त होता की त्याचा चाहता वर्ग तयार झाला आणि तो इतका मोठा होता की, चित्रपट अनेक वर्षांनंतर पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला. ही सुरुवातीला बॉक्स ऑफिस चार्टवर वर्चस्व गाजवू न शकणाऱ्या चित्रपटाची एक दुर्मिळ कामगिरी होती.
हा चित्रपट म्हणजे एका लोकप्रिय संस्कृतीचा चिरस्मरणीय कलाकृतीचा असा दाखला आहे ज्याने व्यावसायिक यश मिळवले नसले तरीही मनामनावर राज्य केले आहे. जब वी मेटचे खरे यश त्याच्या सुरुवातीच्या आठवड्याच्या गल्ल्यावरून किंवा जगभरातील एकूण कमाईवरून गृहीत न धरता तो प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्या प्रकारे रुंजी घालत राहतो त्यामध्ये आहे. ही एक क्लासिक रोमँटिक कॉमेडी राहिली आहे, जी वर्षानुवर्षे पुन्हा प्रदर्शित केली जाऊ शकते. त्याची तात्कालिकतेची क्षमता त्याच्या बॉक्स ऑफिसच्या आकड्यांच्या कितीतरी पलीकडची आहे.
जब वी मेट या चित्रपटाचे संवाद, विशेषत: गीतच्या (करीना कपूर) तोंडी असलेली प्रसिद्ध ओळ, ‘मैं अपनी फेव्हरेट हूँ’ ही कोणत्याही काळातील प्रेक्षकांना फारच भावून जाते. तरुणाईसाठी हा संवाद मुक्ती आणि स्वातंत्र्याच्या मंत्रापेक्षा नक्कीच कमी नाही.
त्याचप्रमाणे, रणबीर कपूर अभिनीत आणि अयान मुखर्जी दिग्दर्शित वेक अप सिद (२००९) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर माफक यश मिळाले, ज्याने २० कोटीच्या बजेटच्या तुलनेत सुमारे ६० कोटींची कमाई केली. ही जरी चांगली कामगिरी असली तरी, त्याच्या काही समकालीन चित्रपटांनी त्याच वर्षी कमावलेल्या गल्ल्याच्या तुलनेत फारच कमी म्हणावी लागेल.


‘वेक अप सिद’ हा चित्रपट रणबीर कपूर अभिनित सिदची कथा सांगतो, जो महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतरचे जीवन कसे असेल याचा अंदाज घेतो. ही कथा नव्या युगातील प्रौढत्वाच्या अनिश्चिततेचा सामना कसा करावा याचा विचार करणाऱ्या अनेक तरुणांच्या मनातील प्रश्नच अधोरेखित करतो. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला नसला तरी त्याचा प्रभाव त्याला उल्लेखनीय बनवतो. दरवर्षी तरुणांच्या नव्या पिढ्यांना सिदचा जीवन प्रवास हा आपलाच असल्याचे वाटत राहते.
हा चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक वर्षे लोटली तरी आजही या कथेची प्रासंगिकता टिकून आहे. अशा जगात जिथे अनेकदा प्रौढत्वाचा दबाव खूप जास्त वाटू शकतो, वेक अप सिद मात्र स्वत:चा शोध आणि स्वविकासाविषयी एक संयमी आणि आशादायक निवेदन करतो. त्याचे माफक बॉक्स ऑफिस यश त्याचा सांस्कृतिक प्रभाव कमी करत नाही. तो तरुणांना प्रेरणा देत राहतो, त्यांना हे दाखवून देतो की, अडखळणे, चुका करणे आणि तुम्हाला जीवनात काय हवे आहे, हे समजण्यासाठी वेळ देणे, हे अगदी ठीक आहे. हा असा चित्रपट आहे जो दरवर्षी नवीन प्रेक्षकांशी संवाद साधत राहतो आणि प्रौढत्वाकडे मार्गक्रमण करणाऱ्यांना आवडत राहतो.
‘वेक-अप सिद’चा प्रभाव हे सिद्ध करतो की सिनेमातील यश हे केवळ आर्थिक उत्पन्नापुरतेच मर्यादित नसते. चित्रपट तुम्हाला कसा वाटतो, तो तुमच्या स्वतःच्या अनुभवांशी कसा जोडला जातो आणि कालौघात तुमच्यावर त्याचा प्रभाव कसा टिकून राहतो, या बाबी त्याचे यश अधोरेखित करतात. हा एक असा चित्रपट आहे, जो तुमच्यासोबत राहतो, तुम्ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या चित्रपटाकडे पुन्हा पुन्हा वळता, तुम्ही जसजसे मोठे होता आणि तुमच्या व्यक्तीमत्वात बदल होत जातो तसतसे तुम्ही त्यातून नवीन अर्थ शोधता. यशाचा हा प्रकार अधिक महत्त्वाचा आहे.
‘जब वी मेट‘ आणि ‘वेक अप सिद’ हे दोन्ही चित्रपट आपल्याला दाखवतात की चित्रपटाचे खरे यश म्हणजे त्याचा भावनिक प्रभाव आणि सांस्कृतिक महत्ता आहे. बॉक्स ऑफिसचे आकडे आम्हाला सांगू शकतात की, चित्रपट अल्पावधीत किती चालला, परंतु हे आकडे चित्रपटाचा शाश्वत प्रभाव दर्शवत नाहीत. पहिल्या आठवड्यात लाखोंची कमाई करणारा चित्रपट क्षणार्धात विसरला जाऊ शकतो.
अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित पिंक (२०१६) या चित्रपटाने संमतीचे महत्त्व आणि महिलांच्या हक्कांवर प्रकाश टाकला. चित्रपटाने भलेही व्यावसायिक यश मिळवले नसेल तरी याविषयी प्रेक्षकांमधून जबरदस्त प्रतिक्रिया उमटल्या.
बॉलीवूड हा केवळ हिंदी भाषेतील चित्रपटांचा मुख्य प्रवाह नाही. तामिळ, तेलुगू, बंगाली आणि मराठी चित्रपटांसारख्या भारतातील प्रादेशिक चित्रपटांच्या उदयाने यशाच्या व्याख्येला आणखी पदर जोडले आहेत. हिंदी भाषेतील ब्लॉकबस्टर्स राष्ट्रीय मथळ्यांवर वर्चस्व गाजवतात, पण प्रादेशिक भाषांमधील चित्रपट त्यांच्या स्थानिक क्षेत्रात आणि जागतिक समुदायांमध्ये विलक्षण यश मिळवतात.


कांतारा (२०२२) आणि आरआरआर (२०२२) यांसारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिस रेकॉर्डच तोडले नाहीत तर जागतिक स्तरावरील ऑस्कर पुरस्कारांमध्ये त्यांच्या कलात्मकतेसाठी आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली. सिनेमात व्यक्त होण्यासाठी भाषा हा अडथळा नसतो, हेही यातून सिद्ध झाले. हे चित्रपट, विशेषत: आरआरआरने भारताच्या वैविध्यपूर्ण चित्रपट पार्श्वभूमीकडे देखील लक्ष वेधून घेतले आणि हे सिद्ध केले की भारतीय सिनेमातील यश केवळ बॉलीवूडपुरते मर्यादित नाही.
चित्रपटांचा आपल्यावर झालेला प्रभाव हे सिद्ध करतो की चित्रपटनिर्मिती ही केवळ बॉक्स ऑफिसच्या आकड्यांसाठीच नाही तर प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करण्यासाठी देखील केली जाते. जेव्हा एखादा चित्रपट प्रचंड यशस्वी होतो, तेव्हा प्रेक्षक त्याच्या सिक्वेलचीही वाट पाहत असतात. उदाणार्थ बाहुबली. याच प्रेक्षकांमुळे चित्रपट बॉक्स ऑफिस अधिक ताकदीने गाजवतात आणि त्याचे दुसरे उदाहरण म्हणजे स्त्री २ तसेच पुष्पा २. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, चित्रपट चालू द्या, हा चित्रपट उद्योग चालू द्या, चित्रपटाला बॉक्स ऑफिस आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य करू द्या. त्यामुळे सरते शेवटी कोण जिंकणार? तर फक्त ‘चित्रपट’. अशाच चित्रपटांना आणि त्यांच्या रसिक प्रेक्षकांसाठी थ्री चिअर्स...