विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर उसगाव-गांजे पंचायतीचा सचिव रजेवर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th January, 11:52 pm
विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर उसगाव-गांजे पंचायतीचा सचिव रजेवर

फोंडा : उसगाव - गांजे पंचायतीचे सचिव होनाजी मोरजकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याने बुधवारी सकाळपासून रजा घेतली आहे. पंचायत खात्यानेसुद्धा सचिवासंबंधी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. पण दबावतंत्र वापरून पंचायत सचिव ‘तो मी नव्हेच’च्या भूमिकेत आहे.

वाळपई मतदारसंघातील एका २२ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची तक्रार पंचायत संचालक तसेच फोंडा पोलीस स्थानकात देण्यात आली होती. फोंडा पोलिसांनी यासंबंधी चौकशी सुरू केली असून गुन्हा नोंद झाल्याचे समजताच पंचायत सचिवाने रजा घेत असल्याचे गटविकास कार्यालयास पत्र पाठवून कळविले आहे. पंचायत खात्याने सुद्धा यासंबंधी चौकशीला सुरुवात केली आहे.

पण, पंचायत सचिवाने इतरांच्या सहाय्याने पीडित युवतीबाबत अफवा पसरविण्यास सुरुवात केली आहे. पीडित युवतीने सचिवाकडे पैशांची मागणी केल्याची अफवा सध्या उसगाव परिसरात पसरविण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या उसगाव - गांजे पंचायतीच्या ग्रामसभेत वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.