तिघे कॉन्स्टेबल जखमी : दोघांवर गोमेकॉत उपचार
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवस्थळी माथेफिरूने तिघा पोलिसांवर सुरी हल्ला केला. गंभीर जखमी दोघांवर गोमेकॉत, तर एकावर म्हापशातील जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये शरद हरजी (कळंगुट पोलीस स्थानक), रितेश महाले (हणजूण पोलीस स्थानक) व विठ्ठल नारोजी (पणजी पोलीस स्थानक) या कॉन्स्टेबलांचा समावेश आहे. शरद व विठ्ठल यांना गोमेकॉत, तर रितेशला जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे. पोलिसांनी हल्लेखार संशयित आयुश मनोज नाईक (रा. कळंगुट) याला अटक केली आहे.
ही घटना बुधवारी सायं. ५.३०च्या सुमारास घडली. जत्रोत्सवात बुधवारी सायंकाळी मंदिराच्या प्रांगणातील व्यासपीठावर भरतनाट्यमचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी हा माथेफिरू तिथे आला. त्याने कार्यक्रमाच्या निवेदिका तसेच देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांना अर्वाच्च शिविगाळ केली. मंदिराच्या आवारातील पोलीस चौकीत तैनात पोलिसांना देवस्थान समितीने बोलावले. तिघा पोलिसांनी त्याला शांत राहण्यास सांगितले. तो ऐकत नसल्याने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने धारदार सुरी काढून पोलिसांवर हल्ला केला. हे पाहून चौकीवरील इतर पोलिसांनी धाव घेतली व संशयिताच्या तावडीतून तिघांची सुटका केली. त्यांनी संशयिताला पकडले. संशयिताला जमावाने चोप दिला. हात, पाय बांधून संशयिताला पोलीस स्थानकावर आणले. जखमी पोलिसांना जिल्हा इस्पितळात नेले.
संशयिताने लहान मुलांनाही धमकावले
संशयित कोकणी भाषेत शिव्या देत होता. तो नशेत धुंद होता. त्याने घटनास्थळी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आलेल्या लहान मुलांनाही सुरी दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी म्हापसा पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.