कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई : वितळवलेले सोने जप्त
मडगाव : येथील रेल्वेस्थानकावर सुवर्णलंकाराची चोरी केल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी बिबीजान शेख (५४, रा. हुबळी, कर्नाटक) याला अटक केली आहे. संशयिताकडून वितळवलेल्या स्वरुपात ४.४ लाख किमतीचे ६०.५० ग्रॅम सोने जप्त केले. न्यायालयात हजर केले असता संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मडगाव रेल्वेस्थानकावर सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांकडून तपास केला जात होता. सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे संशयिताचा शोध घेत असताना संशयित बिबीजान शेख या मूळ हुबळी कर्नाटकमधील रहिवाशाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान संशयित शेख याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर शेख याच्याकडे चोरी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची चौकशी करण्यात आली असता हुबळी येथील एका सुवर्णकाराला दागिने दिल्याचे सांगितले. कोकण रेल्वे पोलिसांच्या पथकाने हुबळी येथे जात सदर सुवर्णकाराकडून चोरीतील सोन्यापासून वितळवलेले ६०.५० ग्रॅम सोने जप्त केले. याची किंमत सुमारे ४.४ लाख इतकी आहे. कोकण रेल्वे अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद हुसेन, मंजुनाथ, महिला पोलीस कॉन्स्टेबल मनिषा वेळीप यांच्या पथकाने ही कारवाई केली. संशयित बिबीजान शेख याला मडगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
महिनाभरात चोरीचा तपास
सुवर्णलंकार चोरी होण्याची घटना महिनाभरापूर्वी घडली होती. कोकण रेल्वे पोलिसांकडून विविध प्रकारे याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जात होता. सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे तपास केल्यावर शेवटी यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.