आयर्लंडचा उडवला धुव्वा : प्रतिका, स्मृतीची शतकी खेळी
राजकोट : भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील अंतिम सामना जिंकून ३-० असा निर्भेळ विजय मिळवला. भारताच्या महिला संघाने संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले. या मालिकेतील तिसरा वनडे सामना राजकोटमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ४३५ धावा ऐतिहासिक धावसंख्या उभारली. या सर्वात मोठ्या वनडे धावसंख्येनंतर भारतीय संघाने आयर्लंडवर ३०४ धावांनी इतिहासातील मोठा विजय नोंदवला आहे. या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिका रावलला ‘मालिकावीर’ आणि ‘सामनावीर’ म्हणून निवडण्यात आले.
या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला आणि भारतीय संघाने ५० षटकांत ५ गडी गमावून ४३५ धावांचा डोंगर उभा केला. महिला एकदिवसीय सामन्यात ४०० धावांचा टप्पा पार करणारा भारतीय संघ पहिला आशियाई संघ आहे. टीम इंडियाने मागील सामन्यातही ३७० धावसंख्या उभारली होती. यादरम्यान सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनी शतकी खेळी केल्या. त्याचवेळी यष्टीरक्षक ऋचा घोषनेही झटपट अर्धशतक झळकावले.
४३६ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिश संघाची सुरुवात खूपच खराब झाली. आयर्लंडचा संघ केवळ ३१.४ षटकेच खेळू शकला आणि १३१ धावा करून सर्वबाद झाला. यादरम्यान एकाही आयरिश फलंदाजाला ५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. तर दीप्ती शर्माने टीम इंडियाकडून सर्वाधिक ३ विकेट घेतले. तनुजा कंवर हिलाही २ विकेट मिळवण्यात यश आले. तितास साधू, सायली सातघरे, मिन्नू मणी यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.
प्रतिकाची मालिकेत वादळी खेळी
आंतरराष्ट्रीय पदार्पणातच सर्वांचे लक्ष वेधून घेणारी भारताची नवी सलामीवीर प्रतिका रावलने अखेरीस आपले पहिले शतक झळकावले. प्रतिकाने २२ डिसेंबर २०२४ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. यानंतर आयर्लंड वनडे मालिकेत तिची वादळी फलंदाजी पाहायला मिळाली. ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये तिने सलग दोन अर्धशतके झळकावली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८९ धावांची खेळी केल्यानंतर प्रतिकाने दुसऱ्या वनडेत ८३ धावा केल्या.
भारताचा ३००हून अधिक धावांनी विजय
यापूर्वी २०१७ मध्ये, भारतीय महिला संघाने आयर्लंड विरुद्धचा एकदिवसीय सामना २४९ धावांनी जिंकला होता, त्यावेळेस भारतीय संघाची कर्णधार मिताली राज होती. आता स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली भारताने हा विक्रम मागे टाकला आणि ३०४ धावा करत इतिहास घडवला आहे. कारण पहिल्यांदाच भारतीय महिला संघाने ३०० हून अधिक धावांनी एकदिवसीय सामना जिंकला आहे.
मानधना-प्रतिकाची द्विशतकी भागीदारी
स्मृती मानधनाने आयर्लंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर प्रतिका रावलनेही तिचे पहिले शतक पूर्ण केले. तिने १०० चेंडूत शतक पूर्ण केले. शतकी खेळीदरम्यान तिने स्मृती मानधनासह द्विशतकी भागीदारीही केली. स्मृतीबरोबर तिने भारताच्या धावसंख्येत २३३ धावांची भर घातली, जी या दोघांमधील आतापर्यंतची सर्वात मोठी सलामीची भागीदारी आहे. प्रतिकाने आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून ७ डाव खेळले आहेत. या ६ डावांपैकी ४ डावांमध्ये स्मृती आणि प्रतिकाने १०० धावांचा टप्पा गाठला आहे.