चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद शमी भारतीय संघात

टीम इंडियाची घोषणा : शुभमन गिल उपकर्णधार; पहिला सामना बांगलादेशविरुद्ध

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
18th January, 11:28 pm
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मोहम्मद शमी भारतीय संघात

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. हाच संघ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या संघाच्या उपकर्णधारपदी युवा खेळाडू शुभमन गिलची वर्णी लागली आहे. तर मोहम्मद शमीने संघात पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याने त्याच्या जागी हर्षित राणा खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद शमीचे खूप दिवसांनी पुनरागमन झाले आहे. तो २०२४ च्या विश्वचषकानंतरपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. विशेष म्हणजे यशस्वी जैस्वालला पहिल्यादांच वनडे संघात स्थान मिळाले आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना १९ फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे. तर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला सामना खेळणार आहे.
काही दिवसांपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संघात चर्चेत असलेल्या खेळाडूंच्या यादीत संजू सॅमसनच्या नावाचाही समावेश होता, मात्र दुर्दैवाने त्याला संघात स्थान मिळाले नाही. विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळल्यामुळे त्याला शिक्षा झाल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये केला जात आहे. आणखी एक पैलू म्हणजे ऋषभ पंत संघाचा मुख्य यष्टिरक्षक आणि केएल राहुलला बॅकअप खेळाडू म्हणून संधी मिळाल्याने संजूवर अन्याय झाल्याची चर्चा आहे.
सिराजला डच्चू
भारतीय भूमीवर २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये सिराज टीम इंडियाचा भाग होता. याशिवाय जून २०२४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातही सिराज टीम इंडियाचा भाग होता, पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये त्याचा समावेश करण्यात आला नसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यावर आता कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्मा मोहम्मद सिराजबाबत म्हणाला की, बुमराह खेळेल की नाही याबद्दल आम्हाला खात्री नव्हती. त्यामुळे, आम्हाला वाटले की आम्हाला नवीन चेंडूने आणि बॅकएंडवर गोलंदाजी करू शकेल अशा व्यक्तीची गरज आहे. म्हणून आम्ही बॅकएंडवर गोलंदाजी करण्यासाठी अर्शदीपची निवड केली. शमी, आपण सर्वांनी पाहिले की तो काय आहे आणि नवीन चेंडूसह काय करू शकतो. त्यामुळे आता शमी परतला आहे आणि नवीन चेंडूशिवाय सिराजचा प्रभाव थोडा कमी होतो. आम्ही फक्त तीन वेगवान गोलंदाज घेतले आहेत. कारण आम्ही अनेक अष्टपैलूंना संधी दिली ​​आहे.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, सिराजला संघातून बाहेर पडावे लागले हे दुर्दैव आहे. पण विशिष्ट भूमिका बजावू शकतील असे खेळाडू आणण्यासाठी आमच्याकडे पर्याय नव्हता. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, आमच्याकडे असे खेळाडू आहेत, जे नवीन चेंडूने चांगली कामगिरी करू शकतात. मधल्या फळीत गोलंदाजी करू शकतात आणि बॅकएंडवर गोलंदाजी करू शकतात.

भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपल्या मोहिमेची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. उभय संघांमधील सामना २० फेब्रुवारी रोजी दुबईत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना होणार आहे. टीम इंडिया २ मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. जर भारताने गट सामन्यांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आणि पुढील फेरीत प्रवेश केला तर ४ मार्च रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळेल. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे.
भारताचा १५ सदस्यीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने
२० फेब्रुवारी: भारत विरुद्ध बांगलादेश, दुबई
२३ फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
२ मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
४ मार्च: उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास), दुबई
९ मार्च: अंतिम (पात्र असल्यास), दुबई
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे स्वरुप
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ८ संघांमध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. सर्व ८ संघ आपापल्या गटात ३-३ सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना दुबईत, तर दुसरा लाहोरमध्ये होणार आहे. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. अशा परिस्थितीत एखादा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो स्पर्धेत एकूण ५ सामने खेळेल.


शमी १४ महिन्यांनी परतणार
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेसाठी शमीला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले आहे. तब्बल १४ महिन्यांनंतर तो भारतीय संघात परतणार आहे. टीम इंडियात परतण्यापूर्वी शमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून शमीने सांगितले की, आता प्रतीक्षा संपली आहे. व्हिडिओमध्ये शमी शूज बॅगेत ठेवताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्या हातात एक चेंडूही दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत शमीने लिहिले की, प्रतीक्षा संपली आहे! मी टीम इंडियामध्ये पुन्हा सामील होण्याची तयारी करत असून असताना मॅच मोड ऑन आहे. शमीने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर दुखापतीमुळे तो टीम इंडियात पुनरागमन करू शकला नाही. शमीच्या टाचेला दुखापत झाली होती, त्यासाठी २०२४ च्या सुरुवातीला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे टीम इंडियात परतण्यापूर्वी शमीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. शमीने बंगालकडून १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेश विरुद्ध प्रथम श्रेणी सामना खेळला होता. या सामन्याद्वारे त्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजाने बंगालसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भाग घेतला. त्यानंतर वनडे फॉरमॅटच्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही तो खेळताना दिसला.

हेही वाचा