काँग्रेसच्या फुटीर आमदारांविरोधातील दोन अपात्रता याचिकांवर आज सुनावणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
15th January, 11:46 pm
काँग्रेसच्या फुटीर आमदारांविरोधातील दोन अपात्रता याचिकांवर आज सुनावणी

पणजी : काँग्रेसच्या आठ फुटीर आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर सभापती रमेश तवडकर यांनी दिलेल्या आदेशाला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या संदर्भात निवाडा देण्याची मागणी चोडणकर यांचे वकील अभिजित गोसावी यांनी केली. दरम्यान, अशाच पद्धतीची डाॅम्निक नोरोन्हा यांची याचिका असल्यामुळे दोन्ही याचिकांवर गुरुवार, दि. १६ रोजी सुनावणी होणार आहे.

राज्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापन करण्यास सांगितले. डाॅ. प्रमोद सावंत यांनी ‘मगो’ आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर १४ सप्टेंबर २०२२ रोजी दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई या काँग्रेसच्या आठ आमदारांनी वेगळा गट स्थापन करुन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी दोन तृतीयांश विधीमंडळ गट भाजपमध्ये विलीन केल्याचा दावा केला होता. या प्रकरणी चोडणकर यांनी वरील आठ आमदारांना अपात्र करावे, अशी याचिका ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सभापतींकडे दाखल केली होती. ही याचिका सभापती तवडकर यांनी फेटाळून लावली. त्यानंतर चोडणकर यांनी सभापतींच्या निवाड्याला नोव्हेंबर २०२४ मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती. त्यावेळी चोडणकर यांनी घटनेच्या कलम १३६ अंतर्गत याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता, घटनेच्या कलम १३६ नुसार सुनावणी करू शकत नसल्याचे सांगून याचिका निकालात काढली. तसेच या संदर्भात उच्च न्यायालयात आव्हान देण्यास मुभा दिली. त्यानुसार, चोडणकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायालयात डाॅम्निक नोरोन्हा यांनी वरील मुद्द्यांवर याचिका दाखल केल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने वरील दोन्ही याचिकांची सुनावणी १६ रोजी ठेवली आहे.

चोडणकर यांच्याकडून याचिका दाखल

या प्रकरणी बुधवारी सुनावणी झाली असता, काँग्रेस पक्षातून १० आमदार फुटले होते. त्यांच्या विरोधात चोडणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आला आहे, अशी माहिती चोडणकर यांच्यातर्फे अॅड. अभिजित गोसावी यांनी वरील अपात्र याचिका समान असल्यामुळे निकाल देण्याची मागणी केली.