मडगाव पोलिसांकडून गुन्हा नोंद
मडगाव : येथील रेल्वेस्थानकाकडून पॉवर हाऊसच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. यात गंभीर जखमी झालेल्या भीषम गिनानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मडगाव पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संजय गिनानी (रा. वीज कार्यालयानजीक, मडगाव) हे आपल्या ज्युपिटर गाडीने भीषम गिनानी (६१) या भावासह पॉवर हाऊसकडून मडगाव रेल्वेस्थानकाच्या दिशेने चुकीच्या बाजूने गाडी चालवत येत होते. त्याचवेळी शमशुद्दीन शेख (रा. दिकरपाल, दवर्ली) हे आपल्या ताब्यातील ओला इलेक्ट्रीक स्कूटर चालवत पॉवर हाऊस मडगावच्या दिशेने जात असताना दोन्ही दुचाकींची धडक झाली. यात संजय गिनानी यांच्या दुचाकीच्या मागे बसलेला भाऊ भीषम यांना गंभीर दुखापत झाली. तर, संजय गिनानी व शमसुद्दीन शेख यांनाही दुखापत झाली होती. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारादरम्यान गंभीर जखमी भीषम गिनानी यांचा मृत्यू झाला. भीषम गिनानी हे आके येथील दावत रेस्टॉरंटचे मालक होते. या अपघातातीत दोन्ही दुचाकींच्या चालकांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. मडगाव पोलिसांकडून पंचनामा करत वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय वेळीप पुढील तपास करत आहेत.