सलग ितसरा विजय : पेरू संघाचा खेळ खल्लास
नवी दिल्ली : खो खो वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने सलग तिसरा विजय मिळवला. नेपाळ, ब्राझीलनंतर पेरू संघाला पराभूत करत भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिसऱ्या सामन्यात पेरूला टीम इंडियाने चांगलेच झुंजवले. तिसऱ्या डावात टीम इंडियाकडे मोठी आघाडी होती. त्यामुळे सात मिनिटात इतका मोठा फरक कमी करणे कठीण होते. त्यामुळे तिसऱ्या डावातच टीम इंडियाच विजय पक्का झाला होता. प्रत्येक सेकंदाला टीम इंडिया आपला विजय पक्का करत होती. अखेर टीम इंडियाने पेरूला ७०-३८ च्या फरकाने पराभूत करत आपला विजय पक्का केला.
भारताने पहिल्या डावात अटॅक करत सामना आपल्या ताब्यात ठेवला होता. त्यामुळे पेरूला कमबॅक करणे कठीण झाले. भारताचा पुढचा सामना भुतानशी होणार आहे. मात्र, हा सामना नाममात्र असणार आहे. कारण भारताने सलग तीन सामने जिंकून आधीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले आहे.
भारताने पहिल्या डावात अटॅक करत ३६ गुणांची कमाई केली होती. तर पेरूला एकही डिफेंस गुण दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात बचावात्मक खेळताना पेरूच्या खेळाडूंना चांगलेच झुंजवले. खेळाडूंना बाद करण्यासाठी पेरूच्या खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागला. पण इतकी मेहनत करूनही पेरूला फक्त १६ गुण मिळवता आले. त्यामुळे दुसर्या डावाअखेर भारताकडे २० गुणांची आघाडी होती.
तिसऱ्या डावात टीम इंडियाने पुन्हा चांगला अटॅक केला. या डावात टीम इंडियाने ३४ गुणांची कमाई केली. त्यामुळे ५४ गुण भारताच्या खात्यात होते. शेवटच्या सात मिनिटात हा फरक कमी करणे काही पेरूला जमले नाही. पेरूने शेवटच्या सत्रात २२ गुण मिळवले आणि भारताचा ३२ गुणांनी विजय झाला. रामजी कश्यपने या सामन्यात चांगला डिफेंस केला. तर सामनावीराच्या पुरस्काराने अनिकेत पोटेला गौरविण्यात आले.
महिलांकडून इराणचा पराभव
भारतीय महिला खो खो संघाने जबरदस्त कामगिरी करत दुसऱ्या सामन्यात इराणचा १००-१६ अशा फरकाने पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. या सामन्यात भारताने पहिल्या डावापासून मजबूत पकड मिळवली होती. भारताने अटॅक करताना इराणला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या डावात भारताने ५० धावांची आघाडी घेतली. त्यानंतर डिफेंस करताना भारताने दोन ड्रीम प्वॉइंट मिळवले होते. भारताने या डावात फक्त १० गुण गमावले. दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा १७५-१८ या फरकाने दारुण पराभव केला होता.