जमीन हडप प्रकरणातील सिद्दिकीच्या पत्नीला सशर्त जामीन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th January, 11:55 pm
जमीन हडप प्रकरणातील सिद्दिकीच्या पत्नीला सशर्त जामीन

पणजी : जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी उर्फ सुलेमान खानची पत्नी अफसाना उर्फ सारिका सुलेमान खान हिला विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली होती. तिला म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २५ हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला आहे.

जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी खान मागील चार वर्षांपासून फरार होता. सिद्दिकीला एसआयटीने १२ नोव्हेंबर २०२४ रोजी हुबळीमधून अटक केली होती. यानंतर गुन्हा शाखेच्या कोठडीत असताना सिद्दिकीने १३ डिसेंबर २०२४ रोजी पलायन केले होते. आयआरबी कॉन्स्टेबल संशयित अमित नाईक याची त्याने मदत घेतली होती. सिद्दिकी फरार झाल्यानंतर गुन्हा शाखेच्या पथकाने एर्नाकुलम-केरळ पोलिसांच्या मदतीने त्याला २१ डिसेंबर २०२४ रोजी अटक केली होती. त्याच्यासोबत त्याची पत्नी अफसाना उर्फ सारिका सुलेमान खान होती. तिचाही जमीन हडप प्रकरणात सहभाग असल्यामुळे एसआयटीने तिला अटक केली. न्यायालयाने तिला प्रथम एसआयटीची कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच दरम्यान संशयित अफसाना सुलेमान खान हिने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने सुनावणी घेऊन तिला २५ हजार रुपये, न्यायालयात आरोपपत्र दाखल करेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या सोमवारी सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान एसआयटीत हजेरी लावणे. तसेच इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. 

हेही वाचा