फुटबॉलमधील योगदानासाठी दिग्गज प्रशिक्षक आर्मांडो कुलासोंचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान

क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी बजावलेल्या खेळाडू तसेच प्रशिक्षकांचा आज राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th January, 03:35 pm
फुटबॉलमधील योगदानासाठी दिग्गज प्रशिक्षक आर्मांडो कुलासोंचा द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली: क्रीडा मंत्रालयाकडून शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ चे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विजेत्यांना गौरविले. राष्ट्रपती मुर्मू यांनी प्रथम भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्याशिवाय ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेता नेमबाज मनू भाकर, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान गोव्याचे सुपुत्र आणि दिग्गज प्रशिक्षक आर्मांडो कुलासोंचा फुटबॉलमधील त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 


मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांची कामगिरी  

१) मनु भाकर ने पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेत दोन पदकांना गवसणी घातली होती. १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र दुहेरीत तिने कांस्यपदकाची कमाई केली होती. तिच्या दोन पदकांच्या जोरावर भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण ६ पदके जिंकली.

२) १८ वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने ११ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्याने अंतिम फेरीत गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा ७.५-६.५ असा पराभव केला. एवढ्या कमी वयात जेतेपद पटकावणारा गुकेश जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८५ मध्ये रशियाच्या गॅरी कास्पारोव्हने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी हे विजेतेपद पटकावले होते.

३) हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते . त्याचबरोबर हरमनप्रीतने तीन वेळा एफआयएच पुरस्कार सोहळ्यात वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे.

४) प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडीत आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या प्रवीणने यंदाच्या स्पर्धेत T६४ स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि २.०८ मीटरची उंची पूर्ण करत इतिहासात आपले नाव नोंदवले.

दरम्यान, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण जिंकणाऱ्या नवदीपसह ३४ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. यापैकी १७ पॅरा-ॲथलीट आहेत, तर २ जीवनगौरव पुरस्कार आहेत.  नेमबाज स्वप्नील कुसळे, पुरुष हॉकी संघाचा सदस्य जरमनप्रीत सिंग, अमन सेहरावत,सरबजोत सिंह,अभिषेक, संजय और सुखजीत सिंह, ज्योति याराजी, अनु रानी, नीतू, स्वीटी, वंतिका अग्रवाल, सलीमा टेट, राकेश, प्रीति, जीवांजी दीप्ति, अजीत सिंह, सचिन सर्जेराव खिलारी, धरमवीर, प्रणव सूरमा, एच होकाते सेमा, सिमरन, नवदीप, नीतेश कुमार, थुलसमती मुरुगेशन, नित्या, मनीषा रामदास, कपिल परमान, मोना अग्रवाल, रुबीना फ्रान्सिस, सरबजोत सिंह, अभय, सजन प्रकाश, सुचा सिंह, मुरलीकांत राजाराम पेटकर यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 



 पाच प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

यामध्ये दीप्ती देशपांडे (नेमबाजी), संदीप सांगवान (हॉकी), सुभाष राणा (पॅरा नेमबाजी), एस मुरलीधरन बॅडमिंटन आणि आर्मांडो कुलासो यांना फुटबॉलसाठी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये सहा पुरस्कार असतात. मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद करंडक (माका ट्रॉफी म्हणूनही ओळखले जाते) आणि राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार. याशिवाय ध्यानचंद पुरस्कार या नावाने आणखी एक जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. क्रीडा विकासात आजीवन योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. यावेळी या श्रेणीत कोणालाही हा पुरस्कार देण्यात आला नाही.