मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय खुली ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा : इथन वाझ ७ गुणांसह स्पर्धेत कायम
पणजी : स्व. श्री मनोहर पर्रीकर तिसऱ्या गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत २०२५ च्या शेवटच्या फेरीत तीव्र लढती झाल्या. आयएम आयुष शर्मा (मध्य प्रदेश), जीएम सेथुरामन एस.पी. (तामिळनाडू) आणि आयएम स्लिझेवस्की अलेक्झांडर (रशिया) हे नऊ फेऱ्यांनंतर प्रत्येकी साडे सात गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. गोव्याचे आयएम इथन वाझ, आयएम आरण्यक घोष (आरएसपीबी) आणि आयएम टोलोगोन तेगिन सेमेटी (किर्गिस्तान) हे प्रत्येकी ७ गुणांसह पिछाडीवर आहेत. ज्यामुळे रोमांचक अंतिम फेरीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
स्पर्धेत नऊ खेळाडू साडे सहा गुणांसह कायम आहेत. या गटात ग्रँडमास्टर दिप्तयन घोष (आरएसपीबी), ग्रँडमास्टर मित्रभा गुहा (पश्चिम बंगाल), ग्रँडमास्टर बोरिस सावचेन्को (रशिया), ग्रँडमास्टर अलेक्सी फेडोरोव्ह (बेलारूस) आणि ग्रँडमास्टर अजिबिलेग उर्त्सैख (मंगोलिया) अशी उल्लेखनीय नावे आहेत. गोव्याच्या ग्रँडमास्टर अमेया आैदीसह चौदा खेळाडूंनी ६ गुणांसह आपले आव्हान कायम ठेवले आहे.
आयएम आयुष शर्मा याने आयएम टोलोगोन टेगिनचा आश्चर्यकारक पराभव केला, तर जीएम सेथुरामन एस.पी. यांनी आयएम श्रीहरी एल.आर. (तामिळनाडू) वर विजय मिळवला. आयएम स्लिझेव्स्की अलेक्झांडरने आयएम अमेया औदीवर विजय मिळवत आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली. दरम्यान, जीएम दिप्तयन घोष आणि जीएम अलेक्सी फेडोरोव्ह यांनी ड्रॉसह गुणांची देवाणघेवाण केली आणि आयएम आरोन्यक घोष यांनी आयएम समेद जयकुमार शेटे (महाराष्ट्र) विरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला.
अंतिम फेरी १९ जानेवारी रोजी
अंतिम फेरी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री गोविंद गावडे, एआयसीएफचे अध्यक्ष नितीन नारंग, एआयसीएफचे कोषाध्यक्ष धर्मेंद्र कुमार आणि गोवा बुद्धिबळ संघटनेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गोव्याच्या खेळाडूंची मिश्र कामगिरी
गोव्याच्या इथन वाझने आपली उत्कृष्ट खेळी सुरू ठेवली. रोहित कृष्णा एस. (तामिळनाडू) विरुद्ध सनसनाटी विजय मिळवून इथन ७ गुणांसह अव्वल स्थानासाठीच्या शर्यतीत कायम आहे. अमेया औदीला स्लिझेव्हस्की अलेक्झांडरविरुद्ध पराभव पत्कारावा लागला. त्याचे ६ गुण झाले आहेत. ऋत्विज परबने मोक्सीट जे शाह (गुजरात) विरुद्ध विजय मिळवून पुनरागमन केले आणि आता त्याचे साडे पाच गुण झाले आहेत. ग्रँडमास्टर अनुराग म्हामल यांनी आयएम गोचेलाश्विली डेव्हिड (रशिया) विरुद्धच्या कठीण सामन्यात पराभव पत्करला आणि त्यानंतर त्यांचे ५ गुण झाले आहेत.