रात्री १२ पर्यंत शॅक बंद करण्याचा निर्णय चुकीचा

पोलिसांच्या निर्णयावर शॅक मालकांची प्रतिकिया

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th January, 12:21 am
रात्री १२ पर्यंत शॅक बंद करण्याचा निर्णय चुकीचा

पणजी : रात्री १२ वाजेपर्यंत शॅक बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. आम्हाला कायद्यानुसार, रात्री १ वाजेपर्यंत शॅक बंद करण्याचे आदेश आहेत. पण, अचानक सरकार ही अट लादत आमचा व्यवसाय उद्ध्वस्त करत आहे. ज्यांना १ वाजेपर्यंत राहण्याची परवानगी आहे ते सुरू राहतील आणि उर्वरित १२ वाजता बंद राहतील, असे शॅक व्यावसायिकांनी सांगितले.

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनेनंतर सरकारने कठोर पावले उचलली आहेत आणि शॅकविरुद्ध निर्बंध कडक केले आहेत. याचाच एक भाग म्हणून, पोलिसांनी गोव्यातील सर्व शॅक रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या विषयावर बोलताना, पारंपरिक शॅक संघटनेचे अध्यक्ष मॅन्युएल कार्दोज म्हणाले की, जारी केलेला आदेश चुकीचा आहे. काही शॅक रात्री ११ वाजता लवकर बंद होतात तर काही रात्री ३ ते ४ पर्यंत बंद करतात.

पर्यटन खाते रात्री ११ वाजेपर्यंत शॅक बंद ठेवण्याचे सांगत असले तरी, उत्पादन शुल्क परवान्यानुसार रात्री १ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची सूट आहे. रात्री १ वाजेपर्यंत शॅक सुरू ठेवण्यासाठी आम्ही अबकारी खात्याला अतिरिक्त शुल्क देतो. रात्री १२ वा. शॅक बंद करण्यास सांगितले जात असेल, तर सरकारने अबकारी खात्याला भरलेले शुल्क परत करावे, असा युक्तिवाद कार्दोज यांनी केला.

मारहाणीच्या घटनांनंतर हा निर्णय घेण्यात आला. पण मी सरकारांना सांगू इच्छितो की संध्याकाळी अशा घडणार नाहीत का? हा निर्णय घेण्यापूर्वी शॅक व्यवसायांना पटवून द्यायला हवा होता. या निर्णयामुळे शॅक व्यवसाय उद्ध्वस्त होईल. सनबर्नमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला तेव्हा सनबर्न का बंद केले नाही? असा प्रश्न त्यांनी केला.

आम्ही पर्यटन खात्याने ठरवलेल्या वेळेचे पालन करू. पर्यटन खात्याने काही शॅकना रात्री ११ वाजेपर्यंत आणि अबकारी खात्याने काही शॅकना रात्री १ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. ज्यांना ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे ते त्या वेळेत बंद करतील पण, ज्यांच्याकडे १ वाजेपर्यंत शॅक चालवण्याचा परवाना आहे ते चालवतील, असे अखिल गोवा शॅक मालक संघटना सरचिटणीस जॉन लोबो यांनी सांगितले.